करदात्याला स्वतःच्या उत्पन्नावर कर भरावा लागतो, तसेच काही परिस्थितीत दुसऱ्यांच्या उत्पन्नावरसुद्धा कर भरावा लागू शकतो. जेव्हा एखादी व्यक्ती कर चुकविण्यासाठी किंवा त्या उद्देशाने आपली संपत्ती किंवा उत्पन्न दुसऱ्याच्या नावाने हस्तांतरित करते आणि स्वतःचे करदायित्व कमी करते तेव्हा अशा पद्धतीने कर चुकविणाऱ्या व्यक्तींवर अंकुश लावण्यासाठी प्राप्तिकर कायद्यात काही तरतुदी आहेत. जेणेकरून कर चुकवेगिरीला आळा बसेल. अशा अवैध रीतीने करदायित्व कमी करण्याच्या पद्धतीवर आळा घालण्यासाठी उत्पन्नाच्या क्लबिंगच्या तरतुदी प्राप्तिकर कायद्यात आणल्या गेल्या आहेत. काही वेळेला अजाणतेपणे असे व्यवहार केले जातात. असे व्यवहार कोणते आणि प्राप्तिकर कायद्यात त्याविषयी काय तरतुदी आहेत हे करदात्याने जाणून घेतले पाहिजे.

व्यवहार जाणीवपूर्वक केले पाहिजेत जेणेकरून वैध रीतीने ते विवरणपत्रामध्ये दाखवून त्यावर योग्य तो कर भरून व्याज आणि दंडापासून सुटका करून घेता येते. मागील लेखात आपण करदात्याला विविध प्रसंगांत मिळालेल्या भेटींची करपात्रता बघितली. ठरावीक नातेवाईकांकडून मिळालेल्या भेटी करमुक्त आहेत, परंतु काही भेटी किंवा व्यवहार असे आहेत की, त्यावर उत्पन्नाच्या क्लबिंगच्या तरतुदी लागू होतात. या उत्पन्नाच्या ‘क्लबिंग’च्या तरतुदी करदात्याला माहीत नसल्या तर करदात्याला कर, व्याज आणि दंड भरावा लागू शकतो.

उत्पन्नाच्या ‘क्लबिंग’च्या तरतुदी काय आहेत.

सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास उत्पन्नाचे ‘क्लबिंग’ म्हणजे स्वतःच्या उत्पन्नात दुसऱ्याचे उत्पन्न मिळवून त्यावर कर भरणे. हे काही विशिष्ट परिस्थितीत करणे भाग पडते. प्राप्तिकर कायद्यात दुसऱ्याच्या उत्पन्नावर भराव्या लागणाऱ्या करांच्या तरतुदीसाठी एक स्वतंत्र ‘चॅप्टर’ आहे. करदात्याने असे व्यवहार केल्यास त्यावर कोणी कर भरावा याची माहिती यात दिली आहे.

१. कलम ६० : मालमत्तेच्या हस्तांतरणाशिवाय उत्पन्नाचे हस्तांतरण : मालमत्तेची मालकी हस्तांतरित केल्याशिवाय उत्पन्न दुसऱ्याच्या नावाने दाखविल्यास ते उत्पन्न मालमत्तेची मालकी असणाऱ्यालाच करपात्र असते. याचे सामान्यतः आढळणारे उदाहरण म्हणजे घर पतीच्या नावाने आहे, पत्नी गृहिणी आहे आणि हे घर भाड्याने देऊन त्याचा घरभाडे करारनामा पत्नीच्या नावाने करून घरभाडे पत्नीच्या नावाने घेणे. असे करून घरभाड्यावर पत्नीचे उत्पन्न कमाल उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा कमी असल्यामुळे पत्नीला कर भरावा लागणार नाही आणि एकूणच कराची बचत होईल. अशा अवैध रीतीने कर बुडविण्यावर आळा घालण्यासाठी ही तरतूद आहे. या कलमानुसार या घरभाड्यावर पतीलाच त्याच्या उत्पन्नाच्या टप्प्यानुसार कर भरावा लागेल.

