Market Week Ahead: रिझर्व्ह बँकेने आजवरचा सर्वोच्च असा २.६९ लाख कोटी रुपयांचा लाभांश केंद्र सरकारला हस्तांतरित करून पुन्हा एकदा केंद्राला मदतीचा भक्कम हात दिला. सरलेल्या शुक्रवारी शेअर बाजारातील सत्रसांगतेनंतर आलेले हे वृत्त, येत्या आठवड्यात बाजारात उत्साह तरंग निर्माण करताना दिसेल. सेन्सेक्स-निफ्टी दोन्ही निर्देशांकांनी सप्ताहाची सांगता प्रत्येकी एक टक्क्यांच्या मुसंडीने केली. तरी आधीच्या आठवड्यात ४ टक्क्यांच्या साप्ताहिक कमाईच्या तुलनेत, या निर्देशांकांचे सप्ताहातील नुकसान जवळपास पाऊण टक्क्यांचे राहिले. शुक्रवारच्या तेजीमुळे, आठवड्याच्या सुरूवातीला दिसलेल्या तोट्याला जवळपास निम्म्याने भरून काढण्याइतका बाजार सावरू शकला. एक वैशिष्ट्य असेही की, आठवड्यातील पाचपैकी तीन सत्रांमध्ये परदेशी गुंतवणूकदारांनी शेअर्सची विक्री केली, जी अलिकडे दिसून आलेल्या प्रवाहाच्या विपरित होते.
साप्ताहिक कामगिरीवर दृष्टिक्षेपः
० सेन्सेक्स – ८१,७२१.०८ घसरण ६०९.५१ (-०.७१%)
० निफ्टी – २४,८५३.१५ घसरण १६६.६५ (-०.७०%)
० रुपया – ८५.४५ / डॉलर (+३० पैसे)
० सोने – ९८,७५० रु./ १० ग्रॅम (+२,३०० रु.)
० खनिज तेल – ६४.३० डॉलर/ पिंप (-०.२४%)
संरक्षणापासून ते पायाभूत सोयीसुविधांचा विकास आणि शिक्षण ते लोककल्याणापर्यंत सर्व गोष्टींवर खर्च वाढवत नेण्याचा ताण सरकारी तिजोरीवर असतोच. या खर्चाची तरतूद महसुलात वाढ करत केली जाते. तथापि करोत्तर महसूलाचे स्रोतही मोठे असतील आणि त्यायोगे पावणे तीन लाख कोटी रुपयांपर्यंतचे योगदान येणे म्हणजे सरकारी तिजोरीसाठी अतिरिक्त हातभारच ठरतो. रिझर्व्ह बँकेकडून विक्रमी लाभांश हस्तांतरणामुळे, केंद्राची वित्तीय तूट कमी होण्याची आशा आहे. तुटीवर नियंत्रण म्हणजेच महागाईवरही नियंत्रण आणि त्या परिणामी अर्थव्यवस्थेचा जलद विकास आणि व्याजदर कपातीसाठी रिझर्व्ह बँकेला मोठा वाव निर्माण होतो. येणाऱ्या आठवड्यात देशाच्या अर्थव्यवस्थेचा अर्थात जीडीपी वाढीचा दर, वित्तीय तुटीची स्थिती आणि पर्यायाने सलग तिसऱ्यांदा व्याजदर कपातीची शक्यता, अशा महत्त्वपूर्ण घटनांसंबंधाने आशा-अपेक्षांवर बाजारातील व्यवहार फेर धरताना दिसतील.
आगामी २६ मे ते ३० मे आठवड्यातील लक्षणीय घडामोडीः
० जेरॉम पॉवेल यांचे भाषणः
अमेरिकेची मध्यवर्ती बँक असलेल्या फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल हे प्रिन्स्टन विद्यापीठात भाषण देणार आहेत. अर्थव्यवस्था आणि पतविषयक धोरणावरील संकेतांसाठी या भाषणावर जागतिक गुंतवणूकदारांचे लक्ष असेल. कार्यक्रमाचे स्वरूप व ठिकाण पाहता, कदाचित ते तसे काही भाष्य करणारही नाहीत. परंतु, जर त्यांनी तसे काही संकेत दिले तर, सोमवारी (२६ मे) जागतिक शेअर बाजार खुले होण्यापूर्वी तो मोठा प्रभावकारी घटक ठरेल. अर्थात याच आठवड्यात बुधवारी (२८ मे) फेडच्या ६-७ मे रोजी झालेल्या मागील बैठकीचे इतिवृत्तही प्रसिद्ध होऊ घातले आहे.
० अमेरिकेच्या ‘जीडीपी’वाढीची स्थिती
जगातील सर्वात मोठी अर्थसत्ता असलेल्या अमेरिकी अर्थव्यवस्थेच्या मंदीच्या भीतीला गडद करणाऱ्या घडामोडींना सध्या तोटा नाही. त्यातच तिच्या जानेवारी ते मार्च २०२५ तिमाहीतील विकासदरासंबंधाने दुसरा अंदाज गुरुवारी (२९ मे) जाहीर होईल. या तिमाहीसंबंधाने पहिल्या अग्रिम अंदाजाने या अर्थसत्तेला कुंठितावस्थेने घेरल्याचे सूचित केलेले आहे.
० भारताची जीडीपी आकडेवारी
जानेवारी ते मार्च २०२५ या तिमाहीसाठी आणि २०२४-२५ या संपूर्ण आर्थिक वर्षात भारताच्या अर्थव्यवस्थेची कामगिरी शुक्रवारी (३० मे) जाहीर होऊ घातली आहे. डिसेंबर २०२४ मध्ये संपलेल्या तिमाहीत अर्थव्यवस्थेचा विस्तार ६.२ टक्क्यांनी झाला होता, तर शेवटच्या तिमाहीत ६.८ टक्क्यांपर्यंत वधारण्याचा अंदाज आहे. त्यामुळे संपूर्ण आर्थिक वर्षासाठी जीडीपी वाढ ही ६.३ टक्के ते ६.५ टक्क्यांच्या घरात असेल, असे विश्लेषकांचे अनुमान आहे. मागील २०२३-२४ मधील ९.२ टक्क्यांच्या तुलनेत ही मोठी घसरण असली, तरी जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये हा वाढीचा दर सर्वोच्च असण्याचे आणि जगातील सर्वात वेगवान अर्थव्यवस्था भारताचे स्थान कायम राहण्याची आशा आहे. अपेक्षेप्रमाणे ६.३ टक्क्यांपेक्षा जास्त जीडीपी वाढीचा दर राहिल्यास, जूनच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या बैठकीत रिझर्व्ह बँकेकडून सलग तिसरी व्याजदर कपात केली जाईल, अशा आशांना पंख फुटून शेअर बाजारात तेजीची लाट दिसण्याची शक्यता आहे.
० भारताची औद्योगिक उत्पादन वाढः
भारताच्या कारखानदारी क्षेत्राची कामगिरी दर्शविणाऱ्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकाची (आयआयपी) कामगिरी बुधवारी (२८ मे) जाहीर केली जाईल. आधीच्या मार्चमध्ये ही उत्पादन वाढ अवघ्या ३ टक्क्यांची होती. एप्रिलचे आकडे यापेक्षा वेगळे अपेक्षित नसले, तरी मार्चच्या तुलनेत ते निराशा निर्माण करणारे नसावेत, असे अंदाजले जात आहे. शिवाय केंद्र सरकारच्या एप्रिल महिन्यातील खर्च व महसुली उत्पन्न आणि त्यातील तफावत अर्थात वित्तीय तुटीची आकडेवारी शुक्रवारी (३० मे) रोजी जाहीर होत आहे.
० कंपन्यांची तिमाही कामगिरी
आर्थिक वर्षाच्या चौथ्या (जानेवारी ते मार्च २०२५) तिमाहीच्या निकालांचा हंगाम शेवटच्या टप्प्यात असून, आगामी आठवड्यात अनेक बड्या कंपन्यांच्या आर्थिक कामगिरी गुंतवणूकदारांकडून बारकाईने तपासली जाईल. या कंपन्यां अशा-
० सोमवार, २६ मेः ऑरबिंदो फार्मा, ब्लू डार्ट एक्सप्रेस, जिलेट इंडिया, सुमितोमो केमिकल इंडिया
० मंगळवार, २७ मे: भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयी), मेडप्लस हेल्थ सर्व्हिसेस, इन्फो एज (इंडिया), बॉश
० बुधवार, २८ मे: इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी), बाटा इंडिया, कमिन्स इंडिया, आयएफबी इंडस्ट्रीज, नॅटको फार्मा, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया (सेल)
० गुरुवार, २९ मे: बजाज ऑटो, अमारा राजा एनर्जी अँड मोबिलिटी, गुजरात पिपावाव पोर्ट, इप्का लॅबोरेटरीज, लेमन ट्री हॉटेल्स, प्रॉक्टर अँड गॅम्बल हेल्थ, प्रेस्टीज इस्टेट्स प्रोजेक्ट्स, शोभा
० शुक्रवार, ३० मे: अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइझ, एफएसएन ई-कॉमर्स व्हेंचर्स, एसएमएल इसुझू
निकाल अपेक्षेनुरूप नसले तर त्याचे बाजारात खूपच तिखट प्रतिसाद उमटतात. त्या उलट चांगल्या निकालांचे बाजारात स्वागतही होत असते, जे अलिकडे अनेक उदाहरणांत दिसलेही आहे.