News Flash

धर्म आणि विज्ञान यांच्या पेचात सापडलेले ब्लेझ पास्कल

धर्म आणि विज्ञान यांचा परस्पर संबंध जोडण्याचा प्रयत्न पाश्चात्य देशांत फार पूर्वीपासून केला गेला. विशेष म्हणजे, विज्ञानाला धर्माशी, देवाशी जोडण्याचा प्रयत्न काही शास्त्रज्ञांनीही केला. युरोपच्या

| August 12, 2013 12:03 pm

धर्म आणि विज्ञान यांचा परस्पर संबंध जोडण्याचा प्रयत्न पाश्चात्य देशांत फार पूर्वीपासून केला गेला. विशेष म्हणजे, विज्ञानाला धर्माशी, देवाशी जोडण्याचा प्रयत्न काही शास्त्रज्ञांनीही केला. युरोपच्या इतिहासाचा आढावा घेतला तर असं दिसतं की, केवळ धार्मिक चढाओढीसाठी तब्बल हजार बाराशे र्वष खर्ची घातली गेली.
रॉजर बेकन, निकोलस कोपíनकस, गॅलिलिओ गॅलीली, जोहान केप्लर इत्यादी वैज्ञानिकांनी कितीही कंठशोष केला, धर्माच्या आधिपत्याखाली अडकलेल्या वैज्ञानिक सत्याला मुक्त करण्याचा प्रयत्न केला, तरी १८व्या शतकापर्यंत पाश्चिमात्य देशांमध्ये धर्माचा मोठा प्रभाव होता. त्या काळातील अनेक बुद्धिवंतांना, संशोधकांना हा काळ क्लेषदायक आणि काही वेळा प्राणघातकही ठरला.
एका बाजूला परंपरागत धर्माची शिकवण आणि ऐहिक सुखांचा तिरस्कार करणाऱ्या पाप-पुण्याच्या टोकाच्या कल्पना, तर दुसऱ्या बाजूला बुद्धिमत्ता, तर्कसंगत विचार आणि अंगभूत प्रतिभेच्या जोरावर जगाकडे पाहण्याचा अत्याधुनिक दृष्टिकोन अशा पेचात अनेक वैज्ञानिक सापडले होते. सामाजिक व्यवहारासाठी धर्माची पाठराखण करण्याला पर्याय नव्हता; पण त्याचवेळी धर्माच्या नावाखाली दाबून ठेवलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याची दुर्दम्य उत्सुकताही होती. अशा कात्रीत सापडलेल्या संशोधकांपकीच एक संशोधक होते, ब्लेझ पास्कल!
पास्कल यांनी देव आणि त्याचं अस्तित्व शोधायचा गणिती मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांना देवाच्या अस्तित्वाचं समीकरण काही सापडलं नाही; पण गणित आणि भौतिकशास्त्र या विषयांत अनेक संकल्पनांना जन्म देऊन त्यांनी या ज्ञानशाखांमध्ये कधीच न पुसला जाणारा आपला ठसा उमटवला.
पास्कल चार वर्षांचा असताना त्याची आई वारली. त्याचे वडीलच त्याला शिकवायला लागले. गिल्बर्ट व जॅकेलिन या त्याच्या दोन थोरल्या बहिणींचाही त्याला शिकवण्यात सहभाग होता.
युक्लिडच्या ‘एलिमेंटस्’ या ग्रंथातील भूमितीच्या प्रमेयांची थोडीसुद्धा ओळख नसताना वयाच्या केवळ आठव्या वर्षी त्यातील विधानं पास्कल सिद्ध करून दाखवत होता. पण आपल्या मुलाने गणित सोडवण्यासाठी जास्त डोकं वापरलं तर त्याचं डोकं फुटून जाईल, त्याच्या तोळामासा तब्येतीला गणित आजिबात झेपणार नाही, अशी भीती त्याच्या वडिलांना वाटायची. त्यामुळे त्यांनी गणित आणि विज्ञान हे विषय सोडून भाषा, व्याकरण, समाजशास्त्र यासारख्या सोप्या विषयांचा अभ्यास करण्याची सक्ती पास्कलवर केली. पण गणिताची उपजतच आवड असल्याने पास्कल चोरून गणित सोडवत असे. शेवटी कंटाळून वडिलांनी गणित शिकण्यास परवानगी दिली.
वयाच्या चौदाव्या वर्षी पास्कल विज्ञानविषयक व्याख्यानं आयोजित करणाऱ्या संस्थेने आयोजित केलेल्या भूमितीवरील भाषणं ऐकण्यासाठी जात असे. हीच संस्था पुढे ‘फ्रेंच अकॅडेमी ऑफ सायन्स’ म्हणून नावारूपास आली. याच काळात त्याने शंकुच्छेदासंबधी शोधनिबंध लिहिला. त्यात ‘मिस्टिक हेक्झाग्राम’ म्हणून ओळखली जाणारी सुमारे ४०० प्रमेयं होती. त्यातील वर्तुळाच्या संबंधातील एक प्रमेय ‘पास्कलचे प्रमेय’ म्हणून प्रसिद्ध आहे. जेव्हा शंकुच्छेदावरील प्रमेयांचा लेख पास्कलचा समकालीन असलेल्या रेन देकात्रेला दाखवला गेला तेव्हा १६-१७ वर्षांचा मुलगा असं काही लिहू शकेल यावर त्याचा अजिबात विश्वास बसला नाही. पास्कलने भूमितीमध्ये केलेलं हे काम पुढे ‘प्रक्षेप्य भूमिती’ (प्रोजेक्टिव्ह जॉमेट्री) म्हणून गणित वर्तुळात प्रसिद्ध झालं.
पास्कलचे वडील पॅरिसमध्ये कर संकलन अधिकारी म्हणून काम करत होते. त्यामुळे त्यांचा बहुतेक वेळ किचकट आकडेमोड करण्यातच जात असे. पास्कलला याची जाणीव होती. त्याने भरपूर दिवस मेहेनत घेऊन गिअर्स आणि चाकं यांच्या सहाय्याने आकडेमोड करणारं यंत्र तयार करून वडिलांना भेट दिली. अशी सुमारे ५० यंत्रे पास्कलने त्याकाळी तयार केली. या यंत्रात त्याने सुधारणाही घडवून आणल्या. अर्थात, हे यंत्र तयार करण्यासाठी खर्च जास्त लागल्यामुळे त्याचा वापर काही श्रीमंत लोकच करू शकले. पण अठराव्या वर्षी पास्कलने तयार केलेलं हे बेरीज-वजाबाकी करू शकणारं यंत्र पुढील काळातील कॅलक्युलेटरची नांदी ठरलं.
या यंत्राच्या शोधामुळे पास्कलला भौतिकशास्त्राची गोडी वाटायला लागली. इव्हानगेलिस्टा टॉरिसेलीने तयार केलेल्या पाऱ्याच्या वायुभारमापकाच्या मदतीने पास्कलने वातावरणीय दाबाचा अभ्यास केला; वेगवेगळ्या उंचीवर हवेचा दाब किती असतो, याची मापनं घेतली. त्यासाठी पास्कल आपल्या मेव्हण्याच्या मदतीने १२०० मीटर उंचीच्या ‘प्यू डे डोम’ या शिखरावर वायुभारमापक यंत्र घेऊन गेला. जसजसं उंच जावं तसतसा हवेचा दाब कमी होत जात असल्याचं निरीक्षण त्याने नोंदवलं. अर्थात, टॉरिसेलीने याचा अंदाज आधीच वर्तवला होता. पास्कलने केलेल्या निरीक्षणांमुळे टॉरिसेलीच्या मताला पुष्टी मिळाली. पाऱ्याच्या वायुभारमापाकातल्या नळीच्या वरच्या भागात निर्वात पोकळी तयार होते, हे निरीक्षणसुद्धा पास्कलने केलं. या निरीक्षणावरून पास्कलने असा निष्कर्ष काढला की, वातावरणाच्या बाहेर निर्वात पोकळी असली पाहिजे.
हवेच्या दाबासंदर्भात केलेल्या या संशोधनातूनच पास्कलने द्रव आणि वायूंच्या संदर्भातला मूलभूत नियम मांडला. बंदिस्त द्रव किंवा वायू पदार्थावर दाब दिला असता हा दाब पदार्थाच्या सर्व िबदूंवर समान परेषित होतो, हा नियम ‘पास्कलचा नियम’ म्हणून प्रसिद्ध झाला. या नियमाचा उपयोग आजही ‘हायड्रॉलिक्स’ तंत्रावर चालणाऱ्या अनेक उपकरणांमध्ये केला जातो. कोणत्याही द्रवाने दिलेला दाब हा त्याच्या वजनावर नव्हे, तर त्या द्रवाच्या स्तंभाच्या उंचीवर अवलंबून असतो; द्रवात जसजसं खोलवर जावं तसतसा द्रवामुळे प्रयुक्त होणारा दाब वाढतो, हेसुद्धा पास्कल यांनी सप्रयोग सिद्ध केलं.
भौतिकशास्त्रात संशोधन कार्य केलं तरी पास्कल मुळात गणिततज्ज्ञ होते. पियरे फरमॅट या समकालीन गणिततज्ज्ञाबरोबर झालेल्या पत्रव्यवहारातून पास्कल यांनी ‘संभाव्यता सिद्धांत’ (प्रोबॅबिलिटी थीअरी) विकसित केला. गणिताला त्यांनी दिलेली ही मोठी देणगीच होती. द्विपदीमधल्या क्रमाने येणाऱ्या घातंकाचे सहगुणक शोधण्याची पद्धतीसुद्धा पास्कल यांनी विकसित केली. फरमॅट आणि पास्कल यांनी गणितात केलेल्या संशोधन कार्याचा उपयोग पुढे लिबनित्झ या गणिततज्ज्ञाला झाला.
पास्कल यांचा ‘ईश्वर’ या संकल्पनेवर प्रचंड विश्वास होता. ईश्वर ही संकल्पना स्पष्ट करण्यासाठी त्यांनी मांडलेल्या सिद्धांताला ‘पास्कल वॅगर’ असं म्हटलं. आयुष्याच्या उत्तरार्धात पास्कल यांनी गणितामध्ये फारसं काम केलं नाही. त्याऐवजी त्यांचा ओढा ईश्वर आणि धर्म यांच्याकडे अधिक वळला.
पास्कल यांच्या गणित आणि भौतिकशास्त्राच्या कार्याला दु:खाची झालर होती. जन्मल्यापासूनच अत्यंत नाजूक प्रकृती असलेल्या पास्कलना वयाच्या १७व्या वर्षांपासून पोटदुखीचा प्रचंड त्रास व्हायला लागला. मृत्यूपर्यंत या पोटदुखीने त्यांची पाठ सोडली नाही. पोटदुखीच्या असह्य वेदनांमुळे अनेक रात्री त्यांनी जागून काढल्या. यातूनच पुढे त्यांना निद्रानाशाचा विकार जडला. शेवटी वयाच्या ३९व्या वर्षी त्यांचा अकाली मृत्यू झाला.                                            

*    द्विपदीमधल्या क्रमाने येणाऱ्या घातंकाचे सहगुणक आकृतीद्वारे मांडण्याची पद्धत पास्कल यांनी विकसित केली होती. त्यासाठी त्यांनी एका त्रिकोणात विशिष्ट पद्धतीने संख्या लिहिल्या. हा त्रिकोण पुढे ‘4पास्कलचा त्रिकोण’ म्हणून गणिती वर्तुळात प्रसिद्ध झाला. पास्कलच्या त्रिकोणाबद्दल माहिती मिळवा. हा त्रिकोण काढून त्यामध्ये लिहिल्या जाणाऱ्या संख्यांचं बारकाईने निरीक्षण करा. संख्यांच्या विशिष्ट मांडणीतून काय आढळतं?
*    बंदिस्त द्रव किंवा वायू पदार्थावर दिलेला दाब सर्व बाजूंनी समान पारेषित होतो, या नियमावर आधारित असलेली व्यवहारातली साधनं, उपकरणं कोणती याची माहिती मिळवा.
*    ‘हायड्रॉलिक्स’ तंत्राविषयी माहिती मिळवा. या तंत्राचा वापर आपण कुठेकुठे करतो, याचा शोध घ्या.
*    व्यवहारात संभाव्यता सिद्धांताचा वापर कसा केला जातो, याविषयी माहिती मिळवा.
*    पास्कल यांनी हवेच्या दाबाच्या संदर्भात केलेल्या संशोधनामुळे दाबाच्या एककाला ‘पास्कल’ असे संबोधण्यात येते. शास्त्रज्ञांच्या नावावरून एकके असलेल्या भौतिक राशींची यादी करा. ज्या शास्त्रज्ञांच्या नावावरून ही एकके ठरवण्यात आली आहेत, त्या शास्त्रज्ञांविषयी माहिती मिळवा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2013 12:03 pm

Web Title: view on blaise pascal
Next Stories
1 गिर्यारोहण- छंदाकडून करिअरकडे
2 पं. भीमसेन जोशी शिष्यवृत्ती
3 कृषीक्षेत्राला आले सुगीचे दिवस!
Just Now!
X