२. कलम ६१ : मालमत्तेचे रद्द करण्यायोग्य हस्तांतरण : कोणतेही हस्तांतरण ‘रिव्होकेबल ट्रान्सफर’ म्हणजेच, मालमत्ता हस्तांतरित केल्यानंतर त्याचा मालकी हक्क कोणत्याही क्षणी परत मिळवण्याची परवानगी देणारे असल्यास अशा हस्तांतरित केलेल्या मालमत्तेचे उत्पन्न हे हस्तांतरित करणाऱ्यालाच या कलमानुसार करपात्र असते.

३. कलम ६४ : करदात्याचे, उद्योग-व्यवसाय करणाऱ्या कंपनीत २० टक्क्यांपेक्षा जास्त समभाग असतील किंवा भागीदारी संस्थेत २० टक्क्यांपेक्षा जास्त हिस्सा असेल आणि अशा कंपनी किंवा भागीदारी संस्थेतून त्याच्या पती/पत्नीला काही उत्पन्न (व्याज, वेतन, दलाली, वगैरे) मिळाले असेल तर ते करदात्याचे उत्पन्न समजले जाते. जर करदात्याची पत्नी/पती ज्यांना हे उत्पन्न दिले आहे, त्यांच्याकडे काही तांत्रिक किंवा व्यावसायिक पात्रता असेल तर ते उत्पन्न करदात्याचे समजले जात नाही. उदा. करदात्याची आणि त्याच्या पत्नीची भागीदारी संस्था आहे आणि दोघेही डॉक्टर आहेत, अशा बाबतीत ‘क्लबिंग’च्या तरतुदी लागू होत नाहीत.

पती/पत्नीला मोबदल्याशिवाय किंवा अपुऱ्या मोबदल्याने हस्तांतरित केलेल्या संपत्तीतून मिळालेले उत्पन्न हे संपत्ती हस्तांतरित करणाऱ्याचे उत्पन्न समजले जाते. उदा. पतीने पत्नीला १० लाख रुपये हस्तांतरित केले आणि पत्नीने ते मुदत ठेवीत गुंतविले, तर त्या मुदत ठेवीवर मिळालेल्या व्याजावर पतीला कर भरावा लागेल.

करदात्याने त्याच्या सुनेला मोबदल्याशिवाय किंवा अपुऱ्या मोबदल्याने हस्तांतरित केलेल्या संपत्तीतून मिळालेले उत्पन्न हे संपत्ती हस्तांतरित करणाऱ्याचे उत्पन्न समजले जाते. उदा. सासऱ्याने त्याच्या सुनेला १० लाख रुपये हस्तांतरित केले आणि सुनेने ते मुदत ठेवीत गुंतविले, तर त्या मुदत ठेवीवर मिळालेल्या व्याजावर सासऱ्याला कर भरावा लागेल.

एखाद्या करदात्याने कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीला किंवा ट्रस्टला मोबदल्याशिवाय किंवा अपुऱ्या मोबदल्याने हस्तांतरित केलेल्या संपत्तीतून मिळालेले उत्पन्न हे लाभार्थी म्हणून पती/पत्नीला किंवा सुनेला मिळणार असेल तर ते उत्पन्न संपत्ती हस्तांतरित करणाऱ्याचे म्हणून समजले जाते.

अल्पवयीन मुलांना (ज्यांचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आहे) मिळालेले उत्पन्न पालकाच्या उत्पन्नात (ज्याचे उत्पन्न जास्त आहे) गणले जाते. त्यामुळे अजाण मुलांच्या नावाने ठेवलेल्या गुंतवणुकीवर पालकांनाच कर भरावा लागतो. याला काही अपवाद आहेत. अल्पवयीन अपंग मुले किंवा अल्पवयीन मुलांनी कौशल्य, प्रतिभा वगैरेंने मिळविलेले उत्पन्न हे पालकांच्या उत्पन्नात गणले जात नाही.
काही महत्त्वाचे मुद्दे :

