News Flash

अभिव्यक्तीची क्षमता

जे ज्ञान आपल्याजवळ आहे त्याची दुसऱ्याला समजेल, पटेल, रुचेल अशा पद्धतीनं सुसूत्र मांडणी करून सहजतेनं व्यक्त करता येण्याची क्षमता म्हणजे अभिव्यक्ती क्षमता!

| August 12, 2013 12:11 pm

जे ज्ञान आपल्याजवळ आहे त्याची दुसऱ्याला समजेल, पटेल,    रुचेल अशा पद्धतीनं सुसूत्र मांडणी करून सहजतेनं व्यक्त करता येण्याची क्षमता म्हणजे अभिव्यक्ती क्षमता! कुठल्याही क्षेत्रातील दमदार वाटचालीसाठी तुमची अभिव्यक्ती विकसित  करणे अत्यावश्यक ठरते. त्याविषयी..

 एखाद्या नवीन विषयात आपण करिअर करायचं ठरवतो, त्यासाठी आवश्यक ती पात्रता (एलिजिबिलिटी) मिळवतो. मग प्रयत्नपूर्वक क्षमताबांधणी (कपॅसिटी बििल्डग) करून आपण स्वत:च्या सर्वोत्तम क्षमतेपर्यंत (पोटेन्शिअल) पोहोचण्याचा प्रयत्न करतो. या सगळ्या प्रवासामध्ये आणखी एक क्षमता सोबत असावी लागते ती म्हणजे अभिव्यक्तीची क्षमता. जे ज्ञान आपल्याजवळ आहे त्याची दुसऱ्याला समजेल, पटेल, रुचेल अशा पद्धतीनं सुसूत्र मांडणी करण्याची आणि ती योग्य प्रकारे सहजतेनं व्यक्त करता येण्याची क्षमता. अभिव्यक्ती हा शब्द जरासा जड असला तरी अर्थ नेहमीचा आणि सोपा आहे.
अनेकदा आपला अभ्यास छान झालेला असतो, पेपर लिहिताना सोपा वाटलेला असतो, पण नंतर जाणवतं की, जेवढं चांगलं आपल्याला येत होतं तेवढं आपल्याला व्यक्त होता आलं नाही. नोकरीसाठी इंटरव्ह्य़ू द्यायला आपण उत्साहानं जातो, पण ऐन वेळेला अवघडलेपण आणि भीती वरचढ ठरते. त्यामुळे अपेक्षेएवढी चांगली छाप (इंप्रेशन) पडत नाही. प्रोजेक्टची प्रत्येक गोष्ट तोंडपाठ असते, पण चेअरमनना पाचच मिनिटं वेळ असतो. मग मनाजोगं सांगताच येत नाही. या सगळ्याचं कारण बरेचदा असं असतं की, आपल्याकडची माहिती, ज्ञान, मजकूर (नॉलेज अँड कंटेंट) उत्तम असतात, पण अभिव्यक्तीबाबत (एक्स्प्रेशन) पुरेसा विचार झालेला नसल्यामुळे सादरीकरणात (प्रेझेंटेशन) आपण कच्चे पडतो.
समजा, एक पाच-सहा ओळींचे ‘अत्यंत महत्त्वाचे’ निवेदन सर्वानी वाचण्यासाठी शासकीय कार्यालयाच्या किंवा एखाद्या कंपनीच्या नोटीस बोर्डवर लावलेले आहे. ते दोन मिनिटांत तयार करून टायपिस्टने आपल्या कार्यक्षमतेचा पुरावा दिला; परंतु कागदाच्या वरच्याच टोकावर त्या सहा ओळी छापून नोटीस बोर्डच्या वरच्या बाजूला एकच टाचणी वापरून त्यानं ते लावलं. नजरेच्या पातळीच्या वर आणि एकाच टाचणीमुळे गुंडाळीसारखं तरंगणारं ते निवेदन कोणीच वाचत नाही. एखादा वाचायला गेला तरी टाचा वर करून तो बारीक अक्षरांतला, गुंतागुंतीचा टाइप मुळीच वाचता येत नसतो. त्यामुळे ते ‘अत्यंत महत्त्वाचे’ निवेदन वाचलेच जात नाही. करणाऱ्याच्या दृष्टीनं त्याचं काम वेळेत पूर्ण झालेलं असूनही त्याचा परिणाम मिळत नाही, कारण सादरीकरणाचा विचार झालेला नसतो.
चांगली अभिव्यक्ती हा विषय असा सर्वस्पर्शी आहे. खरं तर शिक्षण सुरू असतानाच विषयाच्या मांडणीचाही विचार विद्यार्थ्यांच्या मनात उमटला पाहिजे, पण तसं खूप कमी जणांना जमतं. आपल्या शिक्षण पद्धतीत घोकंपट्टीला आणि मार्काना खूप महत्त्व आल्यामुळे कशा पद्धतीनं उत्तर लिहिलं की, मार्क मिळतात त्याचा साचेबद्ध प्रोग्राम मुलांच्या मनात स्टोअर झालेला असतो. गाइडमध्ये किंवा इतरत्र दिलेलं उत्तर पाठ करून/ समजून घेऊन/ लक्षात ठेवून साधारण तसंच्या तसं लिहिलं की बरे मार्क पडतात. बरंचसं रेडीमेड मिळाल्यानंतर स्वत:चा विचार, स्वत:ची मांडणी फारशी लागतच नाही. त्यामुळे समग्रतेनं विचार, वस्तुस्थितीशी त्याची जोडणी, परिणामांचा अंदाज या गोष्टी खूप लांब राहतात. त्यामुळे आपली अभिव्यक्तीची क्षमता किती आणि कशी आहे हेदेखील शालेय वयात सर्वाना कळत नाही.
सादरीकरणाशी कलेचं नातं जास्त जवळचं आहे. त्यामुळे दिग्दर्शक, गायक, वादक, चित्रकार, अभिनेते अशा कलाकारांनीच अभिव्यक्तीचा व्यवस्थित विचार करावा, असं नकळत गृहीत असतं. इतरांकडून शिकणं/ अभ्यास गांभीर्यानं झाला तरी सादरीकरण त्यामानाने दुर्लक्षित राहतं. त्यासाठी प्रत्येक विषयातल्या अभ्यासाचा किंवा विषय समजण्याचा पहिला टप्पा पार झाल्यानंतर ‘मी हे दुसऱ्याला समजेल आणि त्याला वाचावंसं/ ऐकावंसं/ पाहावंसं वाटेल अशा प्रकारे कसं मांडू शकेन?’ याबाबतही लहान वयापासून विचार व्हायला हवा. ज्याच्यासाठी आपलं ज्ञान आपण मांडतो आहोत त्याची गरज काय आहे ते लक्षात घ्यायला हवं. जागच्या जागी राहिलेलं किंवा अनाठायी गेलेलं ज्ञान कितीही थोर असलं तरी ते नसल्यासारखंच असतं, याचं भान प्रत्येकानं घ्यायला हवं.
सुप्रसिद्ध संगीतकार सुधीर फडके एका मुलाखतीत म्हणाले होते की, ‘माझ्याहून चांगलं गाणारे किंवा चांगलं संगीत देणारे कित्येक असतील, पण मी नेहमी चित्रपटाची, भूमिकेची गरज पाहून संगीत दिलं. मला किती येतंय ते दाखवण्याच्या मोहात पडलो नाही. म्हणून बहुधा लोकांनी मला स्वीकारलं.’ त्यांचं हे विधान अभिव्यक्तीबाबतची गुरूकिल्ली ठरावं.
अभिव्यक्तीचा संबंध मार्केटिंगमध्येही खूप येतो. मार्केटिंगच्या पुस्तकांतल्या व्याख्येप्रमाणे, ‘चांगला विक्रेता’ त्याला म्हटलं जातं, ‘जो ग्राहकाची गरज नेमकी ओळखून त्याला उपलब्ध उत्पादनांतून योग्य वस्तू/सेवा निवडायला मदत करतो.’ इथे हे लक्षात घ्यायला हवं की, ‘जो काहीही करून सर्वात जास्त माल विकतो आणि खूप कमिशन मिळवतो तो चांगला विक्रेता’ समजला जात नाही. स्वत:बद्दल किंवा आपल्या उत्पादनाबद्दल काही मांडतानादेखील हीच व्याख्या लावून पाहायला हरकत नाही.
अनेकांना आपल्यातलं चांगलं जगापुढे मांडण्यामध्ये वैयक्तिक पातळीवरही काही अडचणी असतात. स्वत:ला अभिव्यक्त करण्याचा प्रत्येकाचा अ‍ॅप्रोच वेगवेगळा असतो. काही लोक थोडंसं येत असलं तरी ब्रह्मज्ञानी असल्यासारख्या फुशारक्या मारतात. काहींना मनातल्या संकोचामुळे स्वत:बद्दल बोलणं जड जातं, तर काही जण आपल्या विषयात निष्णात होण्यापेक्षा वरिष्ठांच्या, संबंधितांच्या खुशामती करून पुढे सरकतात. ‘संकोच वाटतो,’  असं म्हणणारे फार कमी. त्याऐवजी ‘आम्हाला नाही ना त्यांच्यासारखं कुणाच्या पुढेपुढे करता येतं,’ असं तक्रारवजा धुसफुसत ‘मराठी बाणा’ जपला जातो. खरं तर ती एक प्रकारे दुर्बळाची अिहसा असते. पोकळ फुशारक्यांमधली हवा निघते तेव्हा फुशारक्या मारणारा केविलवाणा दिसतो, संकोच करणारा असाही स्वत:ला ‘बिचारा’च समजत असतो आणि अधिकारी व्यक्तीच्या पुढे पुढे करण्यामागची
भावना लाचारीची असते. यातल्या कुठल्याच पद्धतीमध्ये आत्मसन्मान राहात नाही. खरं तर प्रांजळ अभिव्यक्तीचा आणखी  एक पर्याय वागण्यासाठी उपलब्ध असू शकतो. वस्तुनिष्ठ डेटा गरजेप्रमाणे संबंधितांपर्यंत पोहोचवणे, ज्यामुळे त्यांना आपल्याबद्दल, आपल्या कामाबद्दल प्रामाणिक माहिती मिळून निर्णय घेणं सोपं जाईल.
त्यासाठी अभिव्यक्तीपूर्वी कशाकशाचा विचार करायला हवा? समोरची व्यक्ती/ समूह/ कंपनी ज्यांच्यापुढे आपल्याला आपलं काम मांडायचं आहे, त्यांची गरज काय आहे? त्यांची पाश्र्वभूमी (शिक्षण, भाषा, वयोगट इ.) काय आहे? आणि ही माहिती सादर करण्यामागे माझा उद्देश काय आहे? मला त्यातून काय मिळवायचे आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं एकमेकांशी खूप जोडलेली आहेत. त्यांचा स्वतंत्र आणि एकत्रित विचार जी स्पष्टता देतो, ती स्पष्टता विद्यार्थी, व्यावसायिक, कलाकार सर्वासाठी आवश्यक असते. विद्यार्थ्यांपासून ते मार्केटिंगच्या व्यक्तीपर्यंत आणि स्वत:चा परीक्षेचा पेपर, बायोडेटा लिहिण्यापासून ते आपल्या कलेच्या किंवा उत्पादनाच्या सादरीकरणापर्यंत सर्व ठिकाणी;
त्यानुसार मांडणी करताना ही स्पष्टता मुद्दे-मजकुराची नेमकी निवड (प्रॉपर कन्टेन्ट) करण्यासाठी आणि सुयोग्य सादरीकरणासाठी (अ‍ॅप्रोप्रिएट प्रेझेंटेशन) मदत करते.  
उदाहरणार्थ, परीक्षेचा पेपर लिहिताना विद्यार्थ्यांच्या हातात शब्द, आकृत्या आणि रंग आहेत. विद्यार्थ्यांने तो तपासणाऱ्या परीक्षकाची गरज समजून घ्यायला हवी. या विद्यार्थ्यांला विषय किती समजला आहे ते स्पष्ट होणे ही परीक्षकाची गरज आहे. परीक्षक कोण आहे, कसा आहे, त्याचं वय किती असेल, मार्क वाटतात की मार्क देताना हात आखडता घेतात, यातलं काहीच विद्यार्थ्यांला माहीत नाही. याचा अर्थ, तो विषय मुद्देसूदपणे कोणालाही समजेल अशा प्रकारे विद्यार्थ्यांला स्पष्ट करता यायला हवा. उत्तरासाठी कितीही कमी किंवा जास्त शब्दांची मर्यादा दिली असेल ती पाळून तरीही सर्व महत्त्वाचे मुद्दे येतील याची काळजी घ्यायला हवी. परीक्षकाला पेपर विनासायास वाचता यायला हवा. अन्यथा मजकूर योग्य असूनही त्याचा उपयोग होणार नाही. ओळीनं कित्येक तसेच पेपर्स तपासून परीक्षक वैतागलेला असूच शकतो. त्यामुळे आपल्या पेपरच्या सुवाच्य आणि नेमकेपणामुळे परीक्षकाचा वैताग पळाला तर बरं. त्यानंतर स्पष्ट असायला हवा, आपला स्वत:चा उद्देश. ‘उत्तम लिहून चांगले मार्क मिळवणं’ हा उद्देश असेल तर वरचं सगळं नीट पाळलं जाईल. तोच उद्देश जर ‘पेपरचं वजन भरपूर पाहिजे, भरगच्च दिसला पाहिजे’ असा असेल, ‘वेळ मारून नेणे’ असा असेल तर  फापटपसारा लिहिला जाईल. आकृत्या, रंगांनी पेपर कितीही सजवला तरी ती गडबड परीक्षकाला दिसेलच.
उद्देश स्पष्ट नसल्याने होणारी गडबड अनेक ठिकाणी दिसते. बहुसंख्य सोसायटय़ांच्या बाहेर फेरीवाल्यांसाठी बारीक अक्षरांत भलीमोठी नियमावली लावलेली असते. अशिक्षित-अल्पशिक्षित किंवा परप्रांतीय फेरीवाले तर सोडाच, पण मराठी फेरीवाले तरी ती वाचत असतील का? त्यात ती नियमावली दिमाखदार इंग्रजीत केली असेल तर प्रश्नच मिटला.
अशिक्षित फेरीवाल्यांचं राहू दे. सुविद्य कर्मचारी असणाऱ्या बँकांच्या योजना किंवा विमा पॉलिसीच्या माहितीपत्रिका किंवा फॉम्र्सवर छापलेली गिचमिड माहिती विमा एजंट/बँक मॅनेजर तरी वाचत असतील का? ग्राहकाला ‘थोडक्यात पण महत्त्वाचे’ असे पाच-सहा मुद्देच फक्त स्पष्ट व्हायला हवे असतात. एवढय़ा गिचमिड डोंगरातून तेवढे शोधताशोधता चष्म्याचा नंबर वाढतो. शिवाय छापील फॉम्र्सचा फोबिया निर्माण होतो तो होतोच.
अशा गोष्टी आपल्याला एवढय़ा सवयीच्या झाल्या आहेत की, त्या कोणाला खटकतच नाहीत. सादरीकरणाबाबतची सार्वजनिक उदासीनता ही आपली वृत्ती एकूणच सगळीकडे झिरपत असते. सर्वच ठिकाणच्या अभिव्यक्तीत थोडीशी सुधारणा घडवायची असेल तर हीच त्रिसूत्री वापरावी लागेल. ज्याच्यासाठी करायचं आहे त्या व्यक्ती/समूहाची मानसिकता स्पष्ट दिसणं, त्यांच्या नेमक्या गरजेपर्यंत मनानं पोहोचता येणं आणि आपल्याला त्यांच्यापर्यंत नेमकं काय पोहोचवायचं आहे ते स्पष्ट कळायला लागणं यातून अभिव्यक्ती क्षमता टप्प्याटप्प्यानं विकसित करता येईल. त्यातही ‘या त्रिसूत्रीमधलं किमान काय घडायलाच हवं? ‘Must’ काय आहे? हे ठरवणं ही पहिली पायरी असू शकते.
ज्याला सांगायचं आहे त्याला कळणाऱ्या भाषेत, कळणाऱ्या पद्धतीनं ते येणं, नेमक्या शब्दांत, आकारात, आकृत्यांत येणं आणि त्यामागच्या अनेक उद्देशां-मधला सर्वात महत्त्वाचा, जो पूर्ण झालाच पाहिजे असा उद्देश ठरवून काम करणं जमलं तर आपल्या क्षमतेला योग्य आणि नेमक्या अभिव्यक्तीची जोड देता येईल.                                                                 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2013 12:11 pm

Web Title: the ability of expression
Next Stories
1 स्वास्थ्य व्यवस्थापनातील नव्या संधी
2 पोलीस उपनिरीक्षक पूर्वपरीक्षा – सामान्य विज्ञान
3 कौशल्य संपादन करा!
Just Now!
X