फारुक नाईकवाडे

मागील लेखामध्ये व्यवस्थापकीय अभिवृत्ती आणि निर्णयक्षमता या घटकाच्या तयारीबाबत चर्चा करण्यात आली. या चर्चेच्या अनुषंगाने पर्यायांचे विश्लेषण कशा प्रकारे करावे आणि श्रेणीकरण करून सर्वात योग्य उत्तर कसे शोधावे याबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे. यासाठी सन २०१८च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील पुढील प्रश्न पाहू.

article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व – परीक्षास्वरूप आणि अभ्यासक्रम
Loksatta explained The constructions of Pradhan Mantri Awas Yojana have not been completed
विश्लेषण: पंतप्रधान आवास योजनेची गती का मंदावली?
RBI repo rate announcement Shaktikanta Das
आरबीआयकडून रेपो रेट जैसे थे ठेवण्याचे कारण काय? जाणून घ्या
Government decision not to increase read reckoner for elections
रेडीरेकनर वाढीला निवडणुकीची वेसण; घरांच्या किमती घटणार? रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीवर काय परिणाम?

‘क्षणाचाही वेळ न लागता दंगली उसळणाऱ्या भागात कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्याची कामगिरी तुमच्यावर आहे. भागात राहणाऱ्या एकाच धर्माच्या दोन पंथांत धार्मिक वास्तूच्या मालकीसंबंधाने वाद आहे. त्यापैकी मोठय़ा संख्येने असलेले एका गटाचे सदस्य खूपच आक्रमक असून ते दुसऱ्या अल्पसंख्येने असलेल्या गटावर दादागिरी करू पाहतात. सकाळीच दादा गटाने त्या जागेवर जबरदस्तीने मालकी मिळवली आणि याच्या परिणामी तेथील परिस्थिती गंभीर बनली. संख्येने अल्प असलेल्या गटाने या गटाविरोधात तक्रार नोंदवली. गुंतागुंत टाळून शांतता प्रस्थापित करण्यासाठी तुम्ही पोलीस अधिकाऱ्याला या गटाच्या नेत्याला अटक करण्याचा आदेश दिला. पोलीस पथक या नेत्याला बनावट चकमकीत ठार मारण्याचा प्रयत्न करत आहे, अशी त्या गटाच्या सदस्यांची समजूत झाली. सायंकाळी लाठय़ा व पलिते घेतलेला मोठा जमाव ठाण्यावर हल्ला करून नेत्याची सुटका करण्यासाठी चाल करून येत आहे.’  तुम्ही;

(१) जमाव आक्रमक असल्यामुळे तो ठाण्याची इमारत जाळण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता असल्याने पोलीस दलाला गोळीबार करण्यासाठी सज्ज राहण्यास सांगाल. (गुण ०)

(२) कोणत्याही प्रकारे चकमक होणार नाही त्यांचा नेता सुरक्षित आहे याची जमावाला खात्री द्याल आणि काही सदस्यांना त्यांच्या नेत्याशी बोलण्याची विनंती कराल. (गुण १.५)

(३) अटक केलेल्या नेत्याशी बोलून त्याने स्वत: तो सुरक्षित असून त्याच्या विरोधात पोलिसांनी कोणतीही तक्रार नोंदवली नसल्याचे घोषित करावे यासाठी त्याची समजूत घालाल. (गुण २.५)

(४) त्या भागातील नगरसेवक, विधानसभा सदस्य, लोकसभा सदस्य यांना ही परिस्थिती हाताळण्यासाठी तुम्हाला मदत करण्याची विनंती कराल.(गुण १)

प्रसंगाचे मूल्यमापन आणि तुमची भूमिका व अधिकार

दिलेल्या प्रसंगातील महत्त्वाच्या बाबी आहेत – तुमची  कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अधिकार प्राप्त व्यक्ती ही भूमिका; दंगली उसळू शकतील असे संवेदनशील वातावरण; चकमकीबद्दल अफवा पसरल्याने संतप्त झालेला हिंसक जमाव आणि त्यामुळे हाताळण्यास अवघड झालेली परिस्थिती; जीवित व वित्तहानी होऊ शकण्याची शक्यता.

दिलेले सर्व पर्याय अमलात आणण्याची अधिकारिता तुमच्याकडे आहे. त्यामुळे अधिकाराचा वापर तुम्ही किती कौशल्यपूर्वक करता यावर यशापयश अवलंबून आहे.

पर्यायविश्लेषण आणि श्रेणीकरण:

पर्याय एकमधील कार्यवाही ही तुमचा आणि तुमच्या सहकाऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी वेळ पडल्यास वापरावी लागेल अशा प्रकारची व रोखठोक असली तरी त्यातून होणाऱ्या परिणामांचा विचार करता सर्वोत्तम व पहिल्या प्राधान्याचा पर्याय ठरू शकत नाही. अशा ’सिंघम’ पद्धतीच्या पर्यायातून उतावळेपणा आणि असंवेदनशीलता दिसून येते. त्यामुळे या पर्यायाला सर्वात कमी श्रेणी द्यायला हवी.

प्रशासकीय अधिकाऱ्यांपेक्षा लोकप्रतिनिधींचा लोकांशी संपर्क व त्यांच्यावर प्रभाव जास्त असतो. अशा वेळी त्यांच्या हस्तक्षेपामुळे जमाव हिंसक बनणार नाही आणि तुमचे म्हणणे ऐकून घेईल याची शक्यता वाढते. एकूण प्रसंगाची संवेदनशीलता पाहता पर्याय क्रमांक चारमध्ये नमूद केल्याप्रमाणे योग्य व्यक्तींची मदत घेण्यात जास्त व्यवहार्यता दिसून येते. मात्र या पर्यायामध्ये इतरांना परिस्थिती हाताळण्याची विनंती करण्यातून, स्वत:चे अधिकार वापरण्याची क्षमता कमी पडत असल्याचे दिसून येते. त्यामुळे पर्याय एकपेक्षा जास्त श्रेणी या पर्यायाला द्यायला हवी.

पर्याय कमांक दोनमध्ये नेत्याच्या सुरक्षिततेबाबत तुम्ही खात्री देणे हे व्यवहार्य आहे आणि जमावातील काही सदस्यांना त्यांच्या नेत्याशी बोलायची संधी देण्यातून त्यांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न दिसून येतो. त्यामुळे हा पर्याय जास्त विश्वासार्ह वाटत असला तरी जमाव हिंसक झालेला असताना अशा प्रकारे बोलण्याची संधी मिळेलच हे गृहीत धरता येत नाही. संधी मिळाली तरी बोलायचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीलाच जमावाकडून इजा पोहोचवली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच नेत्यालाच धोका आहे अशी समजूत झालेला जमाव या प्रस्तावाबाबत विश्वास ठेवेल याची खात्रीही देता येत नाही. त्यामुळे संवेदनशील आणि व्यवहार्य असला तरी हा पर्याय तितका परिणामकारक ठरणार नाही.

या पर्यायाची आणि पर्याय तीनची श्रेणी इतरांपेक्षा जास्त असेल. पण पर्याय तीनची श्रेणी सर्वात जास्त असायला हवी. कसे ते पाहू – पर्याय क्रमांक तीनमध्ये जमावाच्या नेत्याला त्याच्या सुरक्षिततेबाबत जमावाला खात्री देण्यासाठी तयार करणे हा विचार सर्वाधिक योग्य आहे. नेत्याला परिस्थितीची जाणिव करून देऊन तुमच्या प्रस्तावासाठी तयार करण्यासाठी त्याच्याशी शांतपणे चर्चा करता येणार आहे. स्वत: नेताच जमावासमोर येईल तेव्हा आपोआपच त्याच्या सुरक्षिततेची खात्री पटून जमाव हिंसक कारवाईपासून परावृत्त होईल. स्वत: नेत्यानेच वस्तुस्थिती सांगितल्यावर जमावाचा त्यावर विश्वासही बसेल आणि परिस्थिती नियंत्रणात येईल.

वरील विश्लेषणाचा विचार करता आयोगाने पर्याय एकसाठी ० गुण, पर्याय चारसाठी १ गुण, पर्याय दोनसाठी १.५ गुण आणि पर्याय तीनसाठी २.५ गुण दिले आहेत त्यामागचा विचार लक्षात येईल.