आपल्या कुटुंबाला आपल्या पश्चात आर्थिक सुरक्षितता देणे, ही प्रत्येक कमावत्या व्यक्तीची नैतिक जबाबदारी असते. त्यासाठी आवश्यक आर्थिक नियोजनही केले जाते. परंतु अनेकदा आर्थिक नियोजन म्हणजे फक्त बचत किंवा गुंतवणूक एवढाच त्याचा मर्यादित अर्थ घेतला जातो. विमा हासुद्धा आर्थिक नियोजनाचा महत्त्वाचा भाग आहे. परंतु विमा हा बचत समजून त्यातून परताव्याची अपेक्षा ठेवली जाते. मात्र, या गैरसमजातून शुद्ध मुदत विम्याकडे (टर्म प्लॅन) दुर्लक्ष होते.

आयुष्याच्या प्रवासात काही अनपेक्षित घडल्यास कुटुंबाला अनेक वर्षांपर्यंतच्या तुमच्या उत्पन्नाची भरपाई करण्याची क्षमता शुद्ध मुदत विमा अतिशय कमी खर्चात देतो. तरीही, अनेक लोक याकडे विनाकारण खर्च म्हणून पाहतात, कारण यातून काहीही परतावा मिळत नाही असे त्यांना वाटते. पण हा विचार एखाद्या रेल्वे प्रवासादरम्यान तिकीट तपासनीस (टीसी) आला नाही म्हणून, तिकिटाचा खर्च वाया गेला, असे म्हणण्याइतकेच हास्यास्पद आहे. आयुष्याच्या प्रवासात जर तुमची आणि तिकीट तपासनीसाची भेट झाली तर तोच विमा तुमच्या कुटुंबासाठी मोठा आधार ठरतो. म्हणूनच, टर्म प्लॅन हा आर्थिक नियोजनाचा पाया आहे आणि समभागांसारख्या गुंतवणुकींनी त्यावर कळस चढतो.

नवीन जीएसटी नियमामुळे सुवर्णसंधी

अलीकडेच, शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. २२ सप्टेंबर २०२५ पासून (म्हणजे आजपासूनच) टर्म प्लॅनवरचा जीएसटी १८ टक्क्यांवरून शून्य टक्क्यांवर करण्यात आला आहे. याचा अर्थ असा की, मुदत विम्याचा प्रीमियम आता १८ टक्क्यांनी स्वस्त झाला आहे. ही एक अशी सुवर्णसंधी आहे, जी प्रत्येकाने आपल्यापश्चात कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेची खात्री करून घेण्यासाठी साधली पाहिजे. चला तर आता आपण मुदत विम्याविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेऊ.

मुदत विम्याची दोन महत्त्वाची सूत्रे

मुदत विमा घेताना दोन गोष्टी तपासल्या जातात:

आर्थिक क्षमता (Financial Undertaking): तुम्ही मागितलेली विमा रक्कम तुमच्या उत्पन्नाशी सुसंगत आहे का, हे विमा देणारी कंपनी पाहते.

आरोग्य क्षमता (Health Undertaking): तुमच्या आरोग्याची स्थिती कशी आहे, हे तपासले जाते. विमा कालावधीत मृत्यू होण्याची शक्यता पडताळली जाते. यात एक गमतीदार विरोधाभास आहे. तरुणपणी आपली आर्थिक स्थिती फारशी मजबूत नसते, त्यामुळे मोठे विमा संरक्षण मिळत नाही. पण तेव्हा आरोग्य चांगले असते. याउलट, जसजसे वय वाढते, तसे उत्पन्न वाढते, पण आरोग्याची स्थिती खालावते. त्यामुळे मोठ्या रकमेचा विमा उतरविता येत नाही किंवा घेणे अधिक खर्चीक होते / अनेकदा अशक्य होते. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन योग्य मुदत विमा कसा निवडावा, हे आपण पाहू.

मुदत विमा खरेदीचे ३ सोपे टप्पे

तुमच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांनुसार तुम्ही मुदत विम्याची योजना करू शकता:

१.पहिली पायरी

लहान रक्कम: नोकरीच्या सुरुवातीला तुम्ही लहान मुदत आणि लहान विमा रक्कम असलेली योजना घेऊ शकता, जसे की १० वर्षांसाठी १० लाखांचे विमा कवच. हे तुम्हाला विम्याचा अनुभव आणि पार्श्वभूमी देईल.

२. दुसरी पायरी

मुलांसाठी विमा कवच: जेव्हा मुले लहान असतात, तेव्हा त्यांच्या शिक्षणासाठी आणि आर्थिक गरजांसाठी अधिक मोठ्या रकमेचा मुदत विमा घ्या. ही योजना मुलांच्या कमवत्या होईपर्यंत चालेल, अशा कालावधीचा असावा.

