जतीन सुरतवाला
घर खरेदीचा निर्णय झाला की वेळ येते ती होम लोनची म्हणजेच गृहकर्जाची. आपल्या उत्पन्नानुसार आपल्याला कोणती बँक कर्ज देईल. पुरेसे कर्ज मिळेल का? त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील याची माहिती घ्यायला सुरवात होते. बँक आणि कर्जाची रक्कम निश्चित झाली की कर्जाच्या व्याजाचे स्वरूप कोणते ठेवायचे याचा निर्णय घेण्याची वेळ येते. व्याजदर स्थिर (फिक्स) असलेला किंवा परिवर्तनशील (फ्लोटिंग) ठेवावा हे दोनच पर्याय असतात. मात्र यातील कोणता प्रकार निवडावा हे निश्चित करणे प्रत्येकाला सोपे नसते. या दोनपैकी कोणता पर्याय योग्य ठरेल, यावरच या लेखाच्या माध्यमातून चर्चा करण्यात येणार आहे. या दोन्ही व्याजाचे फायदे-तोटे समजून घेण्यासाठी आपण सुरवातीला हे दोन्ही व्याजाचे प्रकार काय आहेत यावर चर्चा करूयात.
गृहकर्जाच्या व्याजदराचे प्रकार
स्थिर व्याज दर: व्याजाच्या या प्रकारात कर्जाचा संपूर्ण कालावधीत किंवा बँकेच्या धोरणांनुसार मर्यादित कालावधीसाठी व्याजाचा दर स्थिर राहतो. म्हणजेच जर कर्ज घेताना जर आठ टक्के व्याजदर निश्चित झाला तर सर्व कर्ज फिटेपर्यंत किंवा बँकेने ठरवून दिलेल्या कालावधीसाठी तोच व्याजदर राहतो. त्यामुळे जर रेपो रेट वाढून कर्ज महागले तर त्याचा परिमाण किंवा व्याजदर कमी झाल्याचा फायदा या प्रकारच्या कर्जात मिळत नाही.
परिवर्तनशील व्याज दर: व्याजाच्या या प्रकारात बँकेद्वारे वेळोवेळी व्याजदर सुधारित केला जातो. बँकांच्या धोरणांमध्ये किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) आर्थिक धोरणांमधील कोणताही बदल झाल्याचा त्याचा परिणाम हा व्याजदरावर होतो. याचा अर्थ हा व्याजदर बँकांच्या धोरणांनुसार कमी जास्त होत असतो. त्यामुळे परिवर्तनशील व्याजदराची निवड केल्यानंतर निश्चितपणे एमआयचा अंदाज लावणे थोडे मुश्कील होते.
आणखी वाचा: Money Mantra: घर घेताना असे करा आपल्या पर्सनल फायनान्सचे नियोजन
रेपो रेटचा परिवर्तनशील व्याज दरावर काय परिणाम होतो?
परिवर्तनशील व्याज दरावर परिमाण करणारा सर्वात मोठा घटक म्हणजे रेपो रेट. हा दर बदलला तर व्याजाच्या दरात देखील बदल होतो. वेळोवेळी बदलत राहतो. गेल्या दोन वर्षांत रेपो दर सातत्याने वाढत आहे. अशा दरांमध्ये वाढ झाल्यामुळे बँका परिवर्तनशील व्याजदर वाढवितात. ज्याचा परिणाम तुमच्या ईएमआयवर होतो. उच्च रेपो दर म्हणजे उच्च ईएमआय आणि त्याउलट व्याजदरात वाढ म्हणजे आरबीआय व्यावसायिक बँकांना जास्त दराने पैसे देते, ज्यामुळे कर्ज महाग होते.
स्थिर की परिवर्तनशील व्याजदर – कोणता व्याजदर चांगला?
कर्ज घेण्यापूर्वी, तुमची वैयक्तिक आर्थिक परिस्थिती आणि प्रत्येक कर्जाचे तपशील विचारात घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. हे घटक स्थिर की परिवर्तनशील व्याज दराचा पर्याय निवडायचा हे ठरविण्यात मदत करतात. व्याजदर हा कर्जाच्या एकूण खर्चाचा फक्त एक भाग असतो. तुम्हाला कर्जाच्या परवडण्यामध्ये योगदान देणारे इतर घटक देखील विचारात घ्यावे लागतात.
कर्जाच्या कालावधीत तुम्हाला किती पैसे द्यावे हे ठरविण्यात कर्जाचा कालावधी महत्त्वाची भूमिका बजावतो. उदाहरणार्थ – कर्ज परतफेडीची मुदत जितकी जास्त असेल, तितके जास्त व्याज द्यावे लागते. त्याचप्रमाणे, तुमची मुदत जितकी कमी असेल तितका र्इएमआय जास्त असतो. शिवाय व्याजही कमी भरावे लागते.
स्थिर व्याजदरात व्याजदर कर्जाच्या संपूर्ण कालावधीत किंवा विशिष्ट कालावधीसाठी निश्चित असतो. कोणत्याही परिस्थितीत त्यात बदल होत नाही. त्यामुळे व्याजदरातील बदलांपासून कर्जदाराला आर्थिक संरक्षण दिले जाते. बँकेचे व्याजदर कमी झाल्यास, खरेदीदार कमी झालेल्या व्याजदराच्या कोणत्याही फायद्यासाठी पात्र राहत नाही. परंतु दर वाढल्यास, वाढीव दर देण्याची जबाबदारी कर्जदारांवर नसते.
परिवर्तनशील दरांतर्गत कर्जदाराला बदललेल्या दरानुसार ईएमआय भरावे लागतात. कारण व्याजदर रेपो रेटनुसार वेळोवेळी बदलू शकतात. या प्रकारच्या व्याजदरात कर्जदाराला रेपो रेटच्या कपातीचा फायदा होतो. परंतु दरांमध्ये कोणतीही वाढ झाल्यास वाढलेला ईएमआय भरावा लागतो. फ्लोटिंग दर वर्षातून एकापेक्षा जास्त वेळा सुधारित केले जाऊ शकतात. तो किती वेळा बदलायचा याचा सर्वस्वी अधिकार आरबीआयला आहे. स्थिर व्याजदर हे परिवर्तनशील व्याजदरांपेक्षा खूप जास्त असू शकतात.
परिवर्तनशील व्याजदर कशावर अवलंबून असतो?
बहुतेक बँका परिवर्तनशील व्याजदर गृहकर्ज घेण्याचा पर्याय देतात. हे व्याजदर रेपो रेट आणि मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट (एमसीएलआर) वर आधारित असतात. हा व्याजदर बँक आणि कर्जदार या दोघांसाठीही फायदेशीर आहे, असे अनेकांचे म्हणणे आहे.
परिवर्तनशील व्याजदर स्थिर व्याजदरात बदलता येतो?
रिझर्व्ह बँकेने नुकतेच द्विमाही पतधोरण जाहीर करताना कर्जदारांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. गृह, वाहन तसेच अन्य कोणत्याही प्रकारचे कर्ज परिवर्तनशील व्याजदारतून स्थिर व्याजदरात बदलता येणार आहे. बरेच कर्जदार कर्ज घेताना परिवर्तनशील व्याजदराची निवड करतात किंवा बँकेकडून त्यांना परिवर्तनशील व्याजदरावरील कर्ज दिले जाते. भविष्यात व्याजदर कमी झाले तर त्याचा फायदा मिळावा असा विचार कर्ज घेणारा करतो तर बँकांही भविष्यात व्याजदर वाढले तर बँकेचे नुकसान होऊ नये असा विचार करून कर्जदाराला फ्लोटिंग व्याजदर निवडण्याचा पर्याय सुचवतात. बदललेल्या या धोरणाच्या मार्गदर्शक सूचना लवकरच जागी करण्यात येणार आहेत.