scorecardresearch

एमपीएससी मंत्र: राजपत्रित तांत्रिक सेवा पूर्वपरीक्षा; पर्यावरण घटक

राजपत्रित तांत्रिक सेवा पूर्वपरीक्षेच्या सामान्य अध्ययनातील पर्यावरण या उपघटकाच्या तयारीबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे.

फारुक नाईकवाडे
राजपत्रित तांत्रिक सेवा पूर्वपरीक्षेच्या सामान्य अध्ययनातील पर्यावरण या उपघटकाच्या तयारीबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे. तिन्ही सेवांच्या पूर्व परीक्षेमध्ये यापूर्वी हा घटक समाविष्ट नव्हता. त्यामुळे सर्वच उमेदवारांसाठी हा घटक नवीन आहे आणि त्याची नव्याने तयारी करावी लागणार आहे. या घटकाचा सविस्तर अभ्यासक्रम देण्यात आलेला आहे. मुद्देनिहाय तयारी कशी करावी ते पाहू.
मानवी विकास व पर्यावरण
मानवी विकास व पर्यावरण यांमधील परस्परसंबंध समजून घ्यावेत. विकासाचा पर्यावरणावर होणारा परीणाम हा मुद्दा पर्यावरणीय आघात (Environmental Impact) या संकल्पनेच्या आधारे समजून घ्यावा. विविध उद्योग, पायाभूत सुविधा प्रकल्प यांचे पर्यावरणीय आघात मूल्यमापन ही संकल्पना व्यवस्थित समजून घ्यावी.
चालू घडामोडींमध्ये चर्चेतील प्रकल्पांना पर्यावरणाच्या आधारे होणारे विरोध, त्यातील मुद्दे यांची माहिती करून घ्यावी. याबाबत पर्यावरणीय चळवळींच्या वाटचालीतील ठळक टप्पे माहीत करून घ्यावेत.
पर्यावरणपूरक विकास
पर्यावरणपूरक विकासामध्ये शाश्वत विकास ही संकल्पना महत्त्वाची आहे. ही संकल्पना समजून घेऊन त्यातील समाविष्ट घटक माहीत करून घ्यावेत.
वसुंधरा परिषदा आणि अजेंडा २१ यांचा थोडक्यात आढावा घ्यावा.
पर्यावरणाशी संबंधित शाश्वत विकास लक्ष्ये समजून घ्यावीत व त्याबाबत भारताकडून विहित उद्दिष्टे समजून घ्यावीत. शक्यतो याबाबत सहस्रक विकास लक्ष्यांचाही तुलनात्मक आढावा घ्यावा.
भारताची शाश्वत विकास उद्दिष्टांबाबतची निर्धारित उद्दिष्टे व त्यातील कामगिरी याची माहीत असायला हवी.
हरित आणि नील अर्थव्यवस्थेची संकल्पना आणि त्यांच्या विकासासाठीचे प्रयत्न समजून घ्यावेत.
नैसर्गिक साधनसंपत्तीचे संधारण, विशेषत: वनसंधारण, नैसर्गिक साधनसंपत्तीचे प्रकार, त्यांचा वापर, महत्त्व, संवर्धन करण्याची गरज या बाबी उदाहरणांसहित समजून घ्याव्यात. नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन करण्यासाठी शासकीय स्तरावरील योजना आणि या क्षेत्रातील नवनवीन उपक्रम माहीत करून घ्यायला हवेत. योजनांचा अभ्यास करताना त्यांचे नाव. उद्दिष्ट, ब्रीदवाक्य, कालावधी, असल्यास लाभार्थ्यांचे निकष व लाभाचे स्वरूप इ. मुद्दे पाहायला हवेत.
वनसंधारण हा मुद्दा त्यातील शास्त्रीय संकल्पना समजून घेऊन अभ्यासायला हवा. निर्वनीकरणाचे परिणाम, वनसंधारणाची आवश्यकता, त्याचे फायदे आणि त्यासाठीचे शासकीय व अशासकीय प्रयत्न या मुद्दय़ाच्या आधारे तयारी करायला हवी.
विविध प्रकारची प्रदूषणे
वायू, ध्वनी, पाणी, मृदा इत्यादी प्रकारची प्रदूषणे समजून घ्यावीत. या प्रत्येक प्रकारच्या प्रदूषणाचे मोजमाप करण्यासाठीचे निकष, प्रदूषकांची मान्य मर्यादा/प्रमाण, धोकादायक पातळय़ा यांचा टेबलमध्ये नोट्स काढून अभ्यास करता येईल.
सर्वच प्रकारच्या प्रदूषणाचे स्त्रोत आणि त्यांचे पर्यावरणावर व मानवी आरोग्यावर होणारे परिणाम आणि प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी होणारे प्रयत्न यांचा आढावा घ्यायला हवा.
वायू प्रदूषणामध्ये हवेतील घटक वायूंचे, वाफेचे व solid particles चे प्रमाण, त्यातील वाढ, त्यांचे स्त्रोत, त्यांच्या धोकादायक पातळय़ा व त्यांबाबतचे निर्देशांक, अशा पातळय़ा ओलांडलेली भारतातील प्रदूषित शहरे हे मुद्दे पाहावेत.
जल प्रदूषणामध्ये प्रदूषकांचे प्रकार, त्यांच्यामुळे होणारे तोटे/परिणाम, त्यांचे स्रोत, औद्योगिक व कृषी क्षेत्रामुळे होणारे जल प्रदूषण, त्यावर नियंत्रण आणण्यासाठीच्या उपाययोजना हे मुद्दे पाहावेत. यामध्ये Eutrophication सारख्या संकल्पना समजून घ्यायला हव्यात.
मृदा प्रदूषणामध्ये शेतीची आदाने, औद्योगिक कचरा/सांडपाणी, मृदेची धूप अशा कारकांमुळे होणारे प्रदूषण व त्याच पिकांवर होणारे परिणाम समजून घ्यावेत.
पर्यावरणीय आपत्ती
नैसर्गिक प्रक्रिया तसेच मानवी कृती यांमुळे उद्भवणाऱ्या आणि सजीवांना अपायकारक असलेल्या घटना म्हणजे पर्यावरणीय आपत्ती हे लक्षात घेऊन हा मुद्दा अभ्यासावा. त्या अनुषंगाने पर्यावरणीय ऱ्हास, जैवविविधतेचा ऱ्हास, जागतिक तापमान वाढ, नैसर्गिक आपत्ती यांचा समावेश पर्यावरणीय आपत्तीमध्ये करायला हवा.
पर्यावरणीय ऱ्हासाची कारणे, त्यावर परिणाम करणारे घटक, स्वरूप, त्यातून उद्भवणाऱ्या समस्या व त्यांवरील उपाय व पर्यावरणाच्या संधारणाची गरज, त्यासाठीचे उपाय, होणारे प्रयत्न असे मुद्दे लक्षात घ्यावेत.
जागतिक पारिस्थितिकीय असंतुलन, जैवविविधतेतील ