द हाँगकाँग युनिव्हर्सिटि ऑफ सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी
विद्यापीठाची ओळख – हाँगकाँगमधील द हाँगकाँग युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी (एचकेयूएसटी) हे आशियातील सातव्या क्रमांकाचे विद्यापीठ आहे. हाँगकाँग शहरापासून थोडय़ा दूर असलेल्या क्लियर वॉटर बे या निमशहरी भागामध्ये स्थित असलेले हे जागतिक दर्जाचे विद्यापीठ क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगनुसार जगातले सदतीसाव्या क्रमांकाचे विद्यापीठ आहे. आपण जागतिक ख्यातीचे शैक्षणिक व संशोधन केंद्र बनवायचे, असा ध्यास हाँगकाँगमधील नेतृत्वाने घेतला आणि १९९१ मध्ये या विद्यापीठाची स्थापना झाली. एचकेयूएसटी हे शासकीय संशोधन विद्यापीठ आहे. एचकेयूएसटी एकूण साठ हेक्टरच्या कॅम्पसमध्ये पसरलेले आहे. विद्यापीठामध्ये सहाशेहून अधिक प्राध्यापक-संशोधक आहेत तर जवळपास पंधरा हजार पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी येथे त्यांचे शिक्षण पूर्ण करत आहेत. सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगाराच्या सर्वाधिक संधी उपलब्ध करून देणाऱ्या विद्यापीठांमध्ये या विद्यापीठाची गणना केली जाते. टाइम्स हायर एज्युकेशनच्या अहवालानुसार अलीकडे स्थापन झालेल्या जागतिक विद्यापीठांपैकी सर्वाधिक प्रगत हे विद्यापीठ आहे.
अभ्यासक्रम – हाँगकाँग युनिव्हर्सिटीमधील पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा असून पदव्युत्तर अभ्यासक्रम हे दोन, तीन वा चार वर्षांच्या कालावधीचे आहेत. विद्यापीठामध्ये एकूण आठ प्रमुख विभाग (स्कूल्स) कार्यरत आहेत. यामध्ये सायन्सेस, इंजिनीअरिंग, बिझनेस अॅण्ड मॅनेजमेंट, ह्युमॅनिटीज अॅण्ड सोशल सायन्स, इंटरडिसिप्लीनरी प्रोग्राम, यिंग तुंग ग्रॅज्युएट स्कूल, अॅडव्हान्स्ड स्टडी आणि पब्लिक पॉलिसी इत्यादी विभागांचा समावेश आहे. विद्यापीठाची विविध अभ्यासक्रमांना आवश्यक असलेली प्रवेशाची प्रक्रिया अत्यंत सुलभ आहे. पदवी अभ्यासक्रमांसाठी अगदी आयआयटी जेईईच्या परीक्षेत उत्तम गुण असल्यावरही भारतीय विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो. पदवी आणि पदव्युत्तर अशा दोन्ही पातळ्यांवर भरपूर विषय विद्यापीठाने उपलब्ध करून दिलेले आहेत. पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चार वर्षांमध्ये एकूण १२० क्रेडिट्स पूर्ण करावयाचे आहेत. पदवीचे चौथे वर्ष पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना पाचव्या वर्षांत प्रवेश घेऊन ‘डय़ुएल डिग्री कोर्स’ हा पर्यायदेखील विद्यापीठाने दिलेला आहे.
सुविधा – हाँगकाँग सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी विद्यापीठाचा क्लियर वॉटर बे येथील समुद्रकिनारी असलेल्या पर्वतराजींमध्ये वसलेला हा परिसर जागतिक विद्यापीठांच्या सर्वात सुंदर परिसरांपैकी एक म्हणून ओळखला जातो. एचकेयूएसटीनेचा शैक्षणिक परिसर अतिशय नीटनेटका आणि निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. सोबतच इथल्या अद्ययावत आणि अत्याधुनिक सुविधा विद्यार्थ्यांना शैक्षणिक वातावरणामध्येच एक उत्तम राहणीमान बहाल करतात. विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांसाठी शिक्षण साहाय्य सेवा, अत्याधुनिक प्रयोगशाळा, ग्रंथालय आणि खेळाच्या सुविधा, मल्टी-पर्पज स्पोर्ट्स हॉल, सर्व प्रकारच्या हवामानाशी जुळवून घेणारे अॅथलेटिक फिल्ड, मॉर्डन रिनग ट्रॅक, खेळण्याचे मैदान, टेनिस कोर्ट, स्क्व्ॉश कोर्ट, ऑलिम्पिक-आकारातील मदानी जलतरण तलाव यांसारख्या शिक्षणेतर सुविधा आहेत. एचकेयूएसटी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी विविध माध्यमांतून आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. शिष्यवृत्ती, शैक्षणिक शुल्कामध्ये सवलत, कमी मुदतीची कर्ज, विद्यापीठाच्या परिसरात अर्थाजर्नाच्या संधी, कमवा आणि शिकासारखे उपक्रम इ. सुविधा विद्यापीठाने पात्रतेच्या निकषांनुसार दिलेल्या आहेत. विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी बहुतांश विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून शिष्यवृत्ती दिली जाते. प्रथम वर्षांच्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या परिसरात खात्रीशीर निवासाची सुविधा बहाल करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांना स्टुडंट क्लब्स, असोसिएशन्स, डिपार्टमेंटल ग्रुप्स, इंटर्नशिप यांसारख्या सुविधाही उपलब्ध आहेत.
वैशिष्टय़
एचकेयूएसटीचे संशोधन उत्कृष्ट दर्जाचे आहे म्हणूनच संशोधनासाठी ते हाँगकाँगमधील दोन महत्त्वाच्या संशोधन संस्थांबरोबर – स्टेट की लॅबोरेटरी (एसकेएल) आणि चीनच्या ‘चायनीज नॅशनल इंजिनीअरिंग रिसर्च सेंटर’ या हाँगकाँग शाखेशी संलग्न आहे. बायोटेक्नॉलॉजी, रोबोटिक्स, डेटा सायन्स, एंट्राप्रीन्यिुअरशिप आणि सस्टेनिबिलीटी यांसारख्या अतिशय महत्त्वाच्या विषयांमध्ये विद्यापीठाचे अद्ययावत संशोधन चाललेले असते. आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधनासाठी एचकेयूएसटी हार्वर्ड, स्टॅनफर्ड, कॅल्टेक, ग्लासगो यांसारख्या अनेक नामवंत जागतिक विद्यापीठांबरोबर करारबद्ध आहे.
एचकेयूएसटी ही संशोधन केंद्रित शैक्षणिक संस्था आहे. संशोधनासाठी इथे घेतली जाणारी मेहनत नक्कीच उल्लेखनीय आहे. मी विद्यापीठामध्ये माझे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. इथले विद्यार्थीसुद्धा अतिशय हुशार आणि मेहनती असतात, विविध कौशल्यांमध्ये ते पारंगत असल्याने त्यांच्यासोबत स्पर्धा करण्याचा अनुभव बरेच काही शिकवणारा असतो. त्यांच्यातील हुशारीला विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये आणि अध्यापनामध्ये अधिक चांगला वाव मिळतो. तसेच या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना रोजगार संधी मिळण्याचे प्रमाणही बरेच आहे. माझ्या माहितीतील बऱ्याच विद्यार्थ्यांना पदवी/पदव्युत्तर स्तरावर द्वितीय वर्गातच नोकरीच्या उत्तम संधी मिळालेल्या आहेत. तेव्हा स्पर्धा आणि संशोधन अशा दोन्ही स्तरांवर विद्यापीठ उत्तम आहे.
– उर्वलि शेठ, एचकेयूएसटी.
संकेतस्थळ https://www.ust.hk/