श्रीकांत जाधव

मागील लेखामध्ये आपण भूगोलाच्या अभ्यासक्रमाची उकल करून या अभ्यासघटकाची तयारी कशी करावी, याचा आढावा घेतला. तसेच भूगोल या अभ्यासघटकातील महत्त्वाचा टॉपीक प्राकृतिक भूगोल व नकाशावाचन याबाबत जाणून घेतले. प्रस्तुत लेखामध्ये पर्यावरणीय, सामाजिक व आर्थिक भूगोल या अभ्यास घटकांविषयी चर्चा करणार आहोत.

सामाजिक व आर्थिक भूगोल याअंतर्गत कोणत्या उपघटकांचा समावेश होतो, याची माहिती घ्यावी. या घटकांचा अभ्यास भारत व जगाच्या अनुषंगाने करावा. आर्थिक भूगोलामध्ये प्रामुख्याने मानवी आर्थिक प्रक्रिया व नैसर्गिक साधनसंपत्ती यांचा अभ्यास केला जातो. राष्ट्रातील आर्थिक प्रक्रियांचा अभ्यास करताना कृषी, उद्योग, सेवाक्षेत्र यामधील सद्यस्थिती, त्याबाबतची शासकीय धोरणे, योजना यांचा समकालीन घडामोडींचा दृष्टीकोनातून आढावा घ्यावा.

२०२०

प्र. खालील खनिजे लक्षात घ्या.

* बेन्टोनाइट

* क्रोमानाइट

* कायनाइट

* सिलीमानाइट

भारतामध्ये वरीलपैकी कोणत्या खनिजास अधिकृतपणे प्रमुख खनिज असा दर्जा दिला आहे. खाणीकर्म मंत्रालयाने क्रोमाइट, कायनाइट व सिलीमनाइट या खनिजांना प्रमुख खनिजांचा दर्जा दिला आहे. या प्रकारच्या प्रश्नांची उकल करण्यासाठी देशातील तसेच जगातील प्रमुख खनिजे, त्यांचे उत्पादन, आढळ इ. पारंपरिक बाबी माहीत असणे आवश्यक आहेत. मात्र याबरोबरच सद्यस्थितीमध्ये या क्षेत्राविषयी ज्या घडामोडी घडतात ते पाहण्यासाठी संबधित मंत्रालयाच्या संकेतस्थळांना अधूनमधून भेट देणे गरजेचे आहे.

२०१८

भारतीय कृषी क्षेत्राच्या संदर्भात ‘संवर्धन कृषी‘ या संकल्पनेचे महत्त्व वाढत आहे. खालीलपैकी कोणकोणत्या बाबी ‘संवर्धन कृषी‘ या संकल्पनेचे महत्त्व वाढवत आहेत. खालीलपैकी कोण—कोणत्या बाबी कृषी संवर्धनांतर्गत येतात?

* एक पीक पद्धती टाळणे.

* न्यूनतम लागवडीखालील क्षेत्र.

* फ्लोटेशन क्रॉसची लागवड टाळणे.

* मृदेचा पृष्ठभाग आच्छादित करण्यासाठी पिकांच्या अवशेषांचा वापर.

* स्थानिक आणि काल्पिक पीक आवर्तनाचा स्वीकार करणे.

२०१३

भारतातील खालीलपैकी कोणते उद्योग पाण्याचे अधिक उपभोक्ते आहेत?

* अभियांत्रिकी

* पेपर व पल्प

* टेक्सटाइल

* औष्णिक उर्जा

सामाजिक भूगोलामध्ये लोकसंख्या भूगोल, वसाहत भूगोल या घटकांचा अभ्यास करावा लागतो. लोकसंख्या भूगोलामध्ये विविध लोकसंख्याशास्त्रीय घटक उदा. लोकसंख्यावृद्धी, वितरण, जन्मदर, मृत्युदर, लिंग गुणोत्तर, कार्यकारी गटातील लोकसंख्या, लोकसंख्या लाभांश इ. घटकांची माहिती करून घ्यावी. यासोबतच स्थलांतराची कारणे, प्रकार, परिणाम, अभ्यासावे. भारताचे लोकसंख्याविषयक धोरण, लोकसंख्याविषयक महत्त्वाच्या संकल्पना, वंश, जमात, जात, धर्म, सांस्कृतिक प्रदेश, भाषा इ. बाबींचा आढावा घेणे महत्त्वाचे ठरते.

वसाहत भूगोलामध्ये मानवाच्या नागरी व ग्रामीण वसाहतींचा अभ्यास केला जातो. भारताचा औद्योगिक विकास झाल्यानंतर स्थलांतर मोठय़ा प्रमाणात वाढून ग्रामीण व नागरी क्षेत्रांमध्ये समस्या निर्माण झाल्या. या समस्यांवर शासन विविध धोरणे निर्माण करत असते. उदा. स्मार्ट  सिटी प्रकल्प.

२०१९

* भारतामध्ये विशिष्टता असुरक्षित जमाती सुसमूहांच्या (PVTG) बाबत खालील  विधाने विचारात घ्या.

* PVTGs देशातील १८ राज्ये तथा एक केंद्रशासित प्रदेशामध्ये राहतात.

* स्थिर किंवा कमी होणारी लोकसंख्या, PVTGs दर्जाच्या निर्धारणाकरिता  लागणाऱ्या मानकांपैकी एक आहे.

* देशात आतापर्यंत ९५ PVTGs अधिकृतपणे अधिसूचित आहेत.

* PVTGS च्या यादीमध्ये इरुलर आणि कोंडारेड्डी जमातींचा समावेश केला आहे.

या प्रकारचे प्रश्न मानवी भूगोलामध्ये विचारले जातात.

पर्यावरण भूगोल या घटकांमध्ये प्रामुख्याने मानवी हस्तक्षेपामुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास अभ्यासणे आवश्यक आहे. हरितगृह परिणाम, जागतिक तापमानवाढ, जैवविविधतेतील घट, विविध प्रकारचे प्रदूषण, अम्लवर्षां, वाळवंटीकरण, पाणथळ भूमीचा ऱ्हास, निर्वनीकरण या घटनांचा सखोलपणे अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. या समस्यांवर उपाय काढण्यासाठी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रयत्नांचा मागोवा घ्यावा. भारतातील वेटलँडस् तसेच महासागराचे आम्लीकरण, वाळू, उपसा करण्याचे परिणाम इ. घटकांवर प्रश्न विचारले गेले आहेत.