केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे सेन्ट्रल आर्म्ड पोलीस फोर्सेस (असिस्टन्ट कमाडंटन्स) एक्झामिनेशन-२०१३ द्वारा केंद्र सरकारअंतर्गत असणाऱ्या पोलीस दलांमध्ये अधिकारीपदावर निवड करण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
जागांची संख्या व तपशील : या निवड परीक्षेद्वारा नियुक्त करण्यात येणाऱ्या पदांची संख्या ४२४ असून त्यामध्ये सीमा सुरक्षा बल ११०, केंद्रीय रेल्वे पोलीस दल १३८, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल ५६ व इंडो-तिबेटन पोलीस दल १२० याप्रमाणे जागांचा समावेश आहे.
आवश्यक पात्रता : अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत व ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत.
वयोगट : २० ते २५ वर्षे. राखीव गटातील उमेदवारांसाठी शिथिलक्षम.
निवड प्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. ही निवड परीक्षा देशांतर्गत निवडक परीक्षा केंद्रांवर २० ऑक्टोबर २०१३ रोजी घेण्यात येईल व त्यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई व नागपूर या परीक्षा केंद्रांचा समावेश असेल.
लेखी निवड परीक्षेत निर्धारित गुणांक मिळविणाऱ्या उमेदवारांना शारीरिक क्षमता चाचणी, मुलाखत व वैद्यकीय तपासणीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल.
अर्जासह भरावयाचे शुल्क : अर्जासह भरावयाचे शुल्क म्हणून २०० रु. रोखीने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कुठल्याही शाखेत भरणे आवश्यक आहे.
अधिक माहिती व तपशील : अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेन्ट न्यूज’च्या ५ ते १२ जुलै २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्या http://www.upsconline.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख : संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ ऑगस्ट २०१३.
ज्या पदवीधरांना केंद्र सरकारअंतर्गत सशस्त्र पोलीस दलात अधिकारीपदावर आपले करिअर करायचे असेल अशांसाठी ही संधी उपयुक्त ठरू शकते.