उत्पादन पद्धतीमध्ये यंत्रांचा वापर सुरू झाला आणि जगाच्या इतिहासात प्रगतीची घोडदौड अधिक वेगाने होऊ लागली. युरोपात आणि प्रामुख्याने इंग्लंडमध्ये घडून आलेल्या औद्योगिक क्रांतीला आता बरीच वर्ष उलटून गेली. आगामी काळ आहे, तो म्हणजे ‘चौथ्या औद्योगिक क्रांतीचा’. झपाट्याने बदलणारे तंत्रज्ञान त्यामध्ये कृत्रिम प्रज्ञा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा यांचा वापर यामुळे व्यवसायाची सगळी गणितंच बदलणार आहेत. म्हणूनच चौथ्या क्रांतीचे लाभार्थी कोण ठरतील ? याचा चाणाक्ष गुंतवणूकदारांनी वेळीच अभ्यास करून त्या कंपन्यांचे समभाग आपल्या पोर्टफोलिओचा भाग म्हणून हळूहळू जमा करायला हवे. हार्डवेअर, सॉफ्टवेअर, दूरसंचार, संदेशवहन या सगळ्यांचे एकत्रित प्रारूप या चौथ्या क्रांतीत आपल्याला पाहायला मिळेल.
कोणतीही औद्योगिक क्रांती माणसाचे जीवनमान सुधारते. पण त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे आपल्या जगण्याचा वेग वाढतो. चौथ्या क्रांतीमध्ये हेच मोठ्या प्रमाणावर घडणार आहे. भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांची गेल्या ३० वर्षाची वाटचाल आपण समजून घ्यायला हवी. नव्वदच्या दशकाचा नायक ठरला इन्फोसिस, २१ व्या शतकाच्या सुरुवातीला बाजारात आलेल्या ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’च्या समभागाने गुंतवणूकदारांच्या श्रीमंतीत अधिक भर घातली. मध्यंतरीच्या काळात सत्यम कॉम्प्युटरचा घोटाळा वगळता भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्र विस्तारलेच आहे. असे असले तरीही त्या कंपन्यांच्या कार्यपद्धतीमध्ये मोलाचे बदल घडून येत आहेत.

आऊटसोर्सिंग अर्थात परदेशातील कंपन्यांची कामे स्वस्त मनुष्यबळाची उपलब्धता असल्यामुळे भारतातून करवून घेणे यामुळे भारतीय माहिती तंत्रज्ञान उद्योगाला सुगीचे दिवस आले. डॉलरमध्ये व्यवसाय होत असल्याने अन्य क्षेत्रांपेक्षा हुशार लोकांचा भरणा याच क्षेत्रात अधिक दिसू लागला. बदलत्या काळात भारतातील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांना चौथ्या क्रांतीचे लाभार्थी ठरण्यासाठी आपल्या व्यवसायात गुणात्मक बदल करावे लागतील. एकीकडे स्वच्छ पाणीपुरवठा, सर्वांना पदवीपर्यंतचे परवडेल असे शिक्षण अजूनही भारतात मिळत नाही आणि त्याच वेळी भारतातील बहुतांश नागरिकांकडे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात डिजिटल तंत्रज्ञान उपलब्ध आहे किंवा तसे पोहोचण्याची सोय आहे. यामुळेच ग्राहक जशी मागणी करेल त्या पद्धतीने व्यवसाय करावा लागतो असे असेल तर मग, व्यवसायाचे स्वरूपच जगभर बदलत असेल तर भारतीय कंपन्या तरी मागे कशा राहतील? डिजिटल मार्केटिंग, डिजिटल कॉमर्स, मेटावर्स, विदा यांसारख्या नवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास करून त्याचा सल्ला देण्यासाठी वापर करणे, ब्लॉक चेन-तंत्रज्ञान, इंटरनेट ऑन थिंग्स (आयओटी) अशा क्षेत्रांमध्ये भारतातील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनी आपले बस्तान बसवायला सुरुवात केली आहे. युरोप आणि अमेरिकेतील बलाढ्य तंत्रज्ञान कंपन्यांच्या तुलनेत ही सुरुवात छोटी असली तरीही व्यवसाय वाढीच्या दृष्टीने ती महत्त्वाची आहे. जसजसा डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढेल तसतसे सायबर धोक्याचे प्रमाणदेखील वाढेल व यासाठीच सायबर सुरक्षा तंत्रज्ञान विकसित करण्यात येईल. असे तंत्रज्ञान विकसित करण्यात मध्यम आकाराच्या कंपन्यांना अधिक वाव आहे. पूर्वी माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचे व्यवसाय क्षेत्र भारतात मर्यादित असायचे.

बदलत्या काळानुसार भारतातील आकाराने लहान मध्यम मोठ्या सर्वच क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्यांना माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचा आधार घेण्याशिवाय पर्याय उरणार नाही. बँकिंग, भांडवली बाजार, माध्यम व्यवसाय, चित्रपट निर्मिती, चित्रपटाचे वितरण, शैक्षणिक क्षेत्र, ऊर्जा क्षेत्र, आरोग्य क्षेत्र, विमा व्यवसाय, जैवतंत्रज्ञान, किरकोळ दुकानदारीचा व्यवसाय, पुरवठा साखळी अशा सर्वच क्षेत्रात या कंपन्या आपले व्यवसाय हळूहळू वाढवत नेणार आहेत. व्यापाराच्या निमित्ताने जगभरात वस्तूंचा व विचारांचा संचार सुरूच असतो, पण आता व्यापाराचे भौगोलिक क्षेत्र ही बदलत चालले आहे. व्यापार करताना वस्तू कोठून कोठे आणि कशा पाठवायच्या यासाठी सुद्धा अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले जात आहे आणि पुरवठा साखळी भारताच्या दृष्टीने अनुकूल होताना दिसते.

जागतिक व्यापारात भारताचा वाटा एकेकाळी नगण्य होता. मात्र आता त्यात वाढ होताना दिसते आहे. माहिती तंत्रज्ञान कंपन्यांना या क्षेत्रातही आपला व्यवसाय वाढवण्याची संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय माहिती तंत्रज्ञान कंपन्या जरी जन्माने भारतीय असल्या तरी व्यापारवाढीत त्यांनी जगाचे नागरिकत्व स्वीकारले आहे. उदाहरणच घ्यायचे झाले तर ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ (टीसीएस) या कंपनीचा व्यवसाय ५५ देशात सुरू आहे. उत्तर व दक्षिण अमेरिका, युरोप, इंग्लंड, मध्य पूर्वेकडील देश व आफ्रिका अशा विविध ठिकाणाहून १५० देशांचे नागरिक असलेले सुमारे ६ लाखांहून अधिक कर्मचारी या कंपनीत काम करतात. भारत जगातील उत्पादक देशांना आपला भरवशाचा साथीदार समजतो आहे त्यामुळेच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही ठिकाणी चौथ्या क्रांतीमध्ये भरपूर व्यवसाय व प्रगतीच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

भारतातील होऊ घातलेला आणखी एक बदल म्हणजे भारत सरकार स्वतः तंत्रज्ञानावर पैसे खर्च करण्यास हळूहळू सुरुवात करेल अशी अपेक्षा आहे. सध्याच्या भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा विचार करायचा झाल्यास कंपन्यांच्या महसुलाचा मुख्य स्रोत परदेशातून येतो. देशांतर्गत व्यवसाय करण्यात नफ्याचे प्रमाणही कमी आहे व खासगी गुंतवणुकीची शक्यताही कमी आहे. आगामी काळात सरकारने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात पैसा खर्च करायचे धोरण आखले तर भारतातील नव्या युगाची ती सुरुवात असेल.
लेखक अर्थ अभ्यासक आणि वित्तीय मार्गदर्शक आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

joshikd28@gmail.com