आकाशाकडे दुर्बीण रोखली तर सहजासहजी आपल्या दृष्टीला न पडणाऱ्या अनेक गोष्टी आणि त्यांच्यातले बारकावे आपल्याला दिसू शकतात, हे गॅलिलिओ यांनी जगाला दाखवून दिलं. पण दुर्बणिीची ही ताकद आणि आवाका मानवाला समजण्यापूर्वीसुद्धा अनेक संशोधकांनी खगोलशास्त्रात भरीव कामगिरी केली आहे; त्यापकीच एक म्हणजे सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ आणि त्या काळी अल्केमिस्ट म्हणूनही ज्ञात असलेला टायको ब्राहे!
टायको ब्राहेचा जन्म स्कॅनिया इथे अत्यंत श्रीमंत घराण्यात झाला. त्या वेळी स्कॅनिया डेन्मार्कमध्ये होतं. आता ते स्वीडनमध्ये आहे. टायकोचे वडील खूप श्रीमंत होते आणि डॅनिश राजाच्या दरबारात त्यांना मान होता. पण टायको दोन वर्षांचा असताना जॉर्गन ब्राहे या त्याच्या निपुत्रिक काकाने पुत्रप्रेमापोटी टायकोला चक्क पळवून नेलं आणि त्याचा सांभाळ करायला सुरुवात केली. त्याने टायकोची कोपनहेगन आणि लिपझिग येथे तत्त्वज्ञान आणि कायदा यांचं उत्कृष्ट दर्जाचं शिक्षण मिळण्याची सोय केली. आपल्या पुतण्याने राजकीय कारकीर्द करावी असं त्याच्या मनात होतं. पण हे शिक्षण घेत असताना वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी म्हणजे १५६० साली टायकोने खंडग्रास सूर्यग्रहण पाहिलं आणि त्याला खगोलशास्त्रात रस वाटायला लागला. हळूहळू त्याने खगोलशास्त्राचा अभ्यास सुरू केला आणि कालांतराने राजकारणाचा अभ्यास सोडून देऊन त्याने स्वत:ला खगोलशास्त्राला जणू वाहून घेतलं.
टायको कुशाग्र बुद्धिमत्तेचा आणि कठोर परिश्रम घेणारा होता. पण त्याचा स्वभाव मात्र तिरसट आणि भांडखोर होता. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी जर्मनीतल्या रॉस्टॉक विद्यापीठात शिकत असताना गणितातल्या एका सूत्राच्या अचूकतेवरून त्याचं आणि त्याच्या एका चुलत भावाचं मोठं भांडण झालं. हे भांडण इतकं विकोपाला गेलं की त्याचं पर्यवसान चक्क तलवारबाजीत झालं. या सगळ्या प्रकारात टायकोला आपलं नाक गमवावं लागलं. मग त्याने चांदीचं नकली नाक बसवून घेतलं.
१५७२ साली टायको ब्राहे यांचं लक्ष कॅसिओपिया तारकापुंजामध्ये दिसणाऱ्या एका ठळक ताऱ्याकडे गेलं. यापूर्वी हा तारा इतक्या ठळकपणे ब्राहे यांच्या नजरेला पडला नव्हता. त्यामुळे त्यांनी या ताऱ्याची निरीक्षणं करायला सुरुवात केली. या ताऱ्याचं तेज पहिल्यांदा गुरू ग्रहाएवढं होते. नंतर तो शुक्रासारखा तेजस्वी दिसायला लागला. त्यानंतर सुमारे दोन महिने हा तारा चक्क दिवसाढवळ्याही सहज दिसत होता. पण त्यानंतर मात्र तो फक्त रात्रीच दर्शन देऊ लागला आणि कालांतराने दिसेनासा झाला. सुमारे १४ महिने दिसणारा हा तारा म्हणजे अतिशय तेजस्वी असा अतिनवतारा होता. या ताऱ्याला ब्राहे यांनी ‘नोव्हा’ म्हणजे ‘नवजात तारा’ असं संबोधलं. आता अशा प्रकारच्या ताऱ्यांना आपण ‘सुपरनोव्हा’ असं संबोधतो.
ब्राहे यांनी या ताऱ्याचा सखोल अभ्यास केला आणि आपल्या निरीक्षणांवर आधारित ‘डी नोव्हा स्टेला’ नावाचं पुस्तक लिहिलं. आपल्या निरीक्षणांवरून सूर्यमालेच्या बाहेरही तारे असावेत, असा महत्त्वाचा निष्कर्ष ब्राहे यांनी काढला. ब्राहे यांनी अभ्यास केलेला तारा पृथ्वीपासून सुमारे साडेसात हजार प्रकाशवष्रे अंतरावर होता आणि त्याचं तेज सुमारे ३० कोटी सूर्याच्या तेजाएवढं होतं.
टायको ब्राहे हे कोपíनकसच्या कोष्टकांनी प्रभावित झाले होते. ग्रहांच्या हालचाली कशा होतात, हे या कोष्टकांमध्ये लिहिले होते. ब्राहे यांना ग्रहांच्या गतीचे विलक्षण आश्चर्य वाटत होते. ग्रहांच्या भ्रमणाचा अधिक अभ्यास करण्यासाठी ब्राहे यांनी फ्रेडरिक (दुसरा) राजाकडे आíथक मदत मागितली. राजाने ब्राहे यांना मदतीदाखल हॅ्वेन नावाचं एक आख्खं बेटच दिलं आणि या बेटावर वेधशाळा बांधण्यासाठी येणारा सगळा खर्चही दिला. या बेटावर युरानीबोर्ग इथे ब्राहे यांनी खगोलशास्त्राच्या अभ्यासासाठी वेधशाळा आणि आपल्या अल्केमीच्या प्रयोगांसाठी प्रयोगशाळा उभारली. खगोलशास्त्रातल्या निरीक्षणासाठी लागणारी उपकरणं त्यांनी स्वत: तयार केली. यानंतरची २० वर्षे म्हणजे सन १५७२ ते १५९२ या काळात टायको ब्राहे यांनी अखंडपणे निरीक्षणे केली. त्यांनी तब्बल ७७७ ताऱ्यांचा अभ्यास केला आणि आश्चर्य म्हणजे या सगळ्या ताऱ्यांची स्थिती त्यांनी निश्चित केली. त्यांनी केलेल्या निरीक्षणांची अचूकता एका अंशाच्या सहाव्या भागाइतकी म्हणजे १० मिनिटे इतकी होती. ती वाढवत वाढवत दोन मिनिटे इतकी सूक्ष्म करण्यात त्यांना यश आलं. त्या काळी उपलब्ध असलेल्या तुटपुंज्या उपकरणांच्या साहाय्याने अचूक निरीक्षणं घेण्यात ब्राहे यांनी आपल्या आयुष्याच्या अनेक रात्री व्यतीत केल्या. त्यांची बहीण सोफिया ही त्यांना वाचनं घेण्यात मदत करत असे.
१५४२ मध्ये निकोलस कोपíनकस यांनी सूर्यकेंद्री सिद्धान्त मांडला होता. या सिद्धान्तानुसार सर्व ग्रह सूर्याभोवती वर्तुळाकार मार्गाने भ्रमण करतात. पण टॉलेमीच्या पृथ्वीकेंद्री सिद्धांताच्या हे विरुद्ध होतं. कोपíनकस यांच्या सूर्यकेंद्री सिद्धांताला चर्चचादेखील विरोध होता.
टायको ब्राहे यांच्या मते, सर्व ग्रह सूर्याभोवती फिरत असले तरी सूर्य आणि चंद्र मात्र पृथ्वीभोवती फिरतात. आपलं मत सिद्ध करण्यासाठी त्यांनी मंगळ ग्रहाची अक्षरश: हजारो निरीक्षणं नोंदवली. या निरीक्षणांवरून पृथ्वीसह सगळे ग्रह सूर्याभोवती फिरतात असाच निष्कर्ष निघत होता. पण ब्राहे यांना मात्र ठाम वाटायचं की, सूर्य इतर ग्रहांना घेऊन पृथ्वीभोवती फिरतो. अखेपर्यंत निरीक्षणं घेऊन त्यांनी आपल्या या मताचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला. ब्राहे यांनी नोंदवलेल्या निरीक्षणांचा उपयोग योहानस केप्लर या संशोधकाला झाला.
फ्रेडरिक राजाच्या मृत्यूनंतर त्याच्या जागी राज्यावर आलेल्या ख्रिश्चन (चौथा) या राजाने ब्राहे यांना हॅ्वेन बेट सोडायला लावलं. तीन वर्षांच्या भटकंतीनंतर ब्राहे प्रागमध्ये स्थायिक झाले. रोमन साम्राज्याचा त्या वेळचा सम्राट रुडॉल्फ (दुसरा) याने ब्राहे यांना प्रागपासून ५० किलोमीटरवर असलेला एक किल्ला वेधशाळेसारखा वापरायला दिला. इथेच ब्राहे आणि केप्लर यांची भेट झाली. त्यानंतर दोन वर्षांत ब्राहे यांचा मृत्यू झाला.
ब्राहे यांचं संशोधन कार्य केप्लरने पुढे सुरू ठेवलं. ब्राहे यांनी केलेल्या निरीक्षणांवरून केप्लरने आजचा सुधारित सूर्यकेंद्री सिद्धांत मांडला. त्यासंबंधी त्यांनी मांडलेले तीन नियमही प्रसिद्ध आहेत. ब्राहे यांनी तयार केलेली तारका सूची केप्लरने आपली आणखी काही भर घालून ‘रुडॉल्फाइन टेबल्स’ या नावाने प्रसिद्ध केली. अशा प्रकारे कोपíनकस अणि केप्लर यांच्या खगोल संशोधनातला दुवा म्हणून टायको ब्राहे यांचं नाव घेता येईल.
ब्राहे यांनी युरानीबोर्ग इथे उभारलेली वेधशाळा ३० वर्षे चाललेल्या एका युद्धामध्ये नष्ट झाली. पण आपल्या कार्यामुळे टायको ब्राहे हे नाव अजरामर झालं आहे. १५७२ साली त्यांनी अभ्यास केलेल्या ताऱ्याला ‘टायकोचा तारा’ म्हणून संबोधण्यात आलं. चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्याच्या कक्षेसंबंधी आणि मंगळ ग्रहासंदर्भात ब्राहे यांनी केलेल्या संशोधनाच्या सन्मानार्थ चंद्र आणि मंगळावरील विवरांना त्यांचं नाव देण्यात आलं आहे.
० खगोलशास्त्रामध्ये ग्रह, उपग्रह, तारे, नवजात तारे, मृत्युपंथाला लागलेले तारे, तारकापुंज, आकाशगंगा इत्यादी संज्ञा वापरल्या जातात. या संज्ञांचे नेमके अर्थ जाणून घ्या.
० रेडिओ दुर्बणिीच्या मदतीने पृथ्वीपासून हजारो प्रकाशवर्षे दूरवर असलेल्या ताऱ्यांचं अंतर काढणं तुलनेने सोपं आहे. पण रेडिओ दुर्बणिीसारखी साधनं ज्या काळात उपलब्ध नव्हती तेव्हा अवकाशीय अंतरं ठरवण्यासाठी कोणकोणत्या वेगवेगळ्या पद्धती वापरल्या गेल्या, याविषयी प्रकल्प करा.
० चंद्र व सूर्यग्रहणांचा उपयोग करून खगोलशास्त्रात कोणते महत्त्वपूर्ण शोध लावले गेले, याची माहिती संकलित करा.
० रसायनाशास्त्राच्या जडणघडणीत ‘अल्केमिस्ट’ म्हणजेच (सोनं ‘तयार’ करणाऱ्या) किमयागारांचाही महत्त्वाचा वाटा आहे, असं म्हटलं जातं. वेगवेगळे अल्केमिस्ट आणि त्यांचं रसायनशास्त्रातलं योगदान याविषयी माहिती मिळवा.
hemantlagvankar@gmail.com