प्रस्तुत लेखामध्ये पूर्वपरीक्षेच्या तयारीतील अखेरच्या व निर्णायक टप्प्यातील अभ्यासाची रणनीती कशी असावी याबाबत ऊहापोह करणार आहोत. येत्या १८ जून २०१७ रोजी पार पडत असलेल्या यूपीएससी पूर्वपरीक्षेसाठी आता जेमतेम चार ते पाच दिवसांचा कालावधी उरलेला आहे. स्वाभाविकच सर्वाची तयारी एका निर्णायक व अंतिम टप्प्यावर पोहोचली असणार, यात तिळमात्र शंका नाही. विद्यार्थी मित्र-मत्रिणींनो, यूपीएससी पूर्वपरीक्षेतील ‘नागरी सेवा कलचाचणी’(सीसॅट) हा पेपर पात्रता स्वरूपाचा करण्यात आल्यामुळे पूर्वपरीक्षेचा निकाल सामान्य अध्ययन पेपर १ मध्ये मिळणाऱ्या गुणांमुळेच निर्धारित होत असल्याचे आपणास ज्ञात आहेच. परिणामी या काळामध्ये आपण करत असलेल्या तयारीचा केंद्रिबदू सामान्य अध्ययनच असायला हवा. या कालावधीत मुख्य रणनीती म्हणजे सामान्य अध्ययनामध्ये समाविष्ट विविध विषयांकरिता आजतागायत वाचलेल्या संदर्भसाहित्याची उजळणी करणे आहे. संबंधित विषयाच्या संदर्भ पुस्तकातून अधोरेखित केलेली माहिती व मुद्दे, आपण आजवर तयार केलेल्या मायक्रोनोट्स तसेच आपण दिलेल्या सराव चाचण्यांमध्ये सोडविलेल्या प्रश्नांतील कठीण, क्लिष्ट व महत्त्वाच्या प्रश्नांची उजळणीदेखील केली पाहिजे, हे विसरता कामा नये.

आजवर अभ्यासलेल्या विषयातील तांत्रिक माहिती, वस्तुनिष्ठ स्वरूपाची तथ्ये, अर्थशास्त्रातील विविध स्वरूपाची आकडेवारी, भूगोलावरील नकाशावर आधारित माहिती यावर बारकाईने लक्ष  द्यावे. कारण यूपीएससी पूर्वपरीक्षेतील प्रश्नांचे स्वरूप बहुपेडी व गतिशील आहे, त्यामुळे सूक्ष्म मुद्दे व तांत्रिक माहितीप्रधान तथ्यांची उजळणी अत्यावश्यक ठरते. या काळामध्ये वर्तमानपत्रांचे वाचन पूर्णपणे बंद ठेवावे व यापूर्वी वर्षभरापासून केलेल्या चालू घडामोडींच्या तयारीची उजळणी करावी. तसेच प्रत्येक विषयाशी निगडित महत्त्वपूर्ण चालू घडामोडींचा आढावा घेतला जाईल, याची खातरजमा करावी. चालू घडामोडींकरिता आपण याआधी वर्षभर जो स्रोत वापरला त्यावरच लक्ष केंद्रित करावे, कारण चालू घडामोडीशी संबंधित संदर्भसाहित्य बाजारामध्ये विपुल प्रमाणात उपलब्ध असल्याने ऐनवेळी गोंधळाची स्थिती उद्भवू शकते. नागरीसेवा कलचाचणी (सीसॅट) या पेपरची तयारी आपण नियमित केली असेलच. या पेपरमध्ये समाविष्ट सर्व प्रकार येत्या काळात स्मरणात राहतील याची काळजी घ्यावी. कारण या पेपरकरिता अत्यंत जलदपणे तर्क लढवून विचारण्यात आलेल्या प्रश्नांना अचूकपणे सोडवणे महत्त्वाचे ठरते.

येणाऱ्या चार-पाच दिवसांच्या कालावधीमध्ये उजळणीबरोबरच आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे विषयानुरूप वस्तुनिष्ठ प्रश्नांचा अधिकाधिक सराव व दररोज किमान एक सामान्य अध्ययन आणि एक नागरी सेवा कलचाचणी या पेपरची सराव चाचणी दोन तासांचा वेळ निर्धारित करून सोडवून पाहणे श्रेयस्कर ठरते. यामुळे आयोगाचा पेपर सोडवताना करायचे वेळेचे व्यवस्थापन व स्वीकारायचे धोरण, सरावातील उणिवा व आपल्या तयारीतील कच्चा दुव्यांवर मात करणे शक्य होते व पूर्वपरीक्षेत यशस्वी होण्यासाठी आवश्यक ‘इलिमिनेशन’ ‘तंत्र’ चांगल्या प्रकारे अवगत करून घेता येते. सराव चाचण्यांसोबत आयोगाच्या मागील प्रश्नापत्रिका स्वत:चे ‘बेचमाìकग’ करण्यासाठी वापराव्यात त्याद्वारे आपल्या तयारीची गुणवत्ता पडताळून पाहता येते. सराव चाचण्यांचा आपले मनोधर्य टिकवून ठेवून प्रभावीरीत्या परीक्षेला सामोरे जाण्यास फायदा होतो.

यूपीएससीची परीक्षा उमेदवाराच्या मानसिकतेची कसोटी पाहणारी असते, म्हणूनच या काळात येणाऱ्या तणावाचे योग्य व्यवस्थापन करून आपले मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवणे गरजेचे आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आपण पूर्वपरीक्षेला सामोरे जाण्याचे भय मनात न ठेवता ही प्रक्रिया ‘एन्जॉय’ करण्याची मानसिक तयारी ठेवावी. पूर्वपरीक्षेची तयारी करताना या अंतिम टप्प्यामध्ये काही घटकांची उजळणी करणे किंवा सराव चाचण्या सोडवणे राहून गेल्यास ‘पॅनिक मोड’मध्ये जाऊ नये. कारण या प्रक्रियेमध्ये कुठल्याही उमेदवारास त्याने योजल्याप्रमाणे सर्व उदिष्टांची १००% पूर्तता होत नाही. परिणामी एखादा घटक राहून गेल्यास त्यावर विचार करून वेळ घालवण्यापेक्षा, आपण ज्या घटकांची तयारी चांगल्या पद्धतीने केली आहे त्याकडे लक्ष केंद्रित करणे श्रेयस्कर ठरते. शेवटी परीक्षेला सामोरे जाताना येणाऱ्या अनंत अडचणी या आपल्याकरिता संधी आहेत असे मानून शांत व आत्मविश्वासपूर्ण राहणे उपयुक्त ठरते.