३. तिसरी पायरी

दीर्घ मुदतीचे मोठे कवच: आरोग्य चांगले असेपर्यंत लगेचच सर्वात मोठा आणि दीर्घ मुदतीचा मुदत विमा घ्या, उदा. ७५ वयापर्यंत किंवा त्याहून अधिक काळासाठी. यामुळे कमी प्रीमियममध्ये सर्वाधिक विमा कवच मिळू शकेल.

मुदत विमा खरेदीसाठी महत्त्वाचे व्यावहारिक सल्ले:

थेट खरेदीचा पर्याय निवडा: शक्यतो मुदत विमा थेट कंपनीच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन खरेदी करा. एजंट (आणि अनेक कंपन्याही), युलिपसारख्या जास्त कमाई देणाऱ्या योजनांना प्रोत्साहन देतात, कारण त्यांना त्यातून टर्म प्लॅनच्या तुलनेत बरेच जास्त कमिशन मिळते. ते अनेकदा मुदत विम्याला परतावा मिळत नाही असे सांगून कमी लेखतात, तर युलिपमध्ये विमा आणि गुंतवणुकीचा फायदा मिळतो, तो घ्या असे सांगतात. पण लक्षात ठेवा, जगात ‘फ्री लंच’ नसतो. युलिपच्या प्रीमियममधून विम्याचा खर्च वजा करूनही, गुंतवणुकीतून मिळणारा परतावा महागाईवर बऱ्याचदा मात करू शकत नाही. त्यामुळे गुंतवणूक आणि विमा वेगळे ठेवणे गरजेचे आहे.

‘क्लेम सेटलमेंट रेशो’ आणि ‘क्लेम पेड रेशो’ तपासा: फक्त कमी प्रीमियम पाहून विमा घेऊ नका. त्याऐवजी कंपनीचा ‘क्लेम सेटलमेंट रेशो’ (दावे निकाली काढण्याचे प्रमाण) आणि ‘क्लेम पेड रेशो’ (दावे निकाली काढलेल्या रकमेचे प्रमाण) तपासा. सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्यांचा रेशो कधी कधी कमी दिसतो, कारण त्या अधिक मोठ्या प्रमाणात लोकांचा विमा काढतात, ज्यात खालच्या आर्थिक-सामाजिक स्तरातील व्यक्तींचा समावेश असतो. या स्तरातील व्यक्ती अपघाती मृत्यूसारख्या धोक्यांना जास्त सामोरे जातात आणि अनेकदा त्यांचे नातेवाईक पुरेसे पुरावे सादर करू शकत नाहीत, ज्यामुळे दाव्यांवर प्रक्रिया होण्यास वेळ लागतो.

विमा अनेक कंपन्यांमध्ये विभागून घ्या: एकाच कंपनीकडून मोठा विमा घेण्याऐवजी, कव्हरची रक्कम २ किंवा ३ भागांमध्ये विभागून ती वेगवेगळ्या कंपन्यांकडून घ्या. यामुळे भविष्यात दावा करताना एखादी कंपनी मृत्यू पश्चात दावा नाकारत असेल तर इतर कंपन्यांकडून तुमच्या वारसांना दाव्याची रक्कम मिळू शकते.

प्रत्येक पॉलिसी ही अटी आणि शर्तींच्या अधीन असते. प्रत्येक कंपनीचे काही नियम असतात. एका मोठ्या खासगी कंपनीमध्ये पदवीधर नसलेल्यांना टर्म प्लॅन मिळत नाही, अशीही काही उदाहरणे आहेत. त्यामुळे कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.

आवश्यक कागदपत्रांची माहिती ठेवा: तुम्ही निवडलेल्या कंपनीला कोणत्या वैद्यकीय चाचण्या हव्या आहेत आणि इतर आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत, याची आधीच माहिती घ्या. यामुळे तपासणी/ अर्ज प्रक्रियेत कोणताही अडथळा येणार नाही.

योग्य ‘सम अश्योर्ड’ निवडा: तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या १५ ते २० पट विमा छत्र (सम अश्योर्ड) निवडा. तसेच, मुलांचे शिक्षण आणि तुमच्यावर असलेले कर्ज यांसारख्या भविष्यातील गरजांचा विचार करा.

पॉलिसीची मुदत योग्य निवडा: तुमची पॉलिसी तुमच्या निवृत्तीच्या वयापर्यंत चालेल अशी मुदत निवडा. यामुळे तुम्ही कमवते असताना तुमच्या कुटुंबाला संरक्षण मिळेल.

या सर्व युक्तीच्या गोष्टींचा वापर करून तुम्ही तुमच्या आर्थिक नियोजनाचा भक्कम पाया रचू शकता आणि भविष्यातील अनिश्चितता दूर करू शकता. चांगला मुदत विमा हा तुमच्या आर्थिक नियोजनाचा पाया आहे. पाया मजबूत झाला की, तुम्ही समभागांसारख्या गुंतवणुकीकडे वळू शकता, जो तुमच्या आर्थिक विकासाचा कळस असेल. जीएसटीमधील कपात ही सुवर्णसंधी आहे. तेव्हा योग्य मुदत विमा लगेचच निवडा आणि तुमच्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षितता प्रदान करा.