इंग्लंडमधील लोहब्रुग विद्यापीठ ही संस्था आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा, शारीरिक क्षमता आणि आरोग्यविषयक क्षेत्रांत विशेष उल्लेखनीय स्वरूपाचे काम करीत असून विद्यापीठातर्फे या निवडक क्षेत्रांत शैक्षणिक शिष्यवृत्ती उपलब्ध आहेत –
योजनेअंतर्गत उपलब्ध शिष्यवृत्ती व समाविष्ट विषय : या योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तींची संख्या १०० आहेत. या शिष्यवृत्ती २०१४ या शैक्षणिक सत्रात विद्यापीठामध्ये उपलब्ध असणाऱ्या क्रीडा, मानवी शारीरिक क्षमता, क्रीडा व्यवस्थापन, क्रीडाविषयक मानसशास्त्र यांसारख्या क्षेत्रातील विविध अभ्यासक्रमांसाठी देण्यात येते.
लोहब्रुग विद्यापीठाची पदव्युत्तर अभ्यासक्रम शिष्यवृत्ती : ही शिष्यवृत्ती विद्यापीठामध्ये उपलब्ध असणाऱ्या क्रीडा, शारीरिक क्षमता, आरोग्य विज्ञान यांसारख्या विषयातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी उपलब्ध आहे.
निवड पद्धती आणि शिष्यवृत्तीचा तपशील : अर्जदारांची क्रीडा, क्रीडा व्यवस्थापन आणि क्रीडा क्षेत्राशी संबंधित विषयातील पदवी परीक्षेतील गुणांची टक्केवारी आणि क्रीडा क्षेत्रात योगदानाच्या आधारे करण्यात येते.
योजनेअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रातील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीच्या शुल्कापैकी २५ टक्के शैक्षणिक शुल्क शिष्यवृत्ती म्हणून देण्यात येते.
लोहब्रुग विद्यापीठाची पदव्युत्तर पात्रतेनंतरची क्रीडाविषयक शिष्यवृत्ती : ही योजना लोहब्रुग विद्यापीठातर्फे क्रीडासंबंधित क्षेत्रात पदव्युत्तर पात्रता पूर्ण करून त्यानंतर शैक्षणिक वा संशोधनपर अभ्यास अथवा काम करणाऱ्यांना लागू आहे. या योजनेअंतर्गत निवड झालेल्यांना त्यांच्या पदव्युत्तर पात्रतेनंतरच्या शैक्षणिक वा संशोधनपर कामासाठी त्यांच्या शैक्षणिक व संशोधन शुल्कापैकी १० टक्के रक्कम शिष्यवृत्ती स्वरूपात
देण्यात येते. क्रीडा व संबंधित क्षेत्रांत आंतरराष्ट्रीय स्तरावर पदव्युत्तर पदवी व त्यानंतरचे शैक्षणिक, संशोधनपर काम करू इच्छिणाऱ्यांनी यासंदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी इंग्लंडमधील लोहब्रुग विद्यापीठाच्या http://www.ucas.com अथवा  http://www.ibaro.ac.uk  या संकेतस्थळांना अवश्य भेट द्यावी.