जगद्विख्यात हार्वर्ड विद्यापीठातील रॅडक्लिफ इन्स्टिटय़ूट फॉर अॅडव्हान्स्ड स्टडी या विभागातर्फे सृजनशील क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना रॅडक्लिफ आंतरराष्ट्रीय पाठय़वृत्ती प्रदान केली जाते. याद्वारे विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ-विचारवंत, शास्त्रज्ञ, गणितज्ञ, कलाकार किंवा लेखक इत्यादी सृजनशील क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या या नवनिर्मितीला उत्तेजन दिले जाते. या व्यावसायिकांनी त्यांच्या संबंधित विषयांत प्रगत व अद्ययावत काम करावे या उद्देशाने हार्वर्ड विद्यापीठाच्या या विभागाकडून रॅडक्लिफ पाठय़वृत्ती बहाल केली जाते. २०१५ साली दिल्या जाणाऱ्या या पाठय़वृत्तीसाठी विविध क्षेत्रांतील व विविध विषयांतील अर्जदारांकडून १ ऑक्टोबर २०१४ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत.
पाठय़वृत्तीविषयी : रॅडक्लिफ आंतरराष्ट्रीय पाठय़वृत्ती ही जगभरातील नामांकित पाठय़वृत्ती आहे. याचे कारण हार्वर्ड विद्यापीठातर्फे एखादे नवनिर्मितीचे काम करण्यास उत्तेजन मिळावे, यासाठी ही पाठय़वृत्ती दिली जाते. विविध विद्याशाखांमधील अत्यंत हुशार आणि कुशाग्र बुद्धिमत्ता असलेले अभ्यासक, तज्ज्ञ, विचारवंत, शास्त्रज्ञ, गणितज्ञ, कलाकार किंवा लेखक आदी व्यावसायिकांना त्यांच्या क्षेत्रामध्ये प्रगत व अद्ययावत काम करता यावे हा या पाठय़वृत्तीचा हेतू आहे. सर्वच प्रमुख विद्याशाखांमधील कोणत्याही विषयातील संशोधन कार्य करण्यासाठी ही पाठय़वृत्ती दिली जाते. दरवर्षी वर उल्लेख केलेल्या क्षेत्रांत साधारणत: ५० पाठय़वृत्ती दिल्या जातात. पाठय़वृत्तीधारकाच्या संशोधन प्रकल्पाचा कालावधी एक वर्षांचा असतो. या पाठय़वृत्तीअंतर्गत पाठय़वृत्तीधारकाला विद्यापीठाकडून वार्षकि ७० हजार डॉलर्स एवढा भत्ता देण्यात येतो. त्याव्यतिरिक्त त्याच्या प्रकल्पासाठी अतिरिक्त भत्ता, निवासी भत्ता, प्रवास भत्ता यांसारख्या इतर सुविधादेखील देण्यात येतात.
आवश्यक अर्हता : ही पाठय़वृत्ती वर उल्लेखिलेल्या कोणत्याही क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी खुली आहे. या पाठय़वृत्तीसाठी अर्जदार स्वतंत्रपणे अर्ज करू शकतो किंवा अनेक अर्जदारांचा एक गट मिळूनदेखील अर्ज करू शकतो. अर्जदार स्वतंत्रपणे किंवा गटामध्ये मानववंशशास्त्र, विविध सामाजिक शास्त्रे, सृजनशील कला, मूलभूत विज्ञानातील विविध विषय आणि गणित इत्यादी विषयांसाठी अर्ज करू शकतो. यातील बव्हंशी सामाजिक शास्त्रे व मूलभूत विज्ञान क्षेत्रातील पाठय़वृत्तीसाठी पीएच.डी.ची किमान शैक्षणिक अर्हता आवश्यक आहे. इतर क्षेत्रांसाठी पीएच.डी. जरी गरजेची नसली तरी तत्सम अर्हता अर्जदाराकडे असावी. त्या-त्या विषयानुसार किमान पात्रता वेबसाइटवर नमूद करण्यात आली आहे.
अर्ज प्रक्रिया : हार्वर्डच्या या पाठय़वृत्तीसाठी अर्जदाराने त्याचा अर्ज ऑनलाइन अर्जप्रणालीद्वारे पूर्ण करावा. अर्जासोबत त्याच्या शैक्षणिक पाश्र्वभूमीबद्दल सविस्तर माहिती देणारे त्याचे एस.ओ.पी., त्याचा सी.व्ही., आतापर्यंत केलेल्या त्याच्या संपूर्ण कामाचा संशोधन प्रस्ताव इत्यादी गोष्टी असाव्यात.
निवड प्रक्रिया : अर्जाच्या अंतिम मुदतीनंतर पुढील निवड प्रक्रिया सुरू होते. प्रत्येक विद्याशाखेतील पात्र अर्जदाराचा अर्ज संबंधित शाखेतील अनुभवी, तज्ज्ञ समितीकडून तपासला जातो. अर्ज पुनरावलोकनाची प्रक्रिया दोन टप्प्यांत पूर्ण होते. अर्जाबरोबर त्याची गुणवत्ता व त्याने मांडलेल्या प्रकल्पाचा दर्जा लक्षात घेतला जातो. समितीने केलेल्या मूल्यमापनावर अंतिम निवड केली जाते. अर्जदाराला त्याच्या निवडीबद्दल मार्च २०१५ मध्ये कळवले जाते.
अंतिम मुदत : या पाठय़वृत्तीमधील सामाजिक शास्त्रे, मानववंशशास्त्र आणि सृजनशील कला क्षेत्रातील विषयांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १ ऑक्टोबर २०१४, तर मूलभूत विज्ञान व गणित या क्षेत्रांमधील विषयांसाठी ही मुदत
१ नोव्हेंबर २०१४ अशी आहे.
महत्त्वाचा संदर्भ :
http://www.radcliffe.onlineapplicationportal.com
itsprathamesh@gmail.com
संग्रहित लेख, दिनांक 28th Jul 2014 रोजी प्रकाशित
हार्वर्डमध्ये रॅडक्लिफ पाठय़वृत्ती
जगद्विख्यात हार्वर्ड विद्यापीठातील रॅडक्लिफ इन्स्टिटय़ूट फॉर अॅडव्हान्स्ड स्टडी या विभागातर्फे सृजनशील क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना रॅडक्लिफ आंतरराष्ट्रीय पाठय़वृत्ती प्रदान केली जाते.
First published on: 28-07-2014 at 01:04 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Harvard radcliffe scholarship