28 March 2020

News Flash

यूपीएससीची तयारी : मध्ययुगीन भारताचा इतिहास

यूपीएससी पूर्व परीक्षेकरिता मध्ययुगीन भारताचा इतिहास या अभ्यास घटकाविषयी चर्चा करणार आहोत.

डॉ. गणेश देविदास शिंदे

प्रस्तुत लेखामध्ये आपण यूपीएससी पूर्व परीक्षेकरिता मध्ययुगीन भारताचा इतिहास या अभ्यास घटकाविषयी चर्चा करणार आहोत. मध्ययुगीन भारताच्या इतिहासाची व्याप्ती व परीक्षेतील वेटेज लक्षात घेता या घटकाबाबत परीक्षार्थीनी नेमक्या आणि निश्चित रणनीतीचा अवलंब करणे क्रमप्राप्त आहे. या घटकावर सन २०११ ते २०१९मध्ये एकूण १६ प्रश्न विचारण्यात आले आहेत. पूर्व परीक्षेतील इतर घटकांच्या तुलनेत या घटकावर कमी प्रश्न विचारले जातात. त्यामुळे या अभ्यास घटकासाठी आवश्यक, नेमकी व निश्चित रणनीती गरजेची आहे. या रणनीतीचा आढावा आपण प्रस्तुत लेखामध्ये घेणार आहोत.

मध्ययुगीन भारताचा इतिहास हा अभ्यासघटक तीन भागांमध्ये विभाजीत करता येतो.

(१) प्रारंभिक मध्ययुग : सन ७५० ते १२००

(२) सुलतानशाहीचा कालखंड : सन १२०० ते १५२६

(३) मुघल कालखंड : सन १५२६ ते १७०७

(१) प्रारंभिक मध्ययुग : (सन ७५० ते १२००) या कालखंडामध्ये दोन प्रकारची वैशिष्टय़े पाहावयास मिळतात. एक म्हणजे, भारतातील सरंजामशाही स्वरूपाच्या राजकीय शासनव्यवस्थेचा उदय आणि दुसरे म्हणजे, भारतात इस्लाम धर्माचे आगमन व सिंध प्रांतातून सुरू झालेले अरबांचे व तुर्काचे आक्रमण होय. तसेच या कालखंडामध्ये भारताच्या विविध भागांमध्ये प्रादेशिक व राजकीय सत्तांचा उदय झालेला होता. उदा. उत्तर-भारत (प्रतिहार, परमार, चौहान व चंदेल), पूर्व-भारत (पाल साम्राज्य), दक्षिण-भारत (राष्ट्रकूट, चोल, चालुक्य, पल्लव)

इत्यादी सत्ता अस्तित्वात होत्या.

(२) सुलतानशाही कालखंड : (सन १२०० ते १५२६) या कालखंडामध्ये दिल्ली सल्तनत आणि समकालीन प्रादेशिक सत्तांचा समावेश होता. दिल्ली सल्तनती अंतर्गत गुलाम किंवा इलबारी घराणे, खल्जी घराणे, तुघलक घराणे, सय्यद व लोदी घराणे यांचा समावेश होता. तर दिल्ली सल्तनतच्या समकालीन सत्तेमध्ये देवगिरीचे यादव, होयसाळ, काकतीय, विजयनगर, बहमनी साम्राज्य तसेच काश्मीर, गुजरात, बंगाल येथील प्रादेशिक सत्तांचा समावेश होता.

(३) मुघल साम्राज्याचा कालखंड : (सन १५२६ ते १७०७) बाबरने पानिपतच्या प्रथम युद्धातील विजयाने भारतामध्ये मुघल सत्तेची स्थापना केली. आणि त्यानंतर हुमायून, अकबर, जहांगीर, शाहजहान, औरंगजेब यांनी यशस्वीरीत्या मुघल साम्राज्य अबाधित ठेवले. या कालखंडातही मुघलांच्या काही समकालीन प्रादेशिक सत्ता अस्तित्वात होत्या किंवा त्यांचा उदय झाला होता. उदाहरणार्थ, सुरी घराणे (शेरशाह सुरी-अफगाण), राजस्थानमधील राजपूत, दक्षिण भारतातील आदिलशाही, निजामशाही आणि महाराष्ट्रातील मराठा साम्राज्य यांचा यामध्ये समावेश होता.

वरील तीन भागांव्यतिरिक्त मध्ययुगीन भारतामध्ये भक्ती चळवळ आणि सुफी चळवळ या दोन धार्मिक चळवळी अस्तित्वात आल्या होत्या आणि त्यांचा तत्कालीन समाजजीवनावर मोठा प्रभाव पडलेला होता. यातील भक्ती चळवळ िहदू धर्माशी संबंधित होती. याव्यतिरिक्त शीख चळवळीच्या माध्यमातून शीख धर्माची स्थापना झालेली होती. शीख धर्माची स्थापना गुरुनानक यांनी केलेली होती.

यूपीएससी पूर्व परीक्षेतील मागील वर्षांत आलेले प्रश्न

(१) कल्याण मंडपाचे बांधकाम हे कोणत्या राजाच्या मंदिर स्थापत्यशैलीचे महत्त्वाचे वैशिष्टय़ होते? (२०१९)

(A) चालुक्य    (B) चंदेल

(C) राष्ट्रकुट    (D) विजयनगर

(२) खालील विधाने विचारात घ्या. (२०१९)

(I) दिल्ली सल्तनतच्या महसूल प्रशासनामध्ये महसूल वसुलीचा प्रभारी अमिल म्हणून ओळखला जात असे.

(II) दिल्ली सल्तनतमधील इक्ता पद्धत प्राचीन स्वयंमनिर्मित पद्धत होती.

(III) दिल्लीच्या खल्जी सल्तनतीमध्ये मीरबक्षीचे कार्यालय अस्तित्वात आले.

योग्य विधान/ने निवडा.

(A) केवळ I    (B) केवळ I व II

(C) केवळ III          (D) I, II, III

(३) खालीलपैकी कोणत्या परकीय प्रवाशाने विस्तृतपणे भारतातील हिरे आणि हिऱ्यांच्या खाणी याविषयी चर्चा केली आहे? (२०१८)

(A)    फ्रॅकॉइस बर्निअर

(B)    जीन बाप्टिस्टे टेवर्निअर

(C)    जीन दी थेवेनॉट

(D)    अब्बे बाथ्रेलेमी कॅरे

(४) खालीलपैकी कोणते बंदर (Seaport) काकतीय राज्यातील होते? (२०१७)

(A)  काकीनाडा  (B) मोतुपल्ली

(C) मसुलीपट्टणम (D) नेल्लुर

(५) मध्ययुगीन भारताच्या आर्थिक इतिहासासंदर्भात ‘अराघत्ता’ (Araghatta) हे काय दर्शवते? (२०१६)

(A) वेठबिगार

(B) लष्करी अधिकार यांना दिले जाणारे भूदान

(C) जमीन सिंचनासाठी वापरले जाणारे जलचक्र

(D) पडीक जमिनीचे सुपीक जमिनीमध्ये केले जाणारे रूपांतर

(६) मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये ‘बंजारा’ हे कोण होते? (२०१६)

(A) शेतकरी    (B) योद्धा

(C) विणकर    (D) व्यापारी

उपरोक्त स्वरूपांचे प्रश्न या घटकावर विचारले गेले आहेत. साधारणत: हे प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपाचे आहेत. या घटकांवर विचारण्यात आलेल्या प्रश्नांवरून असे लक्षात येते की, हा घटक मुद्देनिहाय माहितीचे संकलन करून अभ्यासणे गरजेचे आहे. पूर्व परीक्षेतील प्रश्नांचा कल पाहता पूर्व परीक्षेत मुख्यत: मध्ययुगातील राजकीय व्यवस्थेऐवजी प्रशासकीय व सांस्कृतिक व्यवस्था, भक्ती आणि सुफी चळवळ आणि दक्षिण भारतीय इतिहासाशी संबंधित प्रश्न विचारले गेल्याचे दिसत असले तरी या घटकाचे संपूर्णपणे मूलभूत अध्ययन करणे आणि आकलन करून घेणे आवश्यक आहे.

संदर्भ साहित्य – या घटकाच्या तयारीसाठी

NCERT – सतीश चंद्र (Old),,

NCERT – सातवी – our Past Part – II,

NCERT – बारावी – Themes in Indian History Part – II – कक या संदर्भसाहित्याचा आधार घेऊन पूर्व परीक्षेची तयारी करता येते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2020 3:53 am

Web Title: preparation of upsc exam 2020 upsc exam tips zws 70
Next Stories
1 नोकरीची संधी
2 एमपीएससी मंत्र : दुय्यम सेवा पूर्व परीक्षा चालू घडामोडी
3 यूपीएससीची तयारी : प्राचीन भारत
Just Now!
X