Tesla Car High Price And Tax Complications In India: टेस्लाची मॉडेल वाय कार नुकतीच भारतात दाखल झाली असून, टेस्लाचं पहिलं शोरूम काल मुंबईमध्ये सुरू झालं आहे. पण खरेदीदारांना धक्का बसणारी गोष्ट म्हणजे या कारची ६१ लाख रुपये किंमत नाही, तर कारच्या किमतीत निम्म्याहून अधिक रक्कम ही निव्वळ कर आहे, ही आहे.
आर्थिक विश्लेषक संजय यू यांनी लिंक्डइनवर भारतीयांची कारची स्वप्नं आर्थिक दुःस्वप्नात बदलणाऱ्या करांच्या प्रचंड ओझ्याचं विश्लेषण केलं आहे. “तुमची खरी खरेदी ही कार नाही, तर ती कर पावती आहे”, असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे.
अमेरिकेत टेस्लाची मॉडेल वाय कार ३२ लाख रुपयांना विकली जात असताना, भारतीय खरेदीदार जवळजवळ दुप्पट किंमत मोजत आहेत. ही दुप्पट किंमत लक्झरी अपग्रेडसाठी नाही, तर करांच्या गुंतागुंतीमुळे आहे.
संजय यू यांनी त्यांच्या लिंक्डइन पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “टेस्लाच्या मॉडेल वायच्या किमतीमध्ये २८% जीएसटी, मोठ्या वाहनांसाठी २२% भरपाई उपकर, १०% रस्ते कर, विम्यावर १८% जीएसटी, तसेच आयात शुल्क, शिपिंग आणि नोंदणी शुल्क यांचा समावेश आहे.”
ते पुढे म्हणाले की, “आणि थांबा, टेस्ला ही ईव्ही कार आहे याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. जर ती पेट्रोल किंवा डिझेल कार असती, तर खरेदीदारांना १००% च्या जवळपास इंधन कर भरावा लागला असता. तुम्ही जेव्हा जेव्हा तुमच्या कारची टाकी भरता, तेव्हा तुम्हाला जवळजवळ १००% इंधनावर कर भरावा लागतो आणि द्रवरूप सोन्याइतकी किंमत मोजावी लागते.”
“शेवटी, तुम्ही फक्त कार खरेदी करत नाही. तुम्ही सरकारने काळजीपूर्वक गुंडाळलेले करांचे थर खरेदी करता आणि तुम्हाला भारताचा जीडीपी तुमच्या चारचाकीवर अभिमानाने चालवता येतो. जर तुम्ही लक्झरी गाडी चालवण्याचं स्वप्न पाहत असाल, तर तुमचं अभिनंदन, तुम्ही कर विभागासाठी लक्झरी प्रायोजित करत आहात”, असंही संजय यू यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

भारत आणि अमेरिकेतील टेस्लाच्या किमतीतील तफावत
अमेरिकेत टेस्लाच्या मॉडेल वायची किंमत सर्व करांसह अंदाजे ३२ लाख रुपयांपासून सुरू होते, जी भारतीय किमतीच्या जवळपास निम्मी आहे. या किमतीतील तफावतीचं मुख्य कारण आयात शुल्क आहे. टेस्ला सध्या भारतात कारसाठी लागणारे पूर्णपणे बांधलेले सुटे भाग आयात करत आहे, ज्यावर जास्त आयात शुल्क आकारले जाते.