१. लग्नापूर्वी दिलेल्या भेटी : पती किंवा पत्नीने आपल्या लग्नापूर्वी भावी पती किंवा पत्नीला हस्तांतरित केलेल्या पैशातून मिळालेल्या उत्पन्नावर ‘क्लबिंग’च्या तरतुदी लागू होत नाहीत, कारण लग्नापूर्वी पती-पत्नी हे नाते अस्तित्वात नसते. असे लग्नापूर्वी मिळालेल्या भेटींवरील उत्पन्नासाठी, लग्न झाल्यानंतरसुद्धा ‘क्लबिंग’च्या तरतुदी लागू होत नाहीत, परंतु पती किंवा पत्नीला लग्नापूर्वी मिळालेल्या भेटींवर भेट मिळालेल्या व्यक्तीला कर भरावा लागतो. उदा. एखाद्या व्यक्तीने त्याच्या भावी पत्नीला लग्नापूर्वी १० लाख रुपयांची भेट दिली, हे पैसे तिने मुदत ठेवीत गुंतविले आणि त्यावर तिला ७५,००० रुपये व्याज मिळाले, तर हे व्याज भावी पत्नीला करपात्र असेल आणि लग्नानंतरसुद्धा तिलाच त्यावर कर भरावा लागेल, परंतु या भेटीच्या १० लाख रुपयांवरसुद्धा भावी पत्नीला कर भरावा लागेल. हीच भेट लग्नानंतर दिली असती तर पत्नीला १० लाख रुपयांवर कर भरावा लागला नसता, परंतु त्याच्या गुंतवणुकीवर, ‘क्लबिंग’च्या तरतुदीनुसार, पत्नीला मिळालेले उत्पन्न पतीच्या उत्पन्नात मिसळून त्यावर पतीला कर भरावा लागला असता.

२. घरखर्चासाठी दिलेल्या पैशातून उत्पन्न : जर पत्नीने, पतीने दिलेल्या घरखर्चातून पैसे वाचवले आणि ते गुंतवले तर अशा गुंतवणुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नासाठी ‘क्लबिंग’च्या तरतुदी लागू होत नाहीत. जर घरखर्चासाठी पैसे दिले गेले आहेत आणि पत्नीने त्यातील काही पैसे हुशारीने वाचवले, तर असे म्हणता येईल की, हे मोबदल्याशिवाय हस्तांतरण नसून घरगुती जबाबदाऱ्यांसाठी दिलेले आहेत. त्यामुळे त्यावर पतीला कर भरावा लागणार नाही. प्राप्तिकर अधिकाऱ्याकडून विचारणा झाल्यास योग्य पुरावे सादर करावे लागतील.

३. ‘क्लब’ केलेल्या उत्पन्नावरील उत्पन्न : पतीने किंवा पत्नीने भेट म्हणून दिलेल्या संपत्तीच्या उत्पन्नासाठी ‘क्लबिंग’च्या तरतुदी लागू होतात, परंतु या उत्पन्नातून मिळालेले पैसे गुंतविले आणि त्यातून मिळालेल्या उत्पन्नासाठी ‘क्लबिंग’च्या तरतुदी लागू होत नाहीत. उदा. एका व्यक्तीने १० लाख रुपये त्याच्या पत्नीला भेट म्हणून दिले. त्यावर पत्नीला ७५,००० रुपये व्याज मिळाले. या व्याजासाठी ‘क्लबिंग’च्या तरतुदी लागू होतील, परंतु ही ७५,००० रुपयांची व्याजाची रक्कम पत्नीने दुसऱ्या मुदत ठेवीत गुंतविली आणि त्यावर ५,००० रुपये व्याज मिळाले तर या व्याजासाठी ‘क्लबिंग’च्या तरतुदी लागू होणार नाहीत, हे ५,००० रुपयांचे व्याज पत्नीलाच करपात्र असेल.

pravindeshpande1966@gmail.com