मागील आठवड्यातील शेवटच्या दोन दिवसात बाजाराला मिळालेली गती कायम ठेवत सेन्सेक्स आणि निफ्टीने नवीन उच्चांकाच्या दिशेने आगेकूच सुरू केली आहे. शुक्रवारचा बाजार बंद झाला तेव्हा सेंसेक्स ६६५९८ (३३३ अशांनी वर) आणि निफ्टी १९८२० असा बंद झाला. निफ्टीमधील १९७८ शेअर्स वाढलेले दिसले तर १५८१ शेअर्स भावांमध्ये पसरण झालेली दिसली. सलग सहाव्या सत्रात बाजारांनी आशादायक कामगिरी बजावली आहे आणि त्यामुळे मे महिन्याच्या अखेरीस असलेले मरगळीचे सावट दूर होऊन बाजार नवीन उच्चाकाच्या दिशेने पुढे सरसावले आहेत. भारतीय शेअर बाजारांच्या आकडेवारीवर आणि वर खाली होण्यावर कायमच अमेरिकन आणि युरोपीय बाजाराचा प्रभाव असलेला दिसतो, पण जागतिक पातळीवरील आकडेवारी फारशी समाधानकारक नसली तरीही या आठवड्यात बाजारांनी चांगले प्रदर्शन केले आहे. गेल्या दोन महिन्याची आकडेवारी पाहता एका आठवड्यात २% पेक्षा जास्त वर क्लोजिंग नोंदवत सेन्सेक्स आणि निफ्टीने गुंतवणूकदारांच्या मनात आशा निर्माण केली आहे.
निफ्टीतील कोल इंडिया, एनटीपीसी, बीपीसीएल, टाटा मोटर्स, लार्सने टू ब्रो या कंपन्यांनी चांगलीच वाढ दर्शवली. युनायटेड फॉस्फरस, आयशर मोटर्स, अपोलो हॉस्पिटल्स, आयटीसी, अल्ट्राटेक यांच्या भावा मध्ये घसरण पाहायला मिळाली.
लार्सन टू ब्रो या कंपनीचे बाजार मूल्य चार लाख कोटीहून अधिक झाले आहे. सौदी अरेबियाची कंपनी अरामको कडून चार अब्ज डॉलर किमतीचे कंत्राट मिळाल्यावर एल अँड टी च्या भावामध्ये जोरदार उसळी आलेली दिसली. चार लाख कोटी बाजार मूल्य असणाऱ्या टीसीएस, रिलायन्स, एचडीएफसी बँक, इन्फोसिस आणि आयसीआयसीआय बँक यांच्या यादीत लार्सनचा समावेश झाला आहे.
आणखी वाचा: Money Mantra: ‘मिशो’च्या नफ्याचं गमक काय?
अमेरिकन सरकारच्या माध्यमातून मिळालेल्या कामाचे माझगाव डॉक च्या शेअर मध्ये प्रतिबिंब पडलेले दिसले. अमेरिकन नौदलाच्या बोटीनचे मेंटेनन्सचे आणि दुरुस्तीचे काम माझगाव डॉक ला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे कंपनीचा भाव सहा टक्क्यांनी वर गेला.
बजाज फिन्सर्व या कंपनीच्या शेअरमध्ये दोन टक्क्यांनी वाढ झालेली दिसली. या कंपनीची उप कंपनी असलेल्या बजाज आलियांज जनरल इन्शुरन्स कंपनीने नफ्याचे चांगले आकडे प्रकाशित केल्यावर बजाज फिन्सर्वचा भाव वाढलेला बघायला मिळाला.
स्टरलाइट टेक्नॉलॉजी या शेअरमध्ये दोन टक्क्याची वाढ झालेली दिसली. वेदांता या अनिल अग्रवाल यांच्या समूहातील एक कंपनी असलेल्या स्टरलाइट टेक्नॉलॉजीने अमेरिकेत ऑप्टिकल फायबर आणि ब्रॉडबँड नेटवर्क विकसित करण्याचे साउथ कॅरोलीना राज्यात मोठे काम मिळवले आहे.
आणखी वाचा: Money Mantra: सोळावं वरीस सोन्याचं! ‘हा’ फंड आपल्या …
निफ्टी ५०० मधील काही कंपन्यांमध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली. कोचिन सीपीआर्ड (साडेपाच टक्के), पॉवर फायनान्स (बारा टक्के). रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन (दहा टक्के).
हॅवेल्स इंडिया, कोल इंडिया, एन.टी.पी.सी. भारत इलेक्ट्रॉनिक्स या कंपन्यांचे शेअर्स ५२ आठवड्यातील म्हणजेच वर्षभरातील सर्वोच्च पातळीवर (५२ W High) जाऊन पोहोचले. संपूर्ण देशाचा विजेचा वापर ऑगस्ट महिन्यामध्ये मागच्या वर्षीच्या कालावधीशी तुलना करता १६ टक्के वाढला. त्यामुळे आगामी काळात ऊर्जा निर्मिती, पारेषण या सर्व कंपन्यांची बाजारात कशी उलाढाल होते हे बघणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
टेक्निकल अंदाज घेतल्यास बाजाराने जरी १९८०० ची पातळी ओलांडली असली तरी १९९५० च्या आसपास रेझीस्टन्स असायची शक्यता आहे. १९९५० च्या आसपास बाजार स्थिरावले तरी त्यात थोडीशी मरगळ निर्माण व्हायची शक्यता दिसते. तेजीवाल्यांनी असाच उत्साह दाखवला तर निफ्टी २०००० अगदी सहज काबीज करू शकतो मात्र ती पातळी कायम राखणे बाजारासाठी मोठे आव्हान ठरणार आहे.
या आठवड्याच्या शेवटी घडून येत असलेल्या दिल्लीतील G 20 परिषदेमध्ये भारताचे जागतिक अर्थकारणातील स्थान ठळक अक्षरात दिसून येणार आहे. बदलत्या भू राजकीय पार्श्वभूमीवर जगाची पुरवठा साखळी (Global Supply Chain) पुढच्या दोन दशकांमध्ये भारतच नियंत्रित करेल यासाठी सरकार आणि खाजगी क्षेत्राने जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे हे महत्त्वाचे. या दृष्टीने भारतीय शेअर बाजारातील इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील कंपन्यांना वाढीची मोठी संधी प्राप्त होणार आहे.