काळा पैसा पांढरा करण्याचे बरेच मार्ग प्रचलित आहेत. त्यातील एक प्रकार जो नेहमी वापरला जातो तो म्हणजे ‘स्मूर्फिंग’. या प्रकारात छोटे छोटे भाग करून पैसे बँकेत जमा केले जातात. मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या बँकांमध्ये खाते उघडून त्यामध्ये सतत थोडी थोडी रक्कम जमा केली जाते. जेणेकरून कुठल्याही नियामकाच्या डोळ्यात ती येत नाही आणि काळा पैसा असा कुमार्गाने पांढरा केला जातो. नुसता पैसा जमा केला जात नाही तर काही ‘मनीऑर्डर’ सारखी आर्थिक साधने सुद्धा वापरात आणली जाऊ शकतात. म्हणून रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार आणि बँकिंग पद्धतीनुसार बँका वेळोवेळी ‘नो युवर क्लायंट’ अर्थात ‘केवायसी’ करून घेतात. आता अशी किती तरी बँक खाती उघडून, कुणाला तरी हाताशी धरून हे गैरव्यवहार केले जातात. म्हणजे समजा एक चित्रपट गृह (थिएटर) उघडले आणि त्याला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला असे दाखवले आणि सगळ्या रसिकांनी रोख रक्कम भरून तिकिटे घेतली आणि दुसऱ्या दिवशी हे सारे पैसे बँकेत जमा केल्यास शंका घेण्यास तसा वाव कमीच असतो. म्हणजे मध्यस्थी वापरून काळा पैसा पांढरा करण्यातील हा प्रकार आहे. या प्रकारात अगदी न्हाव्याचा देखील वापर करून काळा पैसा पांढरा केल्याची उदाहरणे आहेत. हेही वाचा : बाजारातील माणसं – लीव्हरचा अध्यक्षीय वारसा अजून एक प्रकार म्हणजे कर-स्वर्ग (टॅक्स हेवन) देशांमध्ये असा पैसा घेऊन जाणे आणि परदेशी गुंतवणूक म्हणून मायदेशात परत आणणे. अशी गुंतवणूक करमुक्तदेखील असते. कॅसिनो किंवा इतर जुगाराचे प्रकारसुद्धा काळा पैसा पांढरा करण्याचे साधन म्हणून वापरले जाते. गेल्या काही वर्षांपासून आभासी चलन अर्थात क्रिप्टोकरन्सीचा वापरदेखील पैसा पांढरा करण्यासाठी वापरला गेल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्याच्या आधुनिक युगात प्रॉक्सी सर्व्हर, निनावी सॉफ्टवेअर किंवा आज्ञावली हेदेखील ‘मनी लाँडरिंग’चे साधन बनले आहे. त्याला ‘इंटिग्रेशन’ असेदेखील म्हणतात. स्थावर मालमत्तेच्या व्यवहारामध्येसुद्धा संपत्तीचे मूल्यांकन कमी-अधिक करून काळा पैसा पांढरा बनवला जातो. म्हणून मध्यमवर्गीय बहुतेक वेळेला स्वच्छ आणि कायदेशीर मार्गाने व्यवहार करण्यावर भर देतात, जेणेकरून कोणत्याही कायद्याच्या कचाट्यात अडकण्यापासून सुटका होईल. अजून एक प्रकार म्हणजे बनावट (शेल) कंपन्यांचे जाळे पसरवणे आणि पैसे वळवणे. म्हणजे घोटाळा पकडला गेला तरीही या कंपन्यांचा नक्की मालक कोण हे समजू नये. म्हणजेच छोट्या छोट्या रकमा जमा करून नंतरसुद्धा त्या अशा गुंतागुंतीच्या पद्धतीने फिरवल्या जातात आणि नंतर त्यांचे परत ‘इंटिग्रेशन’ किंवा एकत्रीकरण करून हे पैसे अयोग्य कारवाईसाठी वापरले जातात. लहान आफ्रिकी देशांमध्ये तर आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्यांनी चक्क बँकेचाच ताबा घेतला आणि हवे ते व्यवहार करून घेतल्याची उदाहरणे आहेत. हेही वाचा : आर्थिक नियोजनाचे गणित आर्थिक व्यवहार करताना सामान्य माणसांना सांभाळूनच राहावे लागते. जर कुणी झटपट श्रीमंत होण्याचे आमिष दाखवले तर नक्की दहा वेळा विचार करा. कारण तुम्ही ‘मनी लाँडरिंग’च्या कुठल्या तरी टप्प्याचा भाग असू शकता.