मयूर युनिकोटर्स प्रामुख्याने कोटेड टेक्सटाइल फॅब्रिक्स, आर्टिफिशियल लेदर आणि पीव्हीसी व्हिनिलच्या उत्पादनात कार्यरत आहे. कंपनीची उत्पादने प्रामुख्याने फुटवेअर, फर्निशिंग, ऑटोमोटिव्ह ओईएम, ऑटोमोटिव्ह रिप्लेसमेंट मार्केट आणि ऑटोमोटिव्हसंबंधित निर्यात अशा विविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली जातात.

मयूर युनिकोटर्स भारतातील ‘रिलीज पेपर ट्रान्सफर कोटिंग टेक्नॉलॉजी’ वापरणारे सर्वात मोठी कृत्रिम लेदर उत्पादक असून गेल्या तीन दशकांत कंपनी ७ ‘पीव्हीसी कोटिंग लाइन’द्वारे दरमहा ०.२५ दशलक्ष लिनियर मीटरच्या तुटपुंज्या उत्पादनापासून ते दरमहा ३.५ दशलक्ष लिनियर मीटरपर्यंत पोहोचली आहे. याव्यतिरिक्त, कंपनीने मोरेना येथील पीयू कोटिंग प्रकल्पामध्ये वार्षिक ५ दशलक्ष लिनियर मीटरच्या सुरुवातीच्या क्षमतेसह उत्पादन सुरू केले आहे, जे दरवर्षी २० दशलक्ष लिनियर मीटरपर्यंत वाढवता येईल.

उत्पादन पोर्टफोलिओ

कंपनी पीव्हीसी-कोटेड आणि पीयू-कोटेड फॅब्रिकपासून कृत्रिम लेदरचे चारशेहून अधिक प्रकार तयार करते, जे फूटवेअर, ऑटोमोटिव्ह, फर्निचर आणि फॅशनसंबंधित उत्पादने आणि लेदर वस्तूंमध्ये वापरले जाते. ते त्यांच्या ‘डब्ल्यूओएस मयूर टेकफॅब’द्वारे ‘टेक्सचर अँड ह्यूज’ या नाममुद्रेखाली किरकोळ फर्निशिंग व्यवसायातदेखील गुंतलेले आहे.

महसूल मिश्रण

निर्यात: ३०%

फूटवेअर: २३%

घरगुती उत्पादने: २२%

ऑटो रिप्लेसमेंट: २१%

फर्निशिंग आणि इतर: ४%

कंपनी आपली उत्पादने अमेरिका, इंग्लंड, चीन, दक्षिण आफ्रिका आणि इतर युरोपीय देशांमध्ये निर्यात करते.

वितरण जाळे :

कंपनीकडे ७०० हून अधिक वितरकांचे जाळे असून लवकरच ही संख्या १,००० वितरकांवर पोहोचवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. कंपनीच्या ग्राहकांच्या मांदियाळीत मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, महिंद्र अँड महिंद्र, एमजी मोटर्स, किआ मोटर्स, फोक्सवॅगन इंडिया, ह्युंदाई, होंडा मोटार तसेच फूटवेअर उत्पादनात बाटा, पॅरागॉन, लान्सर, ॲक्शन, रिलॅक्सो, व्हीकेसी समूहाचा समावेश आहे.

उत्पादन क्षमता

कंपनीचे जयपूरजवळ दोन उत्पादन प्रकल्प असून त्यात ७ कोटिंग लाइन्ससह २ पीव्हीसी-कोटेड फॅब्रिक प्रकल्प आणि मध्य प्रदेश येथे मोनेरा येथे एक पीयू फॅब्रिक प्रकल्प आहे. देशांतर्गत संघटित विभागात सिंथेटिक लेदर उत्पादनासाठी ही सर्वात मोठी क्षमता आहे.

कंपनीने आर्थिक वर्ष २०२५ साठी दुहेरी अंकी वाढ आणि आर्थिक वर्ष २०२६ पर्यंत १,००० कोटी महसूल मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मयूर युनिकोटर्सने जून २०२५ साठी संपलेल्या तिमाहीत अपेक्षित कामगिरी करून दाखवली आहे. पहिल्या तिमाहीत कंपनीने २१६ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ४१ कोटी रूपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत तो ९ टक्क्यांनी वधारला आहे. कंपनी कर्जमुक्त असून कंपनीने मेक्सिकोमध्ये २५० कोटींच्या गुंतवणुकीसह एक नवीन प्रकल्प स्थापन करण्याची योजना आखली आहे, मात्र नवीन अमेरिकेने आयात कर लादल्यामुळे सध्या ही योजना सध्या थांबवली आहे, मात्र कंपनीचा देशांतर्गत भांडवली खर्च सुरू राहणार आहे.

उत्तम उत्पादनांचा मोठा पोर्टफोलियो, अनुभवी प्रवर्तक आणि कुठलेही कर्ज नसलेली मयूर युनिकोटर्स एक उत्तम दीर्घकालीन आणि फायद्याची गुंतवणूक ठरू शकेल. शेअरबाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सुचवलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.

मयूर युनिकोटर्स लि. (बीएसई कोड ५२२२४९)

संकेतस्थळ : http://www.mayuruniquoters.com

प्रवर्तक: सुरेशकुमार पोद्दार

बाजारभाव: रु. ४९२/-

प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: पीव्हीसी, कृत्रिम लेदर

भरणा झालेले भाग भांडवल: रु. २१.७३ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक ५८.५९

परदेशी गुंतवणूकदार ३.८५

बँक/ म्युच्युअल फंड/ सरकार ३.४५

इतर/ जनता ३४.१२

पुस्तकी मूल्य: रु. २१५

दर्शनी मूल्य: रु.५/-

लाभांश: १००%

प्रति समभाग उत्पन्न: रु. ३४.७

किंमत उत्पन्न गुणोत्तर: १४.६

समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: ४०

डेट इक्विटी गुणोत्तर: ००

इंट्रेस्ट कवरेज गुणोत्तर: १३५

रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लोईड (ROCE): २०.६७%

बीटा: ०.९

बाजार भांडवल: रु. २,१६१ कोटी (स्मॉल कॅप)

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: ६६०/४३५

गुंतवणूक कालावधी : ३० महीने

अजय वाळिंबे

Stocksandwealth@gmail.com

हा लेख गुंतवणूक सल्ला नव्हे तर अभ्यासपूर्ण विवेचन आहे.

प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहिती प्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.

लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.