कौस्तुभ जोशी

जगभरातील बाजारांमध्ये अस्थिरता असताना भारतीय शेअर बाजारात मात्र खरेदीचा उत्साह पुन्हा परत येताना दिसतो आहे व याच लाभदायक वातावरणाचा फायदा घेण्यासाठी कंपन्या सज्ज आहेत. या एकाच आठवड्यामध्ये तब्बल तेराशे कोटी रुपये एवढ्या किमतीचे पब्लिक इश्यू गुंतवणूकदारांना पैसे गुंतवण्यासाठी उपलब्ध होत आहेत. जाणून घेऊया याबद्दलच.

प्रोटेन ई गव्हर्मेंट टेक्नॉलॉजी

या सॉफ्टवेअर सोल्युशन तयार करणाऱ्या आणि नवीन धाटणीच्या उद्योगात असणाऱ्या कंपनीचा इश्यू सहा नोव्हेंबरला खुला होत आहे. या गुंतवणुकीतून कंपनीला ५०० कोटी रुपयांपर्यंतची रक्कम उभारली जाईल अशी अपेक्षा आहे. या पब्लिक इश्यू साठी ७५२ ते ७९२ रुपये या प्राईज बँड मध्ये बोली लावता येणार आहे. या कंपनीचे आधीचे नाव एनएसडीएल गव्हर्नन्स इन्फ्रास्ट्रक्चर असे होते. भारत सरकारच्या विविध विभागांबरोबर डिजिटल सोल्युशन्स बनवण्यासाठी एकत्रित सहभागातून काम करणे हे या कंपनीचे मुख्य बिझनेस मॉडेल आहे.

हेही वाचा >>>Money Mantra : मृत्यूनंतर कशा पद्धतीनं हस्तांतरित केली जाते म्युच्युअल फंडासारखी एखाद्याची गुंतवणूक, नॉमिनीशी संबंधित नियम समजून घ्या

आस्क ऑटोमोटिव्ह

दुचाकी गाड्यांसाठी विशेष दर्जाचे ब्रेक आणि ब्रेकिंग सिस्टीम बनवणाऱ्या या कंपनीचा पब्लिक इश्यू सात ते नऊ नोव्हेंबर या कालावधीमध्ये गुंतवणूकदारांसाठी खुला असणार आहे. या शेअर्स साठी २६८ ते २८२ या प्राईज बँड मध्ये बोली लावता येईल. या कंपनीचा हा दुसरा पब्लिक इश्यू असणार आहे. यातून जमा झालेले पैसे कंपनीच्या प्रमोटर्सकडे जातील. कारण या समभाग विक्रीमध्ये सर्व समभाग हे प्रमोटर्स विकणार आहेत.

सन रेस्ट लाइफ सायन्स

अहमदाबाद येथील सनरेस्ट लाइफ सायन्स या कंपनीचा पब्लिक इश्यू सात ते नऊ नोव्हेंबर या कालावधीमध्ये गुंतवणूकदारांसाठी खुला असणार आहे. कंपनी पहिल्यांदाच आपले शेअर्स बाजारात आणत आहे. हा एसएमई श्रेणीतील आयपीओ असून ८४ रुपये प्रति शेअर या किमतीलाच गुंतवणूकदारांना शेअर्स साठी नोंदणी करता येणार आहे. या कंपनीचा मुख्य व्यवसाय आरोग्य आणि वैयक्तिक वापराची सौंदर्यप्रसाधने तयार करणे हा आहे. कंपनीच्या भविष्यातील वाढीसाठी आणि भांडवली गुंतवणुकीसाठी हा पैसा वापरला जाईल असे कंपनीने म्हटले आहे.

हेही वाचा >>>वित्तरंजन: कर स्वर्ग (टॅक्स हेवन)

रॉक्स हायटेक लिमिटेड

चेन्नईतील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेल्या रॉक्स हायटेक या कंपनीचा शेअर पब्लिक इश्यू सात ते नऊ नोव्हेंबर या कालावधीसाठी खुला झाला आहे. एकूण ५४ कोटी रुपये या आयपीओ मधून कंपनीला मिळणार आहेत. यापैकी अंदाजे साडेचार कोटी रुपये प्रमोटर्स आपले शेअर्स विकून घेतील तर उरलेले नवीन शेअर्स कंपनीद्वारे गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. चेन्नई आणि नोएडा या ठिकाणी कंपनीचे प्रोजेक्ट सुरू असून ‘नेटवर्क ऑपरेशन सेंटर’ आणि ‘सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर’साठी पायाभूत सुविधा निर्माण करणे व कंपनीचा भविष्यातील व्यवसाय वाढवण्यासाठी नवे प्रोजेक्ट सुरू करणे हा या इश्यू मागील प्रमुख उद्देश आहे.

ई.एस.ए.एफ. स्मॉल फायनान्स बँक

लघु आणि सूक्ष्म गुंतवणूकदार आणि कर्ज घेण्यास उत्सुक असलेल्यांना व्यवसाय पुरवणाऱ्या या बँकेचा पब्लिक इश्यू सात नोव्हेंबर रोजी संपणार आहे. ५७ ते ६० रुपये या प्राईज बँड मध्ये गुंतवणूकदार आपली मागणी नोंदवू शकतात. ३ नोव्हेंबर रोजी या पब्लिक इश्यूला सुरुवात झाली व आतापर्यंत जवळपास दुपटीने या शेअर्स साठी मागणी नोंदवण्यात आली आहे. ग्रामीण आणि निमशहरी भागात या बँकेचा व्यवसाय विस्तारलेला आहे. एकूण व्यवसायापैकी ६०% व्यवसाय आणि एकूण शाखांपैकी ७०% शाखा ग्रामीण आणि निमशहरी भागात आहेत. मायक्रो फायनान्स क्षेत्रातील या बँकेमध्ये रिटेल कर्ज या श्रेणीत सोनेतारण कर्ज, वैयक्तिक कर्ज, वाहन कर्ज दिले जाते. केरळ मधील त्रिचूर या ठिकाणी बँकेचे मुख्य कार्यालय आहे.

हेही वाचा >>>दिवाळी विशेष गुंतवणूक

मायक्रोप्रो सॉफ्टवेअर सोल्युशन्स

एस एम ई श्रेणीतील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आकाराने छोट्या असलेल्या या कंपनीचा शेअर तीन ते सात नोव्हेंबर या कालावधीत गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे. या पब्लिक इश्यूचे वैशिष्ट्य म्हणजे आयपीओच्या पहिल्याच दिवशी सगळ्या शेअर्ससाठी नोंदणी पूर्ण झाली असून तो ओव्हर सबस्क्राईब झाला आहे. सर्व पात्र गुंतवणूकदारांना ८१ रुपये या दराने शेअर्स इश्यू केले जाणार आहेत. नागपूर हे मुख्य कार्यालय असलेल्या या कंपनीने सॉफ्टवेअर निर्मिती डेटा प्रोसेसिंग आणि सॉफ्टवेअर ट्रेनिंग या क्षेत्रात आपले स्थान बळकट करायला सुरुवात केली आहे.

बाबा फूड प्रोसेसिंग इंडिया

झारखंड राज्यातील खाद्य पदार्थाच्या उत्पादनात कार्यरत असलेल्या या कंपनीचा पब्लिक इश्यू ७ नोव्हेंबरला बंद होणार आहे. ७२ ते ७६ रुपये प्रति शेअर या दराने बोली लावता येणार असून. तीन नोव्हेंबर रोजी म्हणजेच पब्लिक इश्यूच्या पहिल्या दिवशीच अपेक्षित बोली लागलेली आहे व आतापर्यंत तिप्पट शेअर्स साठी बोली लावण्यात आली आहे.

येता आठवडा लिस्टिंगचा होनासा कन्झ्युमर

‘ममाअर्थ’ या नाममुद्रेसह आपले ब्रँड बाजारात आणलेल्या होनासा कन्झ्युमर या कंपनीचा आयपीओ मागच्या आठवड्यात बाजारात आला होता. जेवढे शेअर्स कंपनी गुंतवणूकदारांना देणार होती त्याच्या सात पटीने अधिक बोली लावण्यात आली. या आठवड्यामध्ये या कंपनीचे बाजारात पदार्पण होईल.

सेलो वर्ल्ड

आयपीओच्या शेवटच्या दिवशी किरकोळ श्रेणीतील गुंतवणूकदारांचा आणि हाय नेटवर्थ इंडीव्हिज्युअल (HNI) श्रेणीमध्ये दणदणीत प्रतिसाद मिळाल्यामुळे या आयपीओला यश मिळेल असे मानले जात आहे. मुंबई स्थित या कंपनीला पब्लिक इश्यू मधून १९०० कोटी रुपये मिळाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या वर्षाचे वैशिष्ट्य म्हणजे आकाराने मोठ्या असलेल्या कंपन्यांपेक्षा एका मागोमाग एक मध्यम, लघु आणि सूक्ष्म श्रेणीतील कंपन्या बाजारात येत आहेत. एस. एम. इ. या क्षेत्रात अधिकाधिक पब्लिक इश्यू येणे हे आश्वासक चित्र मानले जात असले तरीही या कंपन्यांचा पुरेसा आढावा न घेता नवीन गुंतवणूकदारांनी या शेअर मध्ये गुंतवणूक करताना काळजीपूर्वक करावी.

  • या लेखात उल्लेख असलेल्या कंपन्यांची माहिती देणे हा लेखाचा उल्लेख आहे. पब्लिक इश्यू मध्ये गुंतवणूक करताना जोखीमविषयक दस्तऐवज काळजीपूर्वक वाचून आपल्या गुंतवणूक सल्लागाराच्या सल्ल्याने गुंतवणूक करावी.