Sam Altman Tesla Car Booking Issue: ओपनएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम ऑल्टमन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर काही दिवसांपूर्वी एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये ऑल्टमन यांनी दावा केला होता की, त्यांनी साडेसात वर्षांपूर्वी टेस्ला कार बुक केली होती, यासाठी अॅडव्हान्स पेमेंटही केले होते, तरीही त्यांना अद्याप टेस्ला कार मिळालेली नाही. सॅम ऑल्टमन यांच्या या दाव्यानंतर टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
सॅम ऑल्टमन यांच्या पोस्टला प्रतिक्रिया देताना एलॉन मस्क यांनी ऑल्टमन यांच्यावर, त्यांनी पोस्ट करताना “महत्त्वाचे तपशील” वगळल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, ही समस्या आधीच सोडवली गेली आहे आणि २४ तासांच्या आत अॅडव्हान्स पेमेंट परत केले गेले आहे.
सॅम ऑल्टमन यांनी जुलै २०१८ मध्ये टेस्ला कारसाठी प्री-रिझर्वेशन फी म्हणून ४५,००० अमेरिकन डॉलर्स भरल्याचा दावा पोस्टमध्ये केला होता. तसेच अनेक वेळा पाठपुरावा करूनही त्यांना टेस्ला कार किंवा प्री-रिझर्वेशन फी परत मिळालेली नाही, असे पोस्टमध्ये नमूद केले होते.
सॅम ऑल्टमन यांची पोस्ट
एक्सवरील एका पोस्टमध्ये ऑल्टमन यांनी टेस्लाबरोबर त्यांच्या ईमेल संभाषणांचे स्क्रीनशॉट शेअर केले. ज्यामध्ये बुकिंग कन्फर्मेशन, रिफंड रिक्वेस्ट आणि “अॅड्रेस नॉट फाऊंड” असे दाखवणारा त्यांचा ईमेल बाउन्स बॅक झाल्याचा एरर मेसेज यांचा समावेश आहे.
याला “तीन अंकांची गोष्ट” असे संबोधून ऑल्टमन यांनी लिहिले, “मी टेस्ला कारसाठी खरोखर उत्साहित होतो! आणि मला विलंब समजतो. पण ७.५ वर्षे वाट पाहणे म्हणजे अती आहे.”
मस्क यांनी केला चोरीचा आरोप
यानंतर टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क यांनी ऑल्टमन यांच्या पोस्टला त्वरित प्रतिसाद दिला आणि त्यांच्यावर महत्त्वाचे तपशील वगळल्याचा आरोप केला.
“आणि तुम्ही या गोष्टीतील चौथ्या अंकाचा उल्लेख करायला विसरलात. ही समस्या तेव्हाच सोडवण्यात आली होती आणि तुम्हाला २४ तासांत प्री-रिझर्वेशन फी परत करण्यात आली होती. पण, असो… ते तुमच्या स्वभावातच आहे”, असे उत्तर एलॉन मस्क यांनी सॅम ऑल्टमन यांना दिले.
ओपनएआय सुरुवातीला नॉन-प्रॉफिट ऑर्गनायझेशन होती, परंतु नंतर तिचे प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये रुपांतर करण्यात आले. यावरून सॅम ऑल्टमन यांच्यावर टीका करताना मस्क यांनी म्हटले की, “तुम्ही एक संस्था चोरली आहे.”
