How To Transfer PF Account: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ही भारत सरकारद्वारे स्थापन करण्यात आलेली एक लोकप्रिय बचत प्रणाली आहे. या संघटनेचा स्वतंत्र कारभार सुरु असला, तरी तिच्यावर शासनाची देखरेख असते. या संघटनेच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (Employees’ Provident Fund) योजनेअंतर्गत कर्मचारी आणि मालक/ कंपनी या दोघांकडून मूळ पगाराच्या आणि महागाई भत्त्याच्या रक्कमेतील १२ टक्के रक्कम एकत्र जमा केली जाते. EPF वर मिळणारे व्याज हे करमुक्त असते. ही रक्कम काढल्यावर कर्मचाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचा दंड आकारला जात नाही.

निवृत्ती घेतल्यानंतर कर्मचाऱ्यांना एकरकमी पैसे मिळतात. यामध्ये त्यांच्या गुंतवणूकीसह व्याजाचाही समावेश असतो. पूर्वी एका कंपनीमध्ये नोकरी लागल्यावर लोक तेथेच टिकून राहायचे. गेल्या काही वर्षांमध्ये नोकरी स्विच करणे हा प्रकार वाढला आहे. सेवानिवृत्तीनंतर EPF अंतर्गत साठवलेले पैसे मिळवण्यासाठी कर्मचाऱ्याने नोकरी बदलताना त्यांचे पीएप खाते वेळोवेळी ट्रान्सफर केले गेले आहे की नाही याची खात्री करुन घ्यावी.

एका ठिकाणी राजीनामा दिल्यानंतर दुसऱ्या कंपनीत रुजू झाल्यानंतर पीएफ खाते हस्तांतरित न केल्याने त्या गुंतवणूकीवर व्याज मिळते. पण त्यावर मिळणारे कर्ज हे करपात्र ठरते. परिणामी आधी टॅक्सफ्री असलेल्या गुंतवणूकीसाठी नंतर कर भरावा लागू शकतो. याचा परिणाम एकूण गुंतवणूकीवर होऊ शकतो. निवृत्तीनंतर मिळणारी रक्कम कमी होऊ शकते. असे घडू नये म्हणून पीएफ खाते ट्रान्सफर करण्याचा सल्ला दिला जातो.

नोकरी बदलल्यावर पीएफ खाते ट्रान्सफर करण्यासाठीच्या स्टेप्स:

१. https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ या साइटवर जाऊन UAN आणि पासवर्ड वापरून तुमच्या EPF खात्यात लॉग इन करा.

२. ‘Online Services’ यामधील ‘One Member – One EPF Account (Transfer Request)’ या ऑप्शनवर क्लिक करा.

३. पीएफ खाते आणि वैयक्तिक माहिती यांचा तपशील पाहून चेक करा.

४. आधी काम करत असलेल्या कंपनीतील नोकरीशी जोडलेले पीएफ खाते तपासण्यासाठी ‘Get Details’वर क्लिक करा.

५. अधिकृत स्वाक्षरी धारक DSC च्या उपलब्धतेवर अवलंबून असलेला फॉर्म प्रमाणित करण्यासाठी जुन्या किंवा नवीन कंपनीची निवड करा. नोकरीच्या जागेची निवड केल्यावर आयडी किंवा UAN भरा.

आणखी वाचा – चुकीच्या UPI ID मुळे अनोळखी व्यक्तीच्या खात्यामध्ये जमा झालेले आपले पैसे परत कसे मिळवावे? जाणून घ्या..

६. नोंदणी असलेल्या मोबाइल नंबरवर OTP मिळवण्यसाठी ‘Get OTP’ ऑप्शनवर क्लिक करा. एसएमएसमध्ये आलेला OTP टाका आणि स्वत:ची ओळख पटवून देण्यासाठी ‘Submit’ बटणावर क्लिक करा.

७. त्यानंतर पीएफ खाते ट्रान्सफर करण्यासाठीचा ऑनलाइन फॉर्म तयार होईल, त्यात माहिती भरुन स्वत: प्रमाणित करावा आणि निवडलेल्या कंपनीच्या नावाने PDF स्वरूपात सबमिट करावा. आधीच्या किंवा आता काम करत असलेल्या कंपनीपैकी ज्या ठिकाणी पीएफ खाते ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, त्या कंपनीला या निर्णयाबाबतची सूचना मिळेल.

८. त्याकंपनीद्वारे ट्रान्सफरसाठी केलेली विनंती मंजूर झाल्यावर पीएफ खाते निश्चित केलेल्या ठिकाणी जाईल. असे करताना एक ट्रॅकिंग आयडी मिळेल. याचा वापर ऑनलाइन अर्जाचा मागोवा घेण्यासाठी करता येईल.