फारुक नाईकवाडे

मुख्य परीक्षा पेपर चार यामधील अर्थव्यवस्था घटकाच्या तयारीबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे.

* पारंपरिक व संकल्पनात्मक मुद्दे

* सर्वप्रथम अर्थव्यवस्था विषयाच्या संकल्पना व संज्ञा व्यवस्थित समजून घेणे आवश्यक आहे. या विषयाच्या संकल्पना परस्परांशी घनिष्ठपणे संबंधित असतात. त्यामुळे तुलनात्मक अभ्यासाने हा विषय सोपा होतो.

* दारिद्रय़, बेरोजगारी, पायाभूत सुविधा या संकल्पना समजून घेतानाच त्यांच्या बाबतीत भारतासमोरच्या समस्यांचे स्वरूप, कारणे, परिणाम आणि संभाव्य उपाय यांचा सारणी परीक्षेमध्ये अभ्यास आवश्यक आहे.

* पंचवार्षिक योजनांचा अभ्यास भारतीय अर्थव्यवस्थेची प्रगती साधण्यासाठी शासनाचे प्रयत्न म्हणून करावा. यासाठी पुढील मुद्दे लक्षात घ्यावेत –

योजनेचा कालावधी, घोषित ध्येये, हेतू व त्याबाबतची पाश्र्वभूमी, योजनेचे प्रतिमान, असल्यास घोषणा, सामाजिक पलू, सुरू करण्यात आलेले उपक्रम, कार्यक्रम, योजना, योजना काळात घडलेल्या उल्लेखनीय आर्थिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घटना, मूल्यमापन व यशअपयशाची कारणे, परिणाम, योजनेच्या कालावधीत घोषित करण्यात आलेली आर्थिक, वैज्ञानिक धोरणे, योजनेमध्ये विविध क्षेत्रांवर करण्यात आलेल्या खर्चाची, उत्पादनांची टक्केवारी पाहावी.

* समष्टी अर्थशास्त्र

* राष्ट्रीय उत्पन्न, ते मोजण्याच्या पद्धती, साधने, चलनवाढ आणि महागाईबाबतचे सिद्धांत, कारणे, परिणाम, उपाय यांचा अभ्यास. RBI ची कार्ये हा मुद्दा पारंपरिक परिप्रेक्ष्यातून पाहण्यापेक्षा महागाई, चलनवाढ नियंत्रण, व्याजदर नियंत्रण यातील RBI ची भूमिका समजून घेण्यावर भर द्यावा.

* सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था या उपघटकाचा अभ्यास त्यामध्ये नमूद प्रत्येक मुद्दा मूलभूतपणे समजून घेऊन करणे आवश्यक आहे. यातील अद्ययावत मुद्दे व आकडेवारी माहीत असायला हवी. आर्थिक पाहणी अहवालामध्ये याबाबत होणारी चर्चा, नवे मुद्दे, संकल्पना व्यवस्थित समजून घेणे आवश्यक आहे.

* सार्वजनिक वित्त घटकामध्ये अर्थसंकल्प हा मुद्दा मध्यवर्ती ठेवून संबंधित संकल्पना समजून घ्याव्यात. अथसंकल्पाचे प्रकार, त्याच्या मंजुरीची प्रक्रिया, महसूल, कर रचना, कर सुधारणा, वित्तीय सुधारणा, वित्तीय तूट व त्याची कारणे, परिणाम, उपाय, याबाबतचे शासकीय तसेच फइकचे निर्णय, शासकीय कर्जे, शासकीय खर्च, त्यातील बाबी हे मुद्दे व्यवस्थित तयार करावेत.

* वित्तीय संस्थांपैकी केवळ बँकांचा उल्लेख केलेला आहे. बँकांचे प्रकार, त्यांची स्थापना व त्यामागची भूमिका, बँकिंग क्षेत्रातील नवे ट्रेन्ड्स, संकल्पना, या क्षेत्रातील चालू घडामोडी, शासकीय तसेच फइकचे निर्णय या मुद्दय़ांचा आढावा घ्यायला हवा.

* विकास

*   हा मुद्दा आंतरराष्ट्रीय परिप्रेक्ष्यातून अभ्यासावा असे आयोगास अपेक्षित आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील विकास संबंधित संज्ञांचा उल्लेख अभ्यासक्रमामध्ये करण्यात आला आहे. शाश्वत विकास, हरित विकास, पर्यावरणीय मुद्दे, बहुराष्ट्रीय संस्था या संकल्पना, त्यांचा आंतरराष्ट्रीय संदर्भ लक्षात घेऊन समजून घ्याव्यात.

*   आर्थिक विकासाची साधने म्हणून नैसर्गिक व मानवी साधनसंपत्ती हे मुद्दे पाहावेत. यासंदर्भात अभ्यासक्रमामध्ये देण्यात आलेले निर्देशांक, त्यांची पाश्र्वभूमी, त्यातील भारताचे स्थान समजून घ्यावे.

*   भारतातील शहरी व ग्रामीण पायाभूत सुविधांचा विकास, सहकार, उद्योग व कृषीचे अर्थव्यवस्थेतील महत्त्व हे चार घटक पारंपरिक व करंट अशा दोन्ही आयामांनी अभ्यासायचे आहेत.

*   उद्योगांचे प्रकार, महत्त्व, सध्याचे स्थान, जागतिकीकरणाचा परिणाम इ. मुद्दय़ांचा संकल्पनात्मक अभ्यास महत्त्वाचा आहे. औद्योगिक धोरणे व विविध पंचवार्षिक योजनांमधील उद्योग क्षेत्राची प्रगती बहुविधानी प्रश्नांसाठी महत्त्वाची आहे. यामध्ये महाराष्ट्राचा विशेष संदर्भ बारकाईने पाहायला हवा.

*   सहकार क्षेत्राची ब्रिटिश काळापासूनची प्रगती, महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतील सहकारी संस्था, त्या क्षेत्रातील सहकाराची कामगिरी, राज्याचे धोरण व सहकाराची समर्पकता हे मुद्दे संकल्पनात्मक प्रश्नांसाठी महत्त्वाचे आहेत.

*   पायाभूत सुविधांबाबत सारणी पद्धतीमध्ये पुढील मुद्दे असावेत – सुविधेचे असल्यास प्रकार, उपलब्धता (राष्ट्रीय, राज्य), विकासातील महत्त्व,  मागणी / गरज / वापर, समस्यांचे स्वरूप, कारणे, उपाय, शासकीय धोरणे, शासकीय योजना

*   शासकीय योजना त्यांच्या उद्देश / विषयाप्रमाणे विचारात घ्याव्यात. उदा. रोजगारासाठीच्या योजना एकत्रितपणे अभ्यासल्यास त्यांच्यातील साम्य-फरकाचे मुद्दे लक्षात येतील. योजनांसाठी पुढील मुद्दे पाहायचे आहेत.

सुरू झाल्याचे वर्ष, असल्यास कायद्याचे नाव, कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या कालावधीत सुरू, ध्येय, हेतू, स्वरूप, खर्चाची विभागणी, अंमलबजावणी करणारी यंत्रणा, असल्यास लाभार्थ्यांचे निकष, कुठल्या योजनेत विलीन झाली असेल तर त्या योजनेचे नाव, मूल्यमापन, राजकीय आयाम

*  आंतरराष्ट्रीय व्यापार

*   आंतरराष्ट्रीय व्यापाराबाबतचे सिद्धांत, भारताचे इतर देशांशी व्यापारी करार, भारत सदस्य असलेले प्रादेशिक व्यापारी करार तसेच महत्त्वाचे प्रादेशिक व्यापारी करार व त्यातील सदस्य देश यांचा अद्ययावत अभ्यास आवश्यक आहे. जागतिक बँक गटातील वित्तीय संस्था त्यांची रचना, कार्ये, महत्त्वाचे अद्ययावत निर्णय व त्याबाबत भारताची भूमिका अशा आयामांच्या आधारे अभ्यासाव्यात.

*   जागतिकीकरण, आर्थिक उदारीकरण व त्याचे टप्पे, त्यामागची पाश्र्वभूमी, त्यांचे सामाजिक, आर्थिक परिणाम हे मुद्दे विश्लेषण करून समजून घ्यावेत. याबाबत उद्योग व भारतीय अर्थव्यवस्थेतील महत्त्वाच्या घटकांवर झालेला, होणारा परिणाम समजून घेणे आवश्यक आहे.

याचबरोबर काही मूलभूत गोष्टींबाबत महाराष्ट्राचा अभ्यास गरजेचा आहे. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची वैशिष्टय़े, पंचवार्षिक योजनांमधील महत्त्वाचे मुद्दे, महाराष्ट्रातील कृषीविषयक बाबी,

ग्रामीण, नागरी, पायाभूत सूविधा इ. पारंपरिक बाबीसुद्धा अभ्यासणे आवश्यक आहे.