केंद्रीय कृषी मंत्रालयांतर्गत कार्यरत असणाऱ्या कृषी संशोधक निवड मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या कृषी संशोधन सेवा (प्राथमिक) पात्रता परीक्षा तसेच राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट) २०१५ या परीक्षांची अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे.
आवश्यक शैक्षणिक अर्हता
उमेदवारांनी कृषी, कृषी विज्ञान वा संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तम शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी.
वयोमर्यादा
अर्जदारांचे वय १ ऑगस्ट २०१५ रोजी २१ ते ३२ वर्षांच्या दरम्यान असावे. वयोमर्यादेची अट राखीव गटातील उमेदवारांसाठी सरकारी नियमांनुसार शिथिलक्षम आहे.
निवड पद्धती
अर्जदारांपैकी अर्हताप्राप्त उमेदवारांना संबंधित स्वरूपाची अथवा दोन्ही प्रकारच्या पात्रता परीक्षा द्याव्या लागतील. या पात्रता परीक्षा संगणकीय पद्धतीने ४ डिसेंबर २०१५ ते १० डिसेंबर २०१५ या कालावधीत द्याव्या लागतील.
उमेदवारांची पदव्युत्तर परीक्षेतील गुणांची टक्केवारी व पात्रता परीक्षेतील गुणांकाच्या आधारे कृषी संशोधक निवड मंडळातर्फे त्यांची कृषी विषयातील संशोधक अथवा कृषी विद्यापीठांमध्ये प्राध्यापक म्हणून काम करण्यासाठी निवड करण्यात येईल.
अर्जासह भरायचे शुल्क
अर्जदारांना आपल्या अर्जासह खालीलप्रमाणे शुल्क भरावे लागेल-
०    कृषी संशोधक परीक्षा : सर्वसाधारण गटाच्या उमेदवारांसाठी ५०० रु.
०    राष्ट्रीय पात्रता परीक्षा : सर्वसाधारण गटाच्या उमेदवारांसाठी १००० रु. तर राखीव गटातील उमेदवारांसाठी २५० रु.
०    कृषी संशोधक परीक्षा आणि राष्ट्रीय पात्रता परीक्षा : सर्वसाधारण गटाच्या उमेदवारांसाठी १५०० रु. तर राखीव गटातील उमेदवारांसाठी २५० रु.
वरील पात्रता परीक्षांसाठी महिला अर्जदारांकडून कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.
अर्ज करण्याची मुदत संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर १९ नोव्हेंबर २०१५ पर्यंत अर्ज करावा.
अधिक माहिती
या पात्रता परीक्षांच्या संदर्भात अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ३१ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली कृषी संशोधक निवड मंडळाची जाहिरात पाहावी अथवा मंडळाच्या http://www.asrb.org.in किंवा http://www.icar.org.in  या संकेतस्थळांना भेट द्यावी.