दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर विज्ञान, कला आणि वाणिज्य या शाखांसारखीच  एच.एस.सी. व्होकेशनल अथवा एमसीव्हीसी (MCVC) ही करिअरला पूरक अशी विद्याशाखा उपलब्ध आहे. या शाखेत शिकवल्या जाणाऱ्या व्यवसाय अभ्यासक्रमांची माहिती आपण या लेखात करून घेऊयात.
देशातील बेरोजगारी दूर व्हावी, या उद्देशाने डॉ. कोठारी आयोगाच्या शिफारशीनुसार अकरावी-बारावीच्या धर्तीवर व्यवसाय अभ्यासक्रमांची अथवा व्होकेशनल अभ्यासक्रमांची सुरुवात १९८९-९० साली झाली. त्या वर्षी ३० अभ्यासक्रमांना मान्यता देण्यात आली होती.
अभ्यासक्रमाचे स्वरूप
हे अभ्यासक्रम उद्योगक्षेत्राच्या व्यावसायिक गरजा लक्षात घेऊन निश्चित करण्यात आले आहेत.
सैद्धान्तिक शिक्षणासोबत प्रात्यक्षिकांवरही या अभ्यासक्रमांचा भर आहे. अकरावीनंतर उन्हाळी सुटीत ‘ऑन द जॉब’ ट्रेनिंगदरम्यान केलेल्या अभ्यासाचा प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी कसा वापर करू शकतो याचे ज्ञान विद्यार्थ्यांना या प्रशिक्षणादरम्यान मिळते. या अनुभवाचा पुढे करिअरमध्ये नक्कीच उपयोग होतो.
या व्यवसाय अभ्यासक्रमांना पूर्वी किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम अथवा ‘एमसीव्हीसी’ या नावाने ओळखले जायचे. आता याचे नामकरण एच.एस.सी. व्होकेशनल (H.S.C. Vocational) झाले आहे.

शिक्षण संधी
या अभ्यासक्रमांची बारावीची परीक्षा उच्च माध्यमिक मंडळातर्फे (मुंबई बोर्ड) घेण्यात येते. इतर शाखांप्रमाणे या परीक्षेची गुणपत्रिका व बोर्ड प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना दिले जाते. बारावीनंतर विद्यार्थ्यांना वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्षांला तसेच कला शाखेच्या प्रथम वर्षांला प्रवेश घेता येतो.
टेक्निकल ग्रुपचा विद्यार्थी उत्तीर्ण झालेल्या विषयाच्या डिप्लोमाच्या द्वितीय वर्षांत प्रवेश घेऊ शकतो. उदा. मेकॅनिकल टेक्नॉलॉजीचा विद्यार्थी मेकॅनिकल इंजिनीयरिंगच्या द्वितीय वर्षांत थेट प्रवेश घेऊ शकतो.
‘शिका व कमवा’ या योजनेंतर्गत  दूरशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण पूर्ण करता येते. त्यानंतर योग्यतेनुसार एखादा स्वतंत्र व्यवसाय सुरू करता येतो अथवा नोकरीही करता येते.
या विद्यार्थ्यांना बोर्ड ऑफ अ‍ॅप्रेंटिस ट्रेनिंग (BOAT)  ‘इंडस्ट्रियल ट्रेनिंग’साठी मदत करते. ही केंद्र सरकारची संस्था असून या प्रशिक्षण प्रमाणपत्राचा उपयोग चांगली नोकरी मिळण्यासाठी होतो.
२०१५-१६ या शैक्षणिक वर्षांपासून या व्यवसाय अभ्यासक्रमात काही ठोस बदल करण्यात आले आहेत. या बदलांची माहिती संबंधित शैक्षणिक वर्षांत संबंधित महाविद्यालयांत उपलब्ध होईल.
प्रवेशप्रक्रिया
या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया ‘ऑफलाइन’ म्हणजेच महाविद्यालयांमध्ये प्रत्यक्ष जाऊन ‘फॉर्म’ भरून होणार आहे.
शिक्षणसंस्था
हे अभ्यासक्रम उपलब्ध असलेली प्रमुख महाविद्यालये पुढीलप्रमाणे आहेत-
रुपारेल महाविद्यालय- माटुंगा, साठय़े महाविद्यालय- विलेपार्ले, एन. एम. महाविद्यालय- विलेपार्ले, पाठक महाविद्यालय- सांताक्रुझ, आंबेडकर महाविद्यालय- वडाळा,  एम. डी. महाविद्यालय- परळ, टी. एस. बाफना कॉलेज- मालाड, गुरूकुल महाविद्यालय- घाटकोपर,  योजना महाविद्यालय- बोरिवली, चेतना महाविद्यालय- वांद्रे, शारदाश्रम ज्युनियर कॉलेज- दादर, बिर्ला महाविद्यालय- कल्याण.

गटनिहाय अभ्यासक्रम
व्यवसायाभिमुख पदवी अभ्यासक्रम सहा गटांत विभागले गेले आहेत-
* टेक्निकल ग्रुप- इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी, मेकॅनिकल टेक्नॉलॉजी, कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी, ऑटोमोबाइल टेक्नॉलॉजी.
* कॉमर्स ग्रुप- लॉजिस्टिक अ‍ॅण्ड सप्लाय मॅनेजमेंट, मार्केटिंग रिटेल मॅनेजमेंट, अकाऊंटिंग, फायनान्शियल, ऑफिस मॅनेजमेंट, बँकिंग, फायनान्शियल, इन्शुरन्स.
* हॉस्पिटॅलिटी ग्रुप- फूड प्रॉडक्शन,  टुरिझम अ‍ॅण्ड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट.
* पॅरामेडिकल ग्रुप- मेडिकल लॅब टेक्निशियन,  ऑप्थॅल्मिक टेक्निशियन, रेडिऑलॉजी टेक्निशियन, चाइल्ड, ओल्ड एज अ‍ॅण्ड हेल्थ केअर सव्‍‌र्हिसेस.
* अ‍ॅग्रिकल्चर ग्रुप- हॉर्टिकल्चर, क्रॉप सायन्स, अ‍ॅनिमल हजबंडरी.
* फिशरी ग्रुप- फिशरी टेक्नॉलॉजी.
गौरीता मांजरेकर, gauritamanjrekar@gmail.com