जसजसा मार्च महिना जवळ येतो तसे विद्यार्थ्यांना परीक्षेचे आणि ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांना टॅक्स वाचवायचे टेन्शन येते. इन्कम टॅक्स वाचवणे आणि इन्कम टॅक्स चुकवणे यातला फरक लक्षात घेऊया. आपल्याला आपल्या उत्पन्नाच्या ठराविक टक्के इन्कम टॅक्स भरावा लागतो. पण आपले उत्पन्न जसे वाढत जाईल तशी त्या टॅक्सची रक्कम सुद्धा वाढत जाते म्हणजेच तुमचं उत्पन्न जास्त असेल तर जास्त इन्कम टॅक्स भरावा लागतो.
टॅक्स वाचवणे शक्य आहे का ?
तुमच्या ऑफिस मधून कोणत्या टॅक्स सेव्हिंग गुंतवणुक केली आहे याचे डिटेल्स मागितले जातात आणि जर ते वेळेत दिले नाही तर फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये तुमच्या पगारातून टॅक्स कापला जातो. मग आयत्यावेळी कोणताही अभ्यास न करता घाईघाईने टॅक्स वाचवण्यासाठी गुंतवणूक केली जाते हे स्मार्ट गुंतवणूकदारांनी टाळायला हवे.
हेही वाचा >>>Money Mantra: फिनटेकमधले हे बदल आपलं आर्थिक गणित कसं बदलू शकतात?
प्रत्येक कमावत्या व्यक्तीला इन्कम टॅक्स मध्ये बचत करण्याचा राजमार्ग उपलब्ध आहे तो म्हणजे टॅक्स सेव्हिंग गुंतवणूक करणे. तुम्ही २०२३-२०२४ या वर्षाचं नियोजन केलं नसेल तर अजूनही महिनाभर हातात आहे. टॅक्स वाचवण्यासाठी आयत्या वेळेला कुठल्यातरी विमा पॉलिसी विकत घेणे असा दुर्दैवी निर्णय तुम्ही घेऊ नका.
इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट यात गफलत टाळूया
इन्व्हेस्टमेंट केल्यावर तुम्हाला त्यावर रिटर्न्स मिळतात, विमा विकत घेतल्यावर तुम्हाला विमा कवच मिळतं. तुम्ही फक्त टर्म प्लॅन हा एकच विमा प्रकार विकत घेतला पाहिजे ज्यामध्ये कमी प्रीमियम मध्ये जास्त रकमेचे विमा कवच मिळू शकते.
टॅक्स वाचवण्याचे मार्ग कोणते ?
पुढील तक्त्यामध्ये टॅक्स वाचवण्याचे पर्याय आणि त्यातील जोखीम याविषयी माहिती दिली आहे.
कोणता पर्याय अधिक फायदेशीर ?
सध्याच्या परिस्थितीत व्याजदराचा आकडा बघता म्युच्युअल फंडातील ई.एल.एस.एस. योजना हा टॅक्स वाचवण्याचा सर्वोत्तम उपाय आहे. याचे कारण यातील गुंतवणूक इक्विटी शेअर्समध्ये केलेली असते. या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर तीन वर्षाचे लॉक इन हा नियम लक्षात घ्यायचा असतो. म्हणजेच १ मार्च २०२४ या दिवशी एखाद्याने म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली तर तीन वर्ष त्याला ते पैसे परत मिळत नाहीत, म्हणजेच फंड विकता येत नाही. यात एक सकारात्मक बाब अशी की फंड मॅनेजरला गुंतवणूक करण्यासाठी तीन वर्षाचा कालावधी मिळत असल्याने तो गुंतवणूक योग्य पद्धतीने प्लॅन करू शकतो. म्युच्युअल फंडाच्या विविध कंपन्यांच्या योजनांचा विचार केल्यास आणि त्यांचे मागच्या तीन ते पाच वर्षातले रिटर्न्स बघितल्यास ‘म्युच्युअल फंड सही है’ या वाक्याची प्रचिती नक्कीच येईल.
हेही वाचा >>>Money Mantra : विमा गुंतवणूक आणि त्यावर प्राप्तिकर कायद्यातून मिळणाऱ्या सवलती समजून घ्या
ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला खर्चासाठी पैसे लागणार असतील आणि कर वाचवायचा असेल तर ज्येष्ठ नागरिक बचत योजना या भारतीय पोस्टातील योजनेचा विचार आवश्यक करा. या योजनेमध्ये जे पैसे गुंतवले जातात त्यावर करामध्ये सवलत मिळते मात्र यावर मिळणारे व्याज तुमच्या वार्षिक उत्पन्नामध्ये दाखवून त्यावर टॅक्स बसतो. या योजनेमध्ये दर तीन महिन्यांनी व्याज खात्याला जमा केले जाते. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) हा सुद्धा कर वाचवण्याचा आणि चांगला परतावा मिळण्याचा मार्ग आहे. यामध्ये पोस्टातून गुंतवणूक करून करामध्ये बचत करता येते. याचा व्याजदर केंद्र सरकारकडून जाहीर केला जातो. मात्र या योजनेत पैसे दरवर्षी किंवा दर महिन्याला न मिळता मॅच्युरिटीच्या वेळी सरसकट रक्कम हातात येते व त्यावेळी ती करपात्र असते. तुमचे इन्कम टॅक्स रिटर्न भरताना याचा विचार करायला लागतो.