गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला ३० हजार नोकऱ्यांना कात्री लावत असल्याची घोषणा ॲमेझॉनने केली. त्या आधी ऑक्टोबरच्या मध्याला नेस्लेने १६,००० कर्मचारी कमी करत असल्याचे नियोजन जाहीर केले. या अशा बातम्या निरंतर सुरूच आहेत. जगभरात सर्वत्रच मोठ्या प्रमाणात नोकरकपात सुरू आहे. ज्यातून सर्व क्षेत्रांतील पगारदारांची चिंता वाढली आहे. महिनाभराआधी भारतातील सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएसने १२,००० कर्मचाऱ्यांना घरी बसविण्याची घोषणा करून, हे कपात वारे भारतातही पोहोचल्याचे दाखवून दिले. हे नेमके काय आणि कशामुळे सुरू आहे? हे जाणून घ्यायचे तर, याकडे प्रत्यक्षात ही ८०/२० नियम अथवा पॅरेटोच्या तत्त्वाचे एक वास्तविक रूप म्हणून पाहता येईल.

जगातील ८० टक्के घटनांमागील कार्यकारण हे २० टक्केच असते. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, ८० टक्के निकाल हा २० टक्के कारणांतून दिसून येतो. गत शतकातील इटलीचे समाजशास्त्रज्ञ, अर्थतज्ज्ञ विल्फ्रेडो पॅरोटो यांचे हे अनुभवसिद्ध निरीक्षण हा त्यानंतर एक सर्वमान्य नियमच बनला. हे पॅरोटेचे तत्त्व आज कुठे लागू पडत नाही, हे सांगा! जगातील ८० टक्के संपत्ती ही केवळ २० टक्के लोकांहाती एकवटलेली आहे. हाच पैलू अधिक सुटा करून सांगायचा तर, कंपन्यांना ८० टक्के फायदा हा २० टक्के ग्राहकांच्या खरेदीमुळेच होतो. भारताच्या बाबतीत, उत्पादन क्षेत्रातील बहुतांश कंपन्यांची ८० टक्के विक्री ही दसरा, दिवाळी, नाताळ, नववर्ष अशा ऑक्टोबर ते डिसेंबर या २० टक्के कालावधीत होते. जसे शेअर बाजारात २० टक्के कंपन्यांचे बाजारमूल्य ८० टक्के हे २० टक्के कंपन्यांकडेच आणि सेन्सेक्स-निफ्टीच्या ८० टक्के वरच्या अथवा घसऱणीच्या चालीवर नियंत्रण या २० टक्क्यांकडेच असणे.

आपणा सर्वांच्या अगदी जवळचे उदाहरण म्हणजे, मुंबईच्या लोकल ट्रेनमधील ८० टक्के प्रवासी वर्दळ ही २० टक्के काळातच असते. इंटरनेटने जोम धरलेला असताना मोठ्या झालेल्या ८० टक्के मराठी जेन झी पिढीतील २० टक्क्यांनाच भाऊ पाध्ये, अण्णा भाऊ साठे अथवा ‘जिंदादिल’ भाऊ पाटणकर परिचित असावेत, असे म्हणा. अथवा हेच उलट केल्यास, जेन झीच्या भावविश्वातील लेखक, कवी, कलाकार, ते ज्यांची गाणी गुणगुणतात ते संगीत, गायक हे जुन्या पिढीतील ८० टक्क्यांना अवगत नसावे वगैरे.

पण सध्याचे नोकरकपातीचे जागतिक वारे आणि पॅरेटोच्या तत्त्वाचा संबंध काय? याचे उत्तरही सोपे आहे. जर तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणाचे प्रामाणिक निरीक्षण करून पाहिले, तर तुम्हाला लक्षात येईल एक छोटा टक्काच बहुतांश कामे उरकत असल्याचे दिसून येईल. नवतंत्रज्ञानाच्या अटळ आणि अपरिहार्य ठरलेल्या स्वीकारामुळे हे असे घडले, घडत आले आणि पुढे घडणार आहे. काळानुरूप तंत्रज्ञानाचे स्वरूप बदलले, पण परिणामाची मात्रा सारखीच राहिली. आजच्या काळात, कृत्रिम प्रज्ञा अर्थात एआय, रोबोटिक्स, प्रगत ऊर्जा प्रणाली आणि सेन्सर नेटवर्क ही चार उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रे हे घडवून आणत आहे. जगभरातील ८० टक्के कामगारांना रोजगार देणाऱ्या सात प्रमुख क्षेत्रांवर या सध्या २० टक्क्यांहातीच असलेल्या तंत्रघटकाचा सर्वाधिक परिणाम अपेक्षित आहे, असा हा इशारा आहे. जागतिक आर्थिक मंच अर्थात वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने (डब्ल्यूईएफ) त्यांच्या ‘जॉब्स ऑफ टुमारो’ या शीर्षकाने प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालात हा इशारा दिला आहे. पॅरोटेच्या ८०/२० नियमाला दिला गेलेला हा ताजा उजाळाच आहे.

सध्याच्या घडीला जागतिक रोजगार आणि श्रम बाजारपेठेला आकार देण्यात तंत्रज्ञानाधारित चौथ्या औद्योगिक क्रांतीचा मोठा वाटा आहे. याचा पहिला संदेश अगदी सुस्पष्ट आहे. तो म्हणजे जगभरात सर्वत्रच उत्पादकता वाढीने वेतन / मजुरीच्या वाढीपेक्षा कितीतरी जास्त वाढ केली आहे. याचा अर्थ असा की, मजुरांचा पुरवठा त्याच्या मागणीपेक्षा जास्त झाला आहे. यामुळेच सध्या बेरोजगारीचे प्रमाण जागतिक स्तरावरच सर्वत्रच जास्त आहे. अर्थव्यवस्थेच्या समष्टी आणि सूक्ष्म अर्थात मॅक्रो आणि मायक्रो या दोन्ही पातळ्यांवरून या पैलूला जोखले गेले पाहिजे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील गतिशीलता, तसेच इमिग्रेशन धोरण (विदेशातून स्थलांतर), देशांतर्गत लोकसंख्येचे वयोमान आणि तिची शिक्षण आणि कौशल्याची सरासरी पातळी, गल्लीपासून दिल्लीपर्यंतचा भ्रष्टाचार यासारखे घटक हे अधिकाधिक प्रतिकूल बनावेत, याचाच जागतिक आर्थिक स्तरावर सध्या बोलबाला आहे. अमेरिका, रशिया, चीन अशा सर्वच कोनांतून राज्यकर्त्यांचा तसा प्रयत्न सुरू आहे.

देशोदेशातील बेरोजगारी, उत्पादकता, सहभाग दर, एकूण उत्पन्न, दरडोई उत्पन्न आणि सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) यावर त्याचा परिणाम स्पष्टच दिसत आहे. दुसऱ्या बाजूने, सूक्ष्म आर्थिक स्तरावर, वैयक्तिक कंपन्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधतात, कोण मौल्यवान २० टक्के आणि कोण टाकाऊ ८० टक्के याचे मूल्यांकन होते. मग त्यांना कामावर ठेवतात, किंवा त्यांना काढून टाकतात. वेतन आणि कामाचे तास वाढविले जातात किंवा टाळेबंदीसारख्या उपायांनी कमी केले जातात. पुरवठा आणि मागणी यांच्यातील संतुलन हे कर्मचारी किती तास काम करतात आणि त्यांचे वेतन, भत्ते म्हणून मिळणारी भरपाई वगैरेवर प्रभाव टाकते.

तंत्रज्ञान क्षेत्रातील नोकरकपातीचा मागोवा घेणाऱ्या Layoffs.fyi या संकेतस्थळाच्या अंदाजाप्रमाणे, २०२५ मध्ये आतापर्यंत २१८ कंपन्यांमधील सुमारे १,१२,७३२ कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. संकेतस्थळाच्या होम पेजवरच हे भयसूचक आकडे ठळकपणे दर्शविले गेले असून, महिनागणिक त्यात वाढ सुरू आहे. जगातील सर्वाधिक म्हणजेच जवळपास ८० टक्के नोकऱ्या निर्माण करणाऱ्या सात क्षेत्रांमध्ये कोणते तंत्रज्ञान, कोणता परिवर्तनकारी प्रभाव निर्माण करेल, हे डब्लूईएफचा अहवाल सांगतो. सारांशात, गंडांतर केवळ तंत्रज्ञान क्षेत्रातील नोकऱ्यापुरते मर्यादित नाही. ८०/२० नियमानुसार, सारेच भरडले जाणार आहेत.

ई-मेलः sachin.rohekar@expressindia.com