News Flash

तिमिराकडून प्रकाशाकडे…

करिअरच्या संघर्षांच्या टप्प्यावर असणाऱ्या अनेकांना दिवाळीचे दिवस आनंदाचे, उत्साह दुणावणारे वाटतातच असे नाही.

| November 4, 2013 01:10 am

करिअरच्या संघर्षांच्या टप्प्यावर असणाऱ्या अनेकांना दिवाळीचे दिवस आनंदाचे, उत्साह दुणावणारे वाटतातच असे नाही. अशा वेळेस उत्कट जीवनानुभव देणारा हा सण साजरा करण्याच्या प्रथेकडे डोळसपणे पाहिले तर आपली क्षमता आणि आत्मविश्वास जपण्याचे बळ मिळते आणि आपला प्रवास तिमिराकडून प्रकाशाकडे सुरू होतो.
दिवाळीची लगबग सुरू होते. सगळं जग उत्साहात असतं. टीव्हीवर सोनं, कार, मोबाइल इत्यादींच्या जाहिरातींचा मारा सुरू असतो. ‘यंदा दिवाळीला काय नवीन?’ ची चर्चा घराघरात चालू असते. बाजारपेठा गर्दीनं फुललेल्या असतात. या आनंदानं भरलेल्या वातावरणात काहीजण मात्र अस्वस्थ असतात. त्यांच्या अपेक्षेपेक्षा काहीतरी वेगळं, विपरीत घडलेलं असतं. कष्टांना अपेक्षित फळ नसतं किंवा कष्ट कमी पडलेले असतात.   
‘पुढच्या दिवाळीला माझ्या कमाईचा मस्त ड्रेस आणीन तुला,’ असा गेल्या दिवाळीत बहिणीला दिलेला शब्द कुणाला आठवत असतो. तेव्हा सगळं नीट चाललं होतं, पण स्पर्धा परीक्षेत यश मिळालं नाही. कुठला जॉब आणि कुठली ओवाळणी? कुणाला नोकरीत अचानक ब्रेक मिळालेला असतो, त्यामुळे यंदा पाडवा नेहमीसारखा होणार नाही, याचं वाईट वाटत असतं. एखाद्या छोटय़ा उद्योजकानं क्लाएंटला वेळेवर डिलिव्हरी देऊनही ऐनवेळी ‘सॉरी, अडचण आहे एवढा महिना’ असं म्हणत क्लाएंटने पार्ट पेमेंट केलेलं असतं. आता स्वत:ची खरेदी दूरच, उलट कर्मचाऱ्यांच्या वेतनाची चिंता असते. खूप हरल्यासारखं वाटत असतं. कशातच भाग घेऊ नये, काहीच करू नये, दूर पळून जावं अशी भावना असते. आतून कुठलीच प्रेरणा, उभारी येत नाही. दिवाळीच्या दिव्यांकडे पाहून पुन:पुन्हा चिडचिड होत असते.
कशाचा तरी प्रचंड राग येत असतो. कधी स्वत:चा, तर कधी अडचणीत आणणाऱ्यांचा. ‘आपण कमी पडतो आहोत’ या पराभूत भावनेतून आलेला असहाय संताप काढायला दिव्यांचंही निमित्त पुरतं. अशा वेळी हवा असतो खांद्यावर एका मत्रीच्या स्पर्शाचा आधार. ‘मला समजतेय तुझी तगमग,’ असं सांगणारी एक समंजस नजर. अशा व्यक्ती आजूबाजूला असतातही, पण आपला इगो (स्वाभिमान) आड येतो. हळवेपण लपवण्यासाठी आपण रागाचा आधार घेतो. ‘माझं दु:ख कुणालाच समजणार नाही,’ असं ठरवून सगळ्याकडे पाठ फिरवतो. ‘आपल्याला किती निर्थक वाटतंय’ याचं स्वत:पाशीच उदासपणे किंवा रागाने घोळवत राहतो. मग काही करायची प्रेरणाच उरत नाही.
स्वत:ला असं विझलेपण येतं तेव्हा किंवा उदासपणाच्या अंधारात बुडालेले लोक दिसतात तेव्हा आठवण येते, ‘प्रेरणा’ या विषयावरच्या एका मुक्त चच्रेची.   
‘अतिशय अवघड परिस्थिती असूनही तुम्ही आजपर्यंत जिथे काहीतरी खूप चांगलं केलंत ते कशामुळे केलं? त्यामागची प्रेरणा कुठली होती?’ असा प्रश्न एका चच्रेला घेतला होता. अनेक उत्तरं आली, ‘माझ्या आवडीचं काम होतं, त्यानेच प्रेरणा दिली’ ‘कामात १०० टक्के द्यायचे, असं माझ्या आई/ वडील / गुरू / कुणीतरी सांगितलं होतं, ते मी मनापासून पाळलं’, ‘माझ्या पत्नीने, मुलाने, कुटुंबाच्या विचाराने प्रेरणा दिली’, ‘मी कुठलंही काम तसंच करते’ अशी विविध उत्तरं आली. एकजण म्हणाला, ‘व्यवसायाच्या एका अवघड टप्प्यावर होतो. काहीच करू नये अशी हतबलता आली होती. आत्मविश्वास पार संपला होता. अशा वेळी ‘आता तू यातून उठत नाहीस, संपलास!’ असे एका सहव्यावसायिकाने आव्हान दिले. मला संताप आला. ‘आता कसं जमत नाही तेच बघतो’ या जिद्दीनं पेटलो. प्रत्येक समस्येला भिडलो, सामोरा गेलो, कामात पूर्ण जीव घातला आणि जिंकलो.’
‘कुणाशी जिंकलास?’
‘त्याच्याशी. आव्हान देणाऱ्याशी.’ तो म्हणाला. तसे संवादक (फॅसिलिटेटर) हसले.
‘तू स्वत:शी जिंकलास मित्रा. तुझ्या हतबलतेशी जिंकलास. अक्षमतांशी, आळसाशी, मनातल्या सबबींशी जिंकलास. तो आव्हान देणारा सहव्यावसायिक फक्त निमित्त होता, ज्यानं तुला शंभर टक्के द्यायला लावलं. येईल त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी तो तुझी प्रेरणा झाला त्या वेळी.’ थोडं थांबून संवादकांनी विचारलं, ‘तू जेव्हा जेव्हा अपेक्षेपेक्षा काहीतरी खूप चांगलं करतोस तेव्हा तेव्हा असंच काहीतरी घडलेलं असतं का?’
‘..हो. बहुधा..’ तो आठवत आठवत म्हणाला.
‘म्हणजे कुणी आव्हान केलं नाही तर तुझ्या हातून काही विशेष घडणारच नाही? कठीण परिस्थितीबद्दल तक्रार करत चिडचिडत राहशील? वेगळ्या मार्गाचा विचारच करणार नाहीस?’
संवादकानं टाकलेला गुगली लक्षात येऊन तो विचारात पडला.
‘खुन्नस घेण्यानं शक्ती येते, हे खरं. प्रेरणा येण्यासाठी कधीतरी खुन्नसची मदत घ्यावीही लागते. पण दर वेळी खुन्नसनं काम करावं लागणं ही काही फारशी चांगली सवय नाही. एकदा आपली क्षमता आपल्याला समजली, काम करण्याची इच्छा प्रामाणिक आहे, तर मग प्रेरणा कुठूनही घेता यायला हवी. कोणीतरी आव्हान देईल, याची दर वेळी वाट बघत थोडेच बसणार? मग तुम्ही फक्त कुणाला तरी दाखवण्यासाठीच काम करता, स्वत:साठी करत नाही. तुमच्यातल्या क्षमतेचे नियंत्रण तुम्हाला उचकवणाऱ्या कुणाच्या तरी हातात आहे, असाच त्याचा अर्थ
होतो ना?’
संवादकांच्या प्रश्नावर गटातले सगळे विचारात पडले. कधी ना कधी, कुठे ना कुठे प्रत्येकानं हा अनुभव घेतलेला होता.  
‘असं सणकीसरशी काही करणं तात्पुरतं असतं. तेवढा वेळ ती ऊर्जा जिद्दीनं टिकवली जाते. पण जोरदार उसळी मारून डोंगर चढल्यानंतर पुढे दरीच असते. असं खाली-वर हेलकावणं फार वेळा होत राहिलं की, पुढे ‘तणाव व्यवस्थापना’च्या शिबिराला जाणे किंवा रक्तदाबाच्या गोळ्या घेणे अटळ असते. शांतपणा आपल्या आतूनच मिळवता यायला हवा.’
‘परिस्थिती जशी असते, तशीच असते मित्रहो! फरक पडतो तो त्याकडे बघण्याच्या आपल्या अ‍ॅप्रोचमुळे. समोर उभी असणारी प्रत्येक सजीव-निर्जीव वस्तू आपल्याला काहीतरी देऊ शकत असते. अवघड परिस्थितीतही काहीतरी चांगलं असतंच. ते शोधायला शिकल्यानंतर आपल्याला रस्ता सापडत जातो. छाती धडधडायला लागली की, आपण हातपाय गाळून बसतो की ‘ऑल इज वेल’ म्हणत स्वत:तला विश्वास जागवतो यावर सगळं ठरतं.’
त्या मुक्त चच्रेनं एक नवी नजर दिली. कुठल्याही गोष्टीत खोलवर जाण्याची शक्ती दिली. आपल्याला जे कमी पडतंय ते भोवतालात शोधायला शिकवलं. आपण उत्साहात आहोत म्हणून समोरच्या पणतीच्या ज्योती तेजाळणार नसतात किंवा उदास आहोत, म्हणून विझणारही नसतात. परिस्थिती तशीच राहणार असते. तरीपण त्या दीपज्योतींकडून काय घ्यायचं आपण?
तर पणतीचं स्नेहल तेवणं. वातीच्या मदतीनं पणती जवळच्या इंधनाचा पर्याप्त वापर करते. तिच्यात सगळं पेट्रोल क्षणभरात खाक करणारा भडका नसतो, तर एक मंद शांतपण असतं आणि म्हणून सातत्य. त्या शांतीतही अग्नी असतोच, ज्यामध्ये दुसरी पणती पेटवण्याची क्षमता असते किंवा काहीही जाळण्याचीदेखील. पण जवळची ऊर्जा नीट वापरणं हा पणतीचा ‘बाय डिफॉल्ट’ गुणधर्म असतो. म्हणून तेवत्या ज्योतीकडे नुसतं पाहूनही मनाला शांत वाटतं.
ज्योतीच्या प्रतीकाकडे कधीतरी अशा दृष्टिकोनातून पाहिल्यानंतर दिवाळी म्हणजे मनाला उजळवणारा, तिमिरातून तेजाची दिशा दाखवणारा, विलक्षण सौंदर्यदृष्टी असलेला, एक परिपूर्ण, स्थिर विचार वाटला. दिवाळीतल्या प्रत्येक दिवसाच्या प्रथेमागे कुणा ना कुणासाठी कृतज्ञता आहे किंवा कुठल्या ना कुठल्या नात्याची जपणूक आणि जोडीला निसर्गासोबतची अनुभूती. दिवाळी अतिशय समग्रतेनं उत्कट जीवनानुभव देते. फक्त त्याकडे तसं पाहायला हवं.
वसुबारसेला सवत्स धेनूची पूजा – आपल्या मुलाबाळांना दूध देणाऱ्या गायीबद्दल कृतज्ञता व्यक्त करतानाच आई-मुलांच्या नात्याचं दृढीकरण. धनत्रयोदशीला एकीकडे धन्वन्तरी जयंती आणि सोबत यम-दीपदानदेखील. नरक चतुर्दशीमागची मुख्य संकल्पना आहे, अनिष्ट प्रवृत्तींचा नाश. पण अभ्यंगस्नानाची प्रथा आणखीही बरंच काही देते. ऐन थंडीत भल्या पहाटे आई-आजीनं घरातल्या लहान-थोरांना तेल-उटणं लावून देण्यात प्रत्येक वयाच्या स्पर्शाच्या गरजेचा विचार आहे. अनुभवलीच पाहिजे अशी आश्विनातली सुखदायी थंडी. त्या थंडीत पाठीवरून, अंगावरून फिरणारा तो मायेचा स्पर्श ऊब देतो, नि:शब्दपणे आधार देतो. तसंच नातं बळकट करतो पती-पत्नीच्या नात्याचा सन्मान करणारा पाडवा आणि भाऊ-बहिणींची भाऊबीज.
सण आणि प्रथांमध्येच हे बांधून टाकल्यामुळे प्रत्येक घराला आणि प्रत्येक व्यक्तीला हे भाग्य निश्चितपणे मिळणारच. या सर्वाच्या सोबतीला सतत पाश्र्वभूमीवर आहे पणतीची ज्योत. नव्हे, दीपांची आवली. त्यामुळे नात्यांमधली समग्रताही पणतीच्या प्रतीकासोबत आपोआप जोडली गेली आहे.
दिवाळीतल्या लक्ष्मीपूजनासोबतही असंच बरंच जोडलेलं. धनलक्ष्मीच्या पूजेआधी ‘लक्ष्मी’ म्हणून नव्या केरसुणीची पूजा करण्यामागे स्वच्छतेचं महत्त्व अधोरेखित केलंय. लक्ष्मीपूजनाला आश्विनातल्या अमावास्येचा मुहूर्त शोधून पूर्वसुरींनी अमावास्येला शुभदायी तर केलंच वर त्या रात्रीच्या सौंदर्याचा विशेष सन्मान केलाय. दिवाळी म्हणजे निसर्ग आणि मानवाच्या परस्परपूरकतेचा एक परिपूर्ण अनुभव वाटतो.
दिवाळीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला तशी या समग्र, सर्वसमावेशक विचारातली परिपूर्णता टप्प्याटप्प्यानं जाणवत गेली. आता ‘दिवाळी’ या शब्दासोबत एक चित्र (व्हिज्युअल) माझ्या डोळ्यांसमोर उभं राहतं.     
अमावास्येच्या रात्री एक एकांडा प्रवासी पाठीवर बरंच ओझं घेऊन अंधारातून चालला आहे. अंधारात चेहरा स्पष्ट दिसत नाही, पण कल्पनाचित्रात सहसा ते आपणच असतो. तो प्रवासानं थकला आहे. त्याच्या मनात एक अस्वस्थता आहे. ‘कधी संपेल हा थकवणारा प्रवास? की संपणारच नाही? कधी पोहोचेन मुक्कामाला? मुक्कामाच्या गावातले लोक कसे असतील?’ अशी साशंकताही त्याला मधूनमधून छळते आहे. वातावरणात थोडी बोचरी, पण सुखद थंडी आहे. त्या अंधारात प्रवाशाला दूरवर दिव्यांच्या ठिपक्यांची ओळ दिसते. अपरात्री अचानक मुक्काम दिसल्यावर तो घाईनं गावापाशी पोहोचतो. वर निरभ्र आकाशात चंद्र नसताना एकेक तारा आणखी लखलखीत चमकत असतो आणि खाली प्रत्येक दारात असतात उजळत्या दीपमाला. घराघरांच्या कोनाडय़ांत लावलेल्या मंद दिव्यांच्या ज्योती त्याचं नि:शब्दपणे स्वागत करत असतात. त्या ज्योतींकडे पाहून त्याला अतिशय शांत वाटतं. त्याच्या मनात त्या गावाबद्दलच एक विश्वास जागतो. ते अनोळखी गाव त्याला एकदम आपलं वाटतं. दिव्याच्या ज्योतींकडून आकाशातल्या ज्योतींकडे पाहताना त्याचे हात आपोआप जोडले जातात आणि त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडतात, दीपज्योती नमोस्तुते!                                                    
neelima.kirane1@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2013 1:10 am

Web Title: inspression to work
Next Stories
1 वित्तीय साक्षरता चाचणी
2 प्रतिभा जाणून घेण्याचे मार्ग
3 स्पर्धापरीक्षेच्या रिंगणात : एमपीएससी – रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया
Just Now!
X