tayari-mpscराज्यसेवा पूर्वपरीक्षा पेपर-१ तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पेपर-१ मध्ये विज्ञान व तंत्रज्ञान हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. तसेच राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या सामान्य अध्ययन पेपर- ४ चा विज्ञान व तंत्रज्ञान मुख्य घटक आहे. साधारणत: राज्यसेवा पूर्वपरीक्षेत या घटकांवर २० ते २५ प्रश्न, तसेच मुख्य परीक्षेला ७० ते ७५ प्रश्न विचारले जातात.
विज्ञान व तंत्रज्ञान या घटकाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये दोन गट पडतात. काही विद्यार्थी विज्ञान शाखेतील असतात. त्यांना हा घटक सोपा जातो, मात्र हा घटक सोपा आहे असे समजून अनेकदा ते या घटकाकडे दुर्लक्ष करतात आणि ऐन परीक्षेच्या दिवशी प्रश्नांची उत्तरे चुकतात. त्यामुळे विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनीदेखील या घटकांतील प्रत्येक उपघटकाचा व्यवस्थित अभ्यास करावा. दुसरा गट म्हणजे, कलाशाखेतील पदवीधर ज्यांची या उपघटकाची तयारी, दहावीनंतरच थांबलेली असते, त्यांना हा घटक अनेकदा डोकेदुखी वाटतो. अनेकदा या घटकाचा योग्य प्रकारे अभ्यास न झाल्याने परीक्षार्थीना अपयश येते. अशा विद्यार्थ्यांपुढे विज्ञान व तंत्रज्ञान या घटकाची तयारी कशी करावी हा मोठा प्रश्न असतो.
या घटकाची तयारी करताना विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे की, या उपघटकात विज्ञानावर आधारित प्रश्नांवर कमी भर असतो तर तंत्रज्ञानविषयक किंवा व्यावहारिक उपयोजनांबद्दल जास्त प्रश्न विचारले जातात. या घटकाची तयारी करण्यासाठी अभ्यासक्रम आपण दोन भागांत विभाजित करू –
– विज्ञान या घटकावरील अभ्यासक्रम.
– तंत्रज्ञान व व्यावहारिक उपयोगावरील अभ्यासक्रम.
विज्ञान या घटकावरील अभ्यासक्रमात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र यांचा समावेश होतो. यातही सर्वात जास्त प्रश्न जीवशास्त्र विशेषत: मानवी आरोग्यशास्त्रावर विचारले जातात.  जीवशास्त्राच्या घटकाचा अभ्यास करताना मानवी आहार, मानवी रोग, पचनसंस्था, मानवी रक्ताभिसरण संस्था, मानवी अस्थी व स्नायुसंस्था, चेतासंस्था, ग्रंथी व श्वसनसंस्था, ज्ञानेंद्रिये यांचा अभ्यास करावा.
सर्व स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. या उपघटकाच्या अभ्यासासाठी अगदीच वैद्यकशास्त्राचे पुस्तक वाचायला पाहिजे असे नाही. अलीकडे या अभ्यासक्रमात इयत्ता पाचवीपासूनचा अभ्यासक्रम समाविष्ट केलेला आहे. या घटकाची तयारी करताना राज्य पाठय़पुस्तक निर्मितीच्या पाचवी ते दहावीपर्यंत पुस्तकांच्या, एन.सी.ई.आर.टी.ची पाचवी ते दहावीपर्यंतच्या पुस्तकांचे वाचन व्यवस्थित करावे. या घटकावर साधारणत: या प्रकारचे प्रश्न विचारले जातात-
प्रश्न- खालीलपकी कोणते विधान योग्य आहे?
* AB रक्तगट असणाऱ्या व्यक्तीला सर्वयोग्य दाता म्हणतात.
* O रक्तगट असणाऱ्या व्यक्तीला सर्वयोग्य ग्राही समजतात.
१.  विधान १ योग्य             २.  विधान २ योग्य  
३.  विधान १ योग्य व २ अयोग्य  ४.  विधान १ व २ अयोग्य.
भौतिकशास्त्र
भौतिकशास्त्राचा अभ्यास करताना गती व बल, कार्य, ऊर्जाशक्ती, दाब, उष्णता व तापमान, ध्वनी, प्रकाश, धाराविद्युत, विद्युत चुंबकीय पट्टा तसेच किरणोत्सारिता या घटकांवर भर द्यावा. यापकीही ध्वनी, प्रकाश व किरणोत्सारिता या घटकांवर जास्त भर द्यावा. भौतिकशास्त्राचा अभ्यास करताना अगदीच संकल्पना पाठ हव्यात असे नाही. नियम तोंडपाठ नसतील तरी चालेल, मात्र भौतिक घटकांचा आपल्या व्यावहारिक आयुष्यात काय उपयोग आहे, याची माहिती असणे गरजेचे ठरते. या घटकांवर खालील प्रकारचे प्रश्न विचारले जातात-
प्रश्न : खालीलपकी कोणते विधान योग्य आहे?
* रेसिंग कारची उंची कमी केल्याने तसेच अधिक रुंद चाके लावली गेल्याने त्याचा गुरुत्वमध्य जमिनीजवळ राहतो आणि तीव्र वळण घेताना कार उलटण्याचा धोका कमी असतो.
* क्रिकेटच्या मदानावर चेंडू झेलताना खेळाडू आपले हात मागे करत झेल घेतात. कारण चेंडू हातात आल्यावर आपण हात मागे केल्यास बल कार्य करण्याचा कालावधी वाढतो. हातावर कमी बल कार्य करते व हातावर कमी आघात होतो.. हे स्पष्टीकरण न्यूटनच्या पहिल्या नियमानुसार होऊ शकते.
१. विधान १ योग्य                 २. विधान २ योग्य
३. विधान १ योग्य  व २ अयोग्य  ४.  विधान १ व २ अयोग्य
रसायनशास्त्र
या घटकाचा अभ्यास करताना रासायनिक संज्ञा, रासायनिक अभिक्रिया अगदीच तोंडपाठ असणे आवश्यक नाही, मात्र रासायनिक घटनांचा व्यावहारिक उपयोग या दृष्टीने अभ्यास करायला हवा. अभ्यास करताना खालील घटकांवर भर द्यावा- अणुसंरचना, मूलद्रव्यांचे वर्गीकरण, धातू-अधातू, महत्त्वाची मूलद्रव्ये, त्यांची संयुगे, संमिश्रे. उदा. स्टेनलेस स्टील, तांबे, अॅल्युमिनिअम, फॉस्फरस, गंधक, गंधकाची संयुगे, नायट्रोजन, नायट्रोजनची संयुगे, नायट्रोजन चक्र, नायट्रोजनचे स्थिरीकरण, अमोनिकरण, नायट्रीकरण, इ. महत्त्वाच्या संकल्पना आणि त्यांचा उपयोग याचा अभ्यास करावा.
याशिवाय काही महत्त्वाची संयुगे, त्यांची व्यापारी नावे, रासायनिक नावे यांचा अभ्यास करावा. उदा. खाण्याचा सोडा, कॉस्टिक सोडा, प्लास्टर ऑफ पॅरिस, चुनखडी, मोरचूद, हिराकस, तुरटी यांच्या उपयोगाचा अभ्यास करावा.
कार्बन, कार्बनी संयुगे- अल्कीन, अल्काइन, मिथेन, इथिलिन, फ्रेऑन, कार्बनची अपरूपे, हिरा, ग्रॅफाइट यांचा अभ्यास करावा.
बहुवारिके आणि प्लास्टिक घटक व्यवस्थित अभ्यासावा. यात पॉलिथिन, अॅक्रेलिक, टेफलॉन इत्यादींची वैशिष्टय़े अभ्यासावीत. याशिवाय मानवनिर्मित धागे, रेऑन, नायलॉन, पॉलिस्टर धागे, अॅक्रिलिक धागे  यांच्यामधील फरक जाणून घ्यावेत.
काच- काचेचे प्रकार. उदा. प्लेट काच, सुरक्षा काच, बुलेटप्रूफ काच या घटकांवर प्रश्न विचारले जातात. नमुनादाखल प्रश्न पुढीलप्रमाणे आहेत-
प्रश्न : काचेला पिवळा रंग येण्यासाठी खालीलपकी कशाचा वापर करतात?
१) क्युप्रस ऑक्साइड     २) कॅल्शियम फॉस्फेट
३) अँटिमनी सल्फाइड   ४) कोबाल्ट ऑक्साइड
मित्रांनो, विज्ञान-तंत्रज्ञानाच्या अभ्यासातील हा केवळ एकच टप्पा आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा व संघ लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा व मुख्य परीक्षा मराठीतून लिहिणाऱ्यांसाठी हा घटक महत्त्वाचा ठरतो. राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी सुमारे ७० ते ७५ प्रश्न फक्त या घटकावरच असतात. मात्र, आधी उल्लेखलेल्या घटकाची तयारी जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत या घटकावर पूर्ण नियंत्रण येत नाही. यात खालील उपघटकांचा समावेश होतो- अवकाश संशोधन, जैवतंत्रज्ञान, भारताचे आण्विक धोरण, संगणक व माहिती तंत्रज्ञान, ऊर्जा, आपत्ती व्यवस्थापन, संरक्षण.
अवकाश संशोधन
या उपघटकाचा अभ्यास करताना  अवकाश कार्यक्रमाचा प्रारंभ, सॅटेलाइट लाँचिंग व्हेइकल, एसएलव्ही, पीएसएलव्ही, जीएसएलव्ही तसेच यामध्ये वापरले जाणारे इंधन याविषयी जाणून घ्यावे. क्रायोजेनिक इंजिन तसेच दूर संवेदन, दूर संवेदन उपग्रह इत्यादी बाबी अभ्यासाव्यात. भारतीय अवकाश संशोधन केंद्र- इस्रोची वेबसाइट अभ्यासावी.
जैवतंत्रज्ञान
व्याख्या, भारतातील जैवतंत्रज्ञानाची प्रगती, जैव अभियांत्रिकी, जीन थेरपी, स्टेम सेल्स, कृषी क्षेत्रात वापरात येणारे जैवतंत्रज्ञान, जीवाणू खते, बीटी कॉटन, बीटी वांगे, जीन बॅक, जैव ऊर्जा निर्मिती, भारतीय जैवइंधन धोरण, पर्यावरण संरक्षणासाठी जैवतंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञानाला होणारा विरोध यांचा अभ्यास करावा.
भारताचे आण्विक धोरण : हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. याचा अभ्यास करताना सर्वात प्रथम किरणोत्सारी पदार्थ, किरणोत्साराचे गुणधर्म, न्यूक्लीअर सप्लायर ग्रुप, भारतीय अणुऊर्जा संशोधनाचे टप्पे, अणुभट्टी, जड पाणी, अणुभट्टीचे प्रकार, भारतीय संशोधन अणुभट्टय़ा, पोखरण अणुस्फोट, पोखरण- १ व पोखरण -२, अणुकचरा, अणुकचऱ्याचे व्यवस्थापन, भारतीय अणुऊर्जेची सद्य परिस्थिती, अण्वस्त्र प्रसारबंदी करार, एन.पी.टी., सीटीबीटी व भारत-अमेरिका अणुकरार- २००१ याचा अभ्यास करावा.
संगणक माहिती तंत्रज्ञान
यात नेटवर्किंग-नेटवर्कचे प्रकार, मल्टिमीडिया, इंटरनेट, वेब तंत्रज्ञान, इ. प्रशासन, भारतातील ई- प्रशासनाच्या योजना, ई-बँकिंग, ई-कॉमर्स, सोशल नेटवर्किंग, सायबर क्राइम्स, हॅकिंग, क्रेकिंग, फिशिंग, स्कििमग इ. मीडिया लॅब एशिया, मीडिया लॅब एशियाचे प्रकल्प इ. अभ्यास करावा.
ऊर्जा
यात पारंपरिक ऊर्जा स्रोत, अपारंपरिक ऊर्जा स्रोत, पवनऊर्जा, समुद्राच्या लाटांपासून तयार होणारी ऊर्जा, भूऔष्णिक ऊर्जा, सौर ऊर्जा, बायोगॅस, महाऊर्जा, ऊर्जा संकट यांचा अभ्यास करावा.
 संरक्षण
यात मिसाइल, मिसाइल तंत्रज्ञान, पृथ्वी, अग्नी सागरिका, सूर्य मिसाइल, बॅलेस्टिक मिसाइल, यांचा अभ्यास करावा.
मित्रांनो, घटक विभागून अभ्यास केल्यास   जास्तीतजास्त मार्क्स मिळविता येतात.
अभ्यास साहित्य :
* महाराष्ट्र पाठय़पुस्तक निर्मितीची (विज्ञान ) पाचवी ते दहावीपर्यंतची पुस्तके.
* NCERT ची (विज्ञान) ५ ते १० पर्यंतची पुस्तके
* इंडिया इयर बुक -(पब्लिकेशन डिव्हिजन केंद्र सरकार) यातील विज्ञान व तंत्रज्ञान विभाग.
* केंद्र सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञानासंबंधी वेबसाइट्स.
* ल्युसेंट प्रकाशनाचे (इंग्रजी) – विज्ञान व तंत्रज्ञान हे पुस्तक.                                                            
grpatil2020@gmail.com