Tesla To Open Showroom In July In India: अमेरिकन उद्योगपती एलॉन मस्क यांची टेस्ला ईव्ही कंपनी जुलैच्या मध्यात मुंबईत पहिले शोरूम सुरू करत भारतात पदार्पण करणार आहे. मुंबईनंतर टेस्ला आपले दुसरे शोरूम नवी दिल्लीत सुरू करणार आहे. या प्रकरणाशी परिचित असलेल्या सूत्रांच्या हवाल्याने ब्लूमबर्गने याबाबत वृत्त दिले आहे.

एलॉन मस्क यांच्या नेतृत्वाखालील टेस्ला कंपनीची चीनमधील शांघायच्या कारखान्यातून मॉडेल वाय रिअर-व्हील ड्राइव्ह एसयूव्ही या वाहनांची पहिली तुकडी आधीच मुंबईत दाखल झाली आहे, असे ब्लूमबर्गच्या वृत्तात म्हटले आहे. दरम्यान, टेस्लाचे मॉडेल वाय हे सध्या जगातील सर्वाधिक विक्री होणारे इलेक्ट्रिक वाहन आहे.

ब्लूमबर्ग न्यूजने पाहिलेल्या कागदपत्रांमधून हे देखील स्पष्ट झाले आहे की, टेस्लाने लाँचच्या तयारीसाठी अमेरिका, चीन आणि नेदरलँड्समधून सुपरचार्जरचे घटक, कार अॅक्सेसरीज आणि सुटे भाग देखील आयात केले आहेत.

आयात शुल्क आणि स्थानिक उत्पादनाच्या मागण्यांवरील मतभेदांमुळे वर्षानुवर्षे विलंब झाल्यानंतर टेस्लाचा भारत प्रवेश आता निश्चित झाला आहे. या वर्षी फेब्रुवारीमध्ये अमेरिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एलॉन मस्क यांच्यात झालेल्या बैठकीनंतर यावर तोडगा निघाला.

दरम्यान, ब्लूमबर्ग न्यूजने फेब्रुवारीमध्ये वृत्त दिले होते की, टेस्ला मुंबईजवळील बंदरात काही हजार गाड्या पाठवणार आहे. भारतातील शोरूम उघडण्याबाबत आणि सुरू असलेल्या तयारींबाबत माहिती मिळवण्यासाठी पाठवलेल्या ईमेलला टेस्लाच्या प्रवक्त्यांनी अद्याप प्रतिसाद दिला नाही.

प्रशांत मेनन यांनी टेस्ला सोडल्यानंतर कंपनीने भारतातील नवीन प्रमुखाची नियुक्ती केलेली नाही, परंतु चार्जिंग, रिटेल आणि पॉलिसी टीममध्ये भरती वाढवली आहे. इतर देशांतील टेस्लाचे अधिकारी श्रीमंत खरेदीदारांना आकर्षित करण्यासाठी मुंबई आणि नवी दिल्लीतील शोरूमना आठवड्याला भेट देत आहेत. ही शोरूम्स उच्च-प्रोफाइल, लक्झरी व्यवसाय क्षेत्रात आहेत, असे या प्रकरणाशी परिचित असलेल्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याचबरोबर, कंपनीने गोदामांसाठी कर्नाटकमध्ये आणि नवी दिल्लीबाहेर गुरुग्राममध्ये जागा भाड्याने घेतल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.