शक्ति पम्प्स (इंडिया) लिमिटेड (बीएसई कोड ५३१४३१)
संकेतस्थळ- http://www.shaktipumps.com
प्रवर्तक- दिनेश पाटिदार
बाजारभाव- रु. ९०३/-
प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: विविध प्रकारचे पम्प्स
भरणा झालेले भाग भांडवल: रु. १२०.२१ कोटी
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक ५०.२८
परदेशी गुंतवणूकदार ५.७२
बँक/ म्युच्युअल फंड/ सरकार ६.४२
इतर/ जनता ३७.५८
पुस्तकी मूल्य: रु. ९६.६
दर्शनी मूल्य: रु. १०/-
लाभांश: १०%
प्रति समभाग उत्पन्न: रु. ३४
किंमत उत्पन्न गुणोत्तर: २७.३
समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: ४३
डेट इक्विटी गुणोत्तर: ०.१४
इंट्रेस्ट कवरेज गुणोत्तर: १३.६
रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लाॅईड (आरओसीई): ५५.३%
बीटा: ०.६
बाजार भांडवल: रु. ११,१४३ कोटी (मिड कॅप)
वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: १३९८/६४८
गुंतवणूक कालावधी : २४ महिने
वर्ष १९८२ मध्ये स्थापन झालेली शक्ति पम्प्स (इंडिया) लिमिटेड प्रामुख्याने विविध प्रकारचे पम्प आणि मोटर्सचे उत्पादन करते. ती सिंचन, फलोत्पादन, घरगुती पाणीपुरवठा, व्यावसायिक आणि औद्योगिक अनुप्रयोग अशा विस्तृत श्रेणीसाठी आधुनिक जल वाहिनी (वॉटर पम्पिंग सोल्यूशन्स) पर्यायदेखील देते. शक्ति पम्प्स ही ऊर्जा-कार्यक्षम पम्पिंग सोल्यूशन्सच्या क्षेत्रात एक अग्रणी कंपनी असून पाणी आणि अक्षय्य ऊर्जा क्षेत्रात सातत्याने नावीन्यता आणत आहे. मध्य प्रदेशातील पिथमपूर येथे मुख्यालय असलेली ही कंपनी उच्च-कार्यक्षमता पम्प आणि मोटर्सच्या डिझाइन आणि निर्मितीमध्ये जागतिक आघाडीवर आहे. भारतीय बाजारपेठेत शक्ति पम्प्सचा हिस्सा २५ टक्के आहे.
प्रमुख उत्पादने
अ) पम्प: सबमर्सिबल पम्प, सोलर पम्प, व्हर्टिकल मल्टीस्टेज सेंट्रीफ्यूगल पम्प मोनो एंड सक्शन पम्प, प्रेशर बूस्टर पम्प, सांडपाणी पम्प, ओपन वेल पम्प, इ.
ब) मोटर्स: सबमर्सिबल मोटर्स, ईव्ही मोटर्स, सरफेस मोटर्स, इ.
क) कंट्रोलर्स: युनिव्हर्सल सोलर पम्प कंट्रोलर, शक्ति सोलर ड्राइव्ह, शक्ति एलिट सॉफ्ट स्टार्टर, हायब्रिड कंट्रोलर्स, इ.
ड) इतर: मेकॅनिकल सील, हायड्रो न्यूमॅटिक पीएलसी पॅरामीटर सेटिंग मॅन्युअल, सोलर स्ट्रक्चर्स, इ.
विद्युत वाहन श्रेणी
इलेक्ट्रिक मोटर उत्पादनातील चार दशकांहून अधिक उत्कृष्टता आणि पॉवर इलेक्ट्रॉनिक्समध्ये पाच वर्षांच्या विशेषज्ञतेवर आधारित, शक्ति पम्प्सने अलीकडेच तिच्या पूर्ण मालकीच्या उपकंपनी – शक्ति ईव्हीद्वारे इलेक्ट्रिक व्हेईकल (ईव्ही) परिसंस्थेमध्ये प्रवेश केला आहे. कंपनी आता ईव्ही मोटर्स, चार्जर्स, कंट्रोलर्स आणि मल्टी-ॲप्लिकेशन व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राइव्ह (व्हीएफडी) तयार करते.
उत्पादन क्षमता
सोलर आणि सबमर्सिबल पम्प आणि मोटर्सचे इन-हाऊस उत्पादन करण्यास सक्षम असलेल्या काही भारतीय उत्पादकांपैकी ही कंपनी आहे. मध्य प्रदेशातील पीथमपूर येथे तीन उत्पादन सुविधा प्रकल्प चालवत आहे, ज्यांची वार्षिक स्थापित क्षमता पुढीलप्रमाणे आहे:
पम्प आणि मोटर्स: ५००,०००, स्ट्रक्चर्स: १००,००० आणि इन्व्हर्टर व व्हीएफडी: २००,०००
ग्राहक मिश्रण
कंपनी सौरऊर्जा, शेती, व्यावसायिक, सांडपाणी आणि औद्योगिक इत्यादी विविध उद्योगांमधील ग्राहकांना सेवा पुरवते.
१) सरकारी प्रकल्प: (महसूल ७७ टक्के) कंपनी पीएम कुसुम योजनेची सर्वात मोठी लाभार्थी आहे, हरियाणा, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र इत्यादी ठिकाणी १,१५,००० हून अधिक सौर पंप बसवले आहेत.
२) निर्यात: (महसूल १७ टक्के) कंपनी शंभरहून अधिक देशांमध्ये तिची उत्पादने आणि उपाय निर्यात करते. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये, तिने सौरऊर्जेवर चालणाऱ्या पाण्याच्या पम्पिंगचा पुरवठा करण्यासाठी युगांडा सरकारकडून ३५.३० दशलक्ष डॉलरचा कार्यादेश प्राप्त केला. हा आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचादेखील एक भाग आहे, ज्याची २२ देशांमध्ये एकूण २,७०,००० सौर पम्पांची मागणी आहे.
वितरण विस्तार
कंपनीकडे संपूर्ण भारतात ६० वितरक असून , ५०० हून अधिक वितरक आणि ४०० हून अधिक सेवा केंद्रांचा वितरण विस्तार आहे, जे सुमारे १,२०० उत्पादने वितरित करतात.
शक्ति पम्प्सचे ३१ मार्च २०२५ अखेर सरलेल्या आर्थिक वर्षांचे निकाल उत्कृष्ट आहेत. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत कंपनीने उलाढालीत ८४ टक्के वाढ साध्य करून ती २,५१६ कोटींवर गेली आहे तर नक्त नफ्यात तब्बल १८८ टक्के वाढ होऊन तो ४०८ कोटींवर गेला आहे. मे २०२५ मध्ये कंपनीकडे सुमारे १,६५४ कोटी रुपयांचे कार्यादेश होते. आगामी काळातही सौर ऊर्जा प्रोत्साहन चालू राहील तसेच पंतप्रधान कुसुम योजना, मागेल त्याला सौर कृषी पंप योजना, प्रधान मंत्री कृषक मित्र सूर्य योजना, जल जीवन मिशन, इ. अनेक सरकारी योजनांचा कंपनी निश्चित लाभ घेईल.
उत्तम उत्पादनांचा मोठा पोर्टफोलिओ, अनुभवी प्रवर्तक आणि अत्यल्प कर्ज असलेली ही कंपनी गुंतवणुकीस आकर्षक वाटते. सध्या ९०० रुपयांच्या आसपास उपलब्ध असलेला हा शेअर एक उत्तम दीर्घकालीन गुंतवणूक ठरू शकेल.
शेअर बाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सुचवलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.
अजय वाळिंबे
Stocksandwealth@gmail.com
• हा लेख गुंतवणूक सल्ला नव्हे तर अभ्यासपूर्ण विवेचन आहे.
• प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्स मध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहिती प्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनी कडून कुठलेही मानधन अथवा भेट वस्तु घेतलेली नाही.
• लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअर मधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.