जास्मिन हरिसन हे नाव सध्या अमेरिकत गाजत आहे. हॉलीवूडमधील एका अभिनेत्रीबरोबर नामसाधम्र्य असले तरी या जास्मिनच्या लौकिकामागील कारण वेगळे आहे. ही आहे, नुकतेच शालेय शिक्षण पूर्ण केलेली आणि महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणारी युवती. म्हणजे आपल्या शिक्षणव्यवस्थेच्या गणितात बसवायचे झाले तर बारावी झालेली, वय १७. सध्या अमेरिकेतील अनेक चांगली महाविद्यालये, विद्यापीठे यांनी जास्मिनसाठी पायघडय़ा अंथरल्या आहेत. तर तिने आपल्याच महाविद्यालयात प्रवेश घ्यावा म्हणून ११३ शिक्षणसंस्थानी तिच्याशी संपर्क साधला आहे. आता हे सगळे होण्याचे कारण काय ? तर जास्मिनला शालेय स्तरावर ४ श्रेयांक मिळाले आहेत. विद्यापीठांच्या प्रवेश मेळाव्यांमध्ये तीन जीवशास्त्रातील पदवीसाठी अर्ज केला. त्यानंतर विद्यापीठांकडून प्रवेशासाठीच्या प्रस्ताव योजनांची तिच्या मेल बॉक्समध्ये गर्दी झाली. डेली मेलच्या वृत्तानुसार तिने आपल्याकडेच प्रवेश घ्यावा म्हणून प्रयत्न करणाऱ्या अमेरिकेतील काही नामांकित शिक्षणसंस्थाही आहेत. यातील काही महाविद्यालयांनी तिला ३०कोटी डॉलपर्यंत शिष्यवृत्तीही देऊ केली आहे.
भारतीय शिक्षण व्यवस्था आणि बाजारपेठेने तयार केलेल्या मानसिकतेला धक्का बसवा असा जास्मिनच्या या गोष्टीतील पुढचा मुद्दा म्हणजे, जीवशास्त्रातील पदवी घेऊन पुढे काय करायचे आहे? असे विचारल्यावर जास्मिन म्हणाली, परिचारिका व्हायचे आहे. अतिदक्षता विभागातील परिचारिका म्हणून आपली कारकीर्द घडवण्यात तिला रस आहे. आपल्याकडे परीक्षेतील गुणांनुसार परंपरागत चालत आलेल्या क्षेत्रनिवडीच्या उतरंडीत अजूनही परिचर्या अभ्यासक्रमाचा क्रमांक खूपच खालचा आहे. वास्तविक सेवाभाव जपणारे क्षेत्र असतानाही ठरावीक प्रांत वगळता देशभरातील बहुतेक भागांमध्ये परिचर्या अभ्यासक्रमाला प्रतिष्ठेअभावी प्रतिसाद मिळत नाही. परदेशात मात्र बहुतेक ठिकाणी परिचारिका होणे हे प्रतिष्ठेचे आणि मानाचे समजले जाते. आजच्या परिचारिका दिनानिमित्त एवढेच!
संकलन – रसिका मुळ्ये