आशिया खंडामधील देशांमध्ये मत्रीपूर्ण संबंध तयार व्हावेत आणि आगामी काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर आशिया खंडात उत्तम नेतृत्व तयार व्हावे या उद्देशाने चीनमधील झेजियांग या अग्रगण्य राष्ट्रीय विद्यापीठाने ‘सार्वजनिक प्रशासन’ या विषयातील दोन वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम (Master in Public Administration: Asia Synergy Program for Future Leaders) आखला आहे. आशियातील अन्य देशांच्या विद्यार्थ्यांनीही या अभ्यासक्रमात सहभागी व्हावे आणि आपल्या खंडासह आंतरराष्ट्रीय पातळीवर शांतता नांदण्यासाठी हातभार लावावा या हेतूने या पदव्युत्तर अभ्यासक्रमाची रचना इंग्रजीमध्ये करण्यात आली आहे. त्यासाठी शिष्यवृत्तीधारकाला दोन वर्षांसाठी प्रवेशासहित संपूर्ण शिष्यवृत्ती आणि इतर सवलती दिल्या जातील. २०१५ मधील या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी झेजियांग विद्यापीठाने आशियातील चीन वगळता इतर देशांमधील विद्यार्थ्यांकडून १ जूनपूर्वी अर्ज मागवले आहेत.
शिष्यवृत्तीविषयी..
१८९७ मध्ये स्थापन झालेले झेजियांग विद्यापीठ हे चीनमधील एक प्रमुख राष्ट्रीय विद्यापीठ आहे. चीनमधील झेजियांग प्रांतातील हँग्झो या शहरात असलेले हे विद्यापीठ जगातील पहिल्या दीडशे विद्यापीठांपकी एक आहे तर आशियातील पहिल्या ३० विद्यापीठांमध्ये याचा क्रमांक लागतो. झेजियांग विद्यापीठात अभियांत्रिकी, कला व विज्ञान, कृषी, गणित आणि वैद्यक अशा पाच प्रमुख विद्याशाखा आहेत. यातील वैद्यक शाखेचा विभाग हा सर्वात मोठा विभाग आहे. विद्यापीठाच्या कला शाखेतील सार्वजनिक प्रशासन विभागाकडून घेतल्या गेलेल्या पुढाकारातून ‘सार्वजनिक प्रशासन’ या विषयातील दोन वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम विद्यापीठाने काही वर्षांपूर्वी सुरू केला. त्यातील शिष्यवृत्तीसाठी झेजियांग विद्यापीठाला BAI XIAN Education Foundation  या संस्थेचे सहकार्य लाभले आहे.
आशियातील चीनसह इतर समकालीन देशांच्या सामाजिक-आíथक विकासाचा अभ्यास व्हावा, शासकीय व्यवस्थांचे ज्ञान असलेल्या युवा विद्यार्थ्यांकडून सार्वजनिक क्षेत्रात दमदार कामगिरी व्हावी आणि त्यांच्यामधून भावी नेतृत्व उदयाला यावे, या दृष्टिकोनातून हा शिष्यवृत्ती कार्यक्रम दरवर्षी राबवला जातो. भावी आशियाई नेतृत्वामध्ये सांस्कृतिक सहसंबंध वाढावेत, विश्वास आणि समजूतदारपणा यांच्या माध्यमातून आशियातील देशांनी जागतिक विकासाच्या दृष्टीने वाटचाल करावी या हेतूने सुरू केलेल्या या शिष्यवृत्ती कार्यक्रमाअंतर्गत आशियाई देशांमधील (चीनव्यतिरिक्त) एकूण
१५ विद्यार्थ्यांना दोन वर्षांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेशासहित शिष्यवृत्ती बहाल केली जाते. या शिष्यवृत्तीअंतर्गत शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांला विद्यापीठाकडून पदवीच्या कालावधीकरता शिकवणी शुल्क, नोंदणी शुल्क, इंटर्नशिप शुल्क यांसहित इतर सर्व शैक्षणिक शुल्क माफ केले जाते. याबरोबरच विद्यापीठ परिसरामध्ये एका चिनी विद्यार्थ्यांबरोबर निवासाची सोय विभागून दिली जाते. शिष्यवृत्तीधारकाला सहा हजार चिनी युआन मासिक वेतन आणि आंतरराष्ट्रीय आरोग्य विम्याची सुविधाही दिली जाते.
आवश्यक अर्हता
ही शिष्यवृत्ती आशियाई देशांतील सर्व नागरिकांसाठी खुली आहे. विद्यापीठाच्या अपेक्षेनुसार या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणारा विद्यार्थी जबाबदार, अतिशय हुशार, प्रामाणिक, नेतृत्व गुण आणि एकात्मता जोपासणारा आणि व्यापक दृष्टिकोन असणारा हवा. अर्जदार पदवीधर असावा किंवा पदवीच्या अंतिम वर्षांला शिकत असावा. अर्जदाराची पदवी स्तरावर शैक्षणिक पाश्र्वभूमी उत्तम असावी. शिष्यवृत्ती कार्यक्रम इंग्रजीत असल्याने अर्जदाराचे इंग्रजीवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. भारतातील अर्जदारांनी टोफेल किंवा आयईएलटीएस या इंग्रजीच्या कोणत्याही एका परीक्षेत उत्तीर्ण असावे. अर्जदाराचे आरोग्य उत्तम असणे आवश्यक आहे. तसेच या विद्यार्थ्यांने इतर कोणतीही शिष्यवृत्ती स्वीकारलेली नसावी.
अर्ज प्रक्रिया
या शिष्यवृत्तीसाठी अर्जदाराने त्याचा अर्ज ऑनलाइन अर्जप्रणालीद्वारे पूर्ण करून संदर्भस्रोतात खाली नमूद केलेल्या विद्यापीठाच्या वेबसाइटवर जमा करावा. अर्जाबरोबर अर्जदाराने इंग्रजी किंवा चिनी भाषेमध्ये त्याच्या शैक्षणिक पाश्र्वभूमीबद्दल सविस्तर माहिती लिहावी. त्यात एस.ओ.पी., सी.व्ही., त्याचा पदवी अभ्याक्रमादरम्यानचा संशोधन प्रबंध किंवा त्याने शोधनिबंधात प्रकाशित केलेले एखादे संशोधन, तसेच त्याच्या शैक्षणिक पाश्र्वभूमीशी संबंधित असलेल्या दोन प्राध्यापकांची किंवा तज्ज्ञांची शिफारसपत्रे, आतापर्यंतच्या सर्व शैक्षणिक ट्रान्सक्रिप्टस्च्या अधिकृत प्रती व आरोग्य तपासणी अर्ज इत्यादी गोष्टी जोडाव्यात. या सर्व कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती अर्जदाराने विद्यापीठाच्या वेबसाइटवर दिलेल्या कार्यालयीन पत्त्यावर कुरियर कराव्यात. कागदपत्र न जोडलेले अर्ज किंवा अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
निवड प्रक्रिया
अर्जदाराची एकूण गुणवत्ता आणि स्पर्धात्मकता लक्षात घेऊन शिष्यवृत्तीसाठी त्याची निवड केली जाईल. निवड झालेल्या अर्जदारांची यादी विद्यापीठाच्या वेबसाइटवर जुलच्या शेवटच्या आठवडय़ापर्यंत प्रकाशित केली जाईल. निवड झालेल्या शिष्यवृत्तीधारकांचा शिष्यवृत्ती कार्यक्रमाच्या ध्येयधोरणांना पािठबा असणे आवश्यक आहे तसेच शिष्यवृत्तीधारकाला या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाल्यानंतर त्याला इतर कुठेही अर्धवेळ किंवा पूर्णवेळ नोकरी स्वीकारता येणार नाही.
अंतिम मुदत
या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १ जून २०१५ आहे.
माहितीचा   स्रोत  
http://iczu.zju.edu.cn/    
  itsprathamesh@gmail.com