एमपीएससी मंत्र  : आपली छाप पाडा!

सर्वप्रथम मुलाखत मंडळाचे चेअरमन नंतर अन्य सदस्यांना अभिवादन करावे.

मुलाखत मंडळाचे उमेदवाराविषयी एकूण मत तयार होण्यात सदस्यांकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे तुमच्या देहबोलीचे होणारे ‘मौन मूल्यांकन’ खूप महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. या मूल्यांकनास दिशा देणारी तुमची पहिली छाप चांगलीच पडावी यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक आहे.

मुलाखत कक्षात

मुलाखत कक्षात प्रवेश करताच उमेदवाराचे अवलोकन, मूल्यांकन सुरू होते. अतिशय सहज आणि नैसर्गिकपणे प्रवेश केला पाहिजे. चालताना पायांतील बूट/सँडल यांचा आवाज होणार नाही किंवा कक्षाचा दरवाजा उघडतानाही जास्त आवाज न होऊ देण्याची दक्षता घेत प्रवेश करावा. सर्वप्रथम ‘मे आय कम इन सर!’ अशी परवानगी घ्यावी. सर्वप्रथम मुलाखत मंडळाचे चेअरमन नंतर अन्य सदस्यांना अभिवादन करावे. मुलाखत मंडळात एक किंवा त्यापेक्षा अधिक महिला सदस्य असतील तर प्रथम त्यांना अभिवादन करावे व तद्नंतर इतर सदस्यांना.

यानंतर सर्व मंडळावर प्रसन्न चेहऱ्याने अभिवादनात्मक एक दृष्टिक्षेप टाकावा. उमेदवाराच्या चेहऱ्यावर हलके स्मित दिसले पाहिजे. हलके हास्य चेहरा आणि नजरेतील चमक वाढविते. त्यामुळे व्यक्तिमत्त्वातील जिवंतपणा आणि आशावाद प्रतीत होतो. मुलाखत तयारीच्या काळातच प्रसन्न चेहरा, स्वाभाविक हास्य चेहऱ्यावर आणण्याची जाणीवपूर्वक सवय लावून घेतली पाहिजे.मुलाखत मंडळाच्या परवानगीने खुर्चीवर बसताना, खुर्ची ओढण्याचा, हलवण्याचा आवाज होऊ न देण्याची काळजी घ्यावी. दोन्ही पाय जमिनीवर व हाताचे कोपर खुर्चीच्या हातावर टेकवून बसावे. खुर्चीवर बसल्यानंतर आवर्जून धन्यवाद देण्यास विसरू नये. हातापायांच्या अनावश्यक हालचाली, वारंवार चेहऱ्यावरून हात फिरवणे, हातावर हात चोळणे, भिरभिरत्या नजरेने इकडे तिकडे पाहणे या गोष्टी टाळायला हव्यात. कक्षात प्रवेश केल्यानंतर उमेदवाराची प्रत्येक हालचाल मुलाखत मंडळाच्या परीक्षकीय नजरेतूनच पाहिली जात असते. पण उमेदवाराने कसलेही संतुलन ढळू न देता सहज आणि नसíगकपणे मुलाखतीस सामोरे जावे.


काही महत्त्वाची पथ्ये

*   मानवी देहबोली आणि हावभावांमध्ये इतकी विविधता आहे की सगळ्या प्रकारांवर चर्चा करणे किंवा या माध्यमातून संपूर्ण देहबोलीमध्ये बदल घडवून आणणे शक्य नाही. काही महत्त्वाच्या बाबी मात्र आवर्जून आणि लक्षपूर्वक पाळायला हव्यात.

*   तुम्ही शांत / सहज (calm / relax)  आहात हे तुमच्या बसण्यावरून समजून येते. खुर्चीवर बसताना सहजपणे बसावे. अवघडलेपणा असू नये. तसाच अस्ताव्यस्तपणाही नको.

*   मुलाखत मंडळाच्या सदस्यांची नजर चुकविणे किंवा टक लावून पाहणे दोन्ही टाळायला हवे. बोलताना सर्व सदस्यांशी तुमचा व्यवस्थिती eye contact व्हायला हवा.

*   तुमचा आवाज खूप मोठा किंवा कमी असू नये. सर्व सदस्यांना ऐकू जाईल इतका असावा. व आवश्यक तितकेच चढ-उतार असावेत.

*   मानेला झटके देऊन बोलणे, डोळे मोठे किंवा बारीक करून बोलणे, भुवया उडविणे या गोष्टी कटाक्षाने टाळायला हव्यात. यामुळे तुमच्याबाबत वाईट मत बनते.

*   वारंवार रुमालाने चेहरा पुसणे, केसांमधून हात फिरविणे, हातावर हात चोळणे या बाबी तुमची अस्वस्थता, आत्मविश्वासाची उणीव आणि न्यूनगंड दर्शवितात. त्यामुळे त्या प्रयत्नपूर्वक टाळायला हव्यात.

*   मुलाखत मंडळाच्या सदस्यांच्या मताशी सहमती दाखवायची असेल तर डोके थोडेसे खाली-वर हलविण्यास हरकत नाही. अशा वेळी चेहऱ्यावर हलकेसे स्मित असावे. मात्र सदस्यांच्या मताशी असहमती दर्शवायची असेल तर फक्त नम्र शब्दांचा वापर करावा. डावी उजवीकडे मान हलवून नकारार्थी प्रतिक्रिया अजिबात देऊ नये.

*   हातवारे करून बोलायची सवय असेल तर तुमचे हातवारे नकारार्थी प्रभाव टाकणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी. मुठी आवळून, आपटून बोलणे, तर्जनी दाखवून मुद्दा मांडायचा प्रयत्न करणे, पुढे झुकून किंवा खुर्चीवर मागे रेलून बोलणे, वारंवार नाकास / कानास स्पर्श करणे किंवा नाक/ कान ओढून/ खाजवून बोलण्यास सुरुवात करणे हे सर्व टाळायला हवे.

*   मुलाखतीदरम्यान या बाबी लक्षपूर्वक पाळायला हव्यात. मुलाखत तुमच्या दृष्टीने अवघड गेली असली तरी मुलाखत संपल्यावर मंडळासमोरच सुटकेचा निश्वास सोडू नये. तुमच्या दृष्टीने चांगली झाली असेल तरी मुलाखत संपल्यावर कक्षातून बाहेर पडेपर्यंत तुमच्या देहबोलीतून अति आत्मविश्वास प्रतीत होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mpsc exam preparation tips