Tata Motors Festive Offers: टाटा मोटर्सने त्यांच्या विविध चारचाकी वाहनांवर विशेष फेस्टिव्हल ऑफर जाहीर केली आहे. यामध्ये जीएसटी सवलतीचे फायदे आणि अतिरिक्त सवलतींचाही समावेश आहे. यामुळे टाटाच्या ग्राहकांना आता दुहेरी लाभ मिळणार आहे. ग्राहकांना आता मॉडेलनुसार २ लाखांपर्यंतची सूट मिळू शकते. ही फेस्टिव्हल ऑफर ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत वैध असणार आहे.
सर्वाधिक सूट टाटा नेक्सॉनवर
यामध्ये टाटा नेक्सॉनवर एकूण २ लाख रुपयांपर्यंतची सूट मिळणार आहे, ज्यात जीएसटी सूट १,५५,००० रुपये आणि टाटा मोटर्सच्या ऑफरद्वारे मिळणाऱ्या ४५,००० रुपयांचा समावेश आहे. नेक्सॉननंतर सफारी आणि हॅरियरवर अनुक्रमे १.९८ लाख रुपये आणि १.९४ लाख रुपयांची सूट मिळणार आहे. टियागो आणि टिगोर सारख्या एंट्री-लेव्हल चारचाकी वाहनांवर देखील १.२० लाख रुपये आणि १.११ लाख रुपयांची एकत्रित बचत होणार आहे.
छोट्या चारचाकींकडे ग्राहक आकर्षित
‘इकॉनॉमिक टाईम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, सोमवारी नवीन वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) प्रणाली लागू झाल्यानंतर वाहन खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये खरेदीदार छोट्या चारचाकींकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित झाल्याचे दिसत आहे, कारण छोट्या चारचाकींच्या किमतीत जीएसटी २.० अंतर्गत सर्वात मोठी कपात झाली आहे.
एका दिवसात टाटा मोटर्सच्या १० हजार चारचाकींची विक्री
जीएसटी सुसूत्रीकरणानंतर देशात चारचाकी वाहनांच्या किमतींमध्ये मोठी घट झाली आहे, ज्याचा थेट परिणाम कार विक्री आणि बुकिंगवर होत आहे. टाटा मोटर्सने एका निवेदनात म्हटले आहे की, जीएसटी २.० लागू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी कंपनीकडे नवीन चारचाकी खरेदी करण्यासाठी २५,००० हून अधिक ग्राहकांनी चौकशी केली आहे. शिवाय, कंपनीने एकाच दिवसात १०,००० चारचाकी वाहनांची विक्री केली आहे.
३० हजार चारचाकींच्या विक्रीसह मारुती सुझुकी आघाडीवर
जीएसटी २.० लागू झाल्याच्या पहिल्याच दिवशी, मारुती सुझुकीने जवळपास ३०,००० चारचाकींची विक्री केली आहे. तर ८०,००० ग्राहकांनी नवी चारचाकी खरेदी करण्यासाठी कंपनीकडे संपर्क साधला आहे. त्यानंतर ह्युंदाईने जवळपास ११,००० चारचाकींची विक्री केली आहे.