ताजजीव्हीके हॉटेल्स अँड रिसॉर्टस लिमिटेड (बीएसई कोड: ५३२३९०)
संकेतस्थळ: http://www.tajgvk.in
प्रवर्तक: इंडियन हॉटेल्स आणि जीव्हीके समूह
बाजारभाव: रु.४१६/-
प्रमुख उत्पादन/ व्यवसाय : हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स
भरणा झालेले भाग भांडवल: रु. १२.५४ कोटी
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक ७४.९८
परदेशी गुंतवणूकदार ०.८३
बँक/ म्युच्युअल फंड/ सरकार ३.६३
इतर/ जनता २०.५६
पुस्तकी मूल्य: रु. १०५
दर्शनी मूल्य: रु. २/-
गतवर्षीचा लाभांश: १००%
प्रति समभाग उत्पन्न: रु. २२.५
किंमत उत्पन्न गुणोत्तर: २२
समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: ३६.८
डेट इक्विटी गुणोत्तर: ०.०७
इंट्रेस्ट कवरेज गुणोत्तर: २१.७
रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लोइड (आरओसीई): २०.८%
बीटा : १.३
बाजार भांडवल: रु. २६०६ कोटी (स्मॉल कॅप)
वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: ५२८/२८२
गुंतवणूक कालावधी : ३० महिने
वर्ष १९९५ मध्ये स्थापन झालेली ताजजीव्हीके हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स लिमिटेड ही हैदराबादस्थित जीव्हीके समूह आणि इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड (आयएचसीएल) यांच्यातील संयुक्त उपक्रम आहे. कंपनी ‘ताज’ या नाममुद्रेने हॉटेल्स, पॅलेस आणि रिसॉर्ट्सची मालकी, संचालन आणि व्यवस्थापन करते. टाटा समूहाची इंडियन हॉटेल्स ही दक्षिण आशियातील हॉटेल्सची सर्वात मोठी आणि नामांकित साखळी आहे. ती कंपनीच्या अंतर्गत असलेल्या सर्व ६ मालमत्तांचे कामकाज देखील व्यवस्थापित करते. इंडियन हॉटेल्सचा कंपनीमध्ये २५.५२ टक्के हिस्सा आहे.
हॉटेल पोर्टफोलिओ
ताजजीव्हीकेकडे एकत्रित स्तरावर सुमारे १,२४० खोल्यांच्या इन्व्हेंटरीसह सहा हॉटेल मालमत्तांची मालकी आहे. ताज कृष्णा, ताज डेक्कन आणि विवांता यांचाही समावेश असून एकूण ६०१ खोल्या आहेत. परिसरातील इतर मालमत्तांच्या तुलनेत प्रति सरासरी खोली प्रीमियम उच्च आहे. कंपनीचे चंदीगडमध्ये (ताज चंदीगड) १४९ खोल्यांचे हॉटेल आणि चेन्नईमध्ये (ताज क्लब हाऊस) २२० खोल्यांचे हॉटेल आहे. त्यांच्याकडे मुंबईतील ताज सांताक्रूझ ही २७९ खोल्यांची मालमत्ता आहे. मुंबई विमानतळाजवळील ताज त्यांच्या जेव्ही ग्रीन वुड्स पॅलेसेस अँड रिसॉर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडद्वारे असून त्यात कंपनीचा ४९ टक्के हिस्सा आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात कंपनीचे बंगळूरु येथील नवीन हॉटेल सुरू होईल.
महसूल मिश्रित आर्थिक वर्ष २५
खोल्या, अन्न, रेस्टॉरंट महसूल – ९७ टक्के
सदस्यता शुल्क आणि इतर – ३ टक्के
ताजजीव्हीकेचा गेल्या आर्थिक वर्षातील सरासरी ऑक्युपन्सी रेट ८२ टक्के होता.
हॉटेल नूतनीकरण
आर्थिक वर्ष २०२४ मध्ये, कंपनीने हैदराबादमधील ताज डेक्कन येथील हॉटेल ताज कृष्णा येथील सार्वजनिक क्षेत्रे, अतिथी खोल्या आणि सार्वजनिक क्षेत्रांच्या नूतनीकरणावर २१ कोटी रुपये खर्च केले होते. ताज डेक्कन येथील एका स्पेशॅलिटी रेस्टॉरंट आणि बारचे नूतनीकरण देखील जुलै २०२५ मध्ये पूर्ण होऊन अधिकतम २४ अतिथी खोल्या आता वापरात आल्या आहेत.
आगामी प्रकल्प
कंपनीला हॉटेल प्रकल्पासाठी बेंगळूरुतील येल्लाहंका येथे ७.५ एकर जमीन देण्यात आली आहे आणि तिला केआयएडीबीकडून इमारतीची मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पात २५६ खोल्या असून प्रकल्प खर्च सुमारे ३२६ कोटी रुपये आहे. प्रकल्पाला अंशतः वित्तपुरवठा करण्यासाठी त्यांनी फेडरल बँकेकडून २०० कोटी रुपयांची आर्थिक मदत करारबद्ध केली आहे. आर्थिक वर्ष २५ पर्यंत, ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. सर्व परवाने आणि मंजुरी मिळून कंपनीला आर्थिक वर्ष २६ च्या चौथ्या तिमाहीत हॉटेल उघडण्याची अपेक्षा आहे.
कंपनीचे यंदाच्या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. या कालावधीत कंपनीने १०६ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ४१ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे, जो गेल्या आर्थिक वर्षातील तिमाहीच्या तुलनेत तब्बल १४२ टक्क्यांनी अधिक आहे. आगामी काळात बंगळूरु येथील हॉटेल सुरू झाल्यावर कंपनीकडून भरीव कामगिरीची अपेक्षा आहे. अनुभवी प्रवर्तक, प्रसिद्ध ब्रॅंड केवळ १२.५४ कोटी भाग भांडवल असलेल्या आणि सध्या कुठलेही कर्ज नसलेल्या ताजजीव्हीकेचे शेअर सध्या ४०० रुपयाच्या आसपास उपलब्ध आहेत. एक दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून या बहुमूल्य स्मॉल कॅपचा जरूर विचार करा.
सध्याची शेअरबाजारातील अनिश्चितता पाहता सुचवलेले समभाग कमी बाजारभावात मिळू शकतात, यामुळे प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.
अजय वाळिंबे
stocksandwealth@gmail.com
• प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहिती प्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेट वस्तू घेतलेली नाही.
• हा गुंतवणूक सल्ला नाही
• लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअर मधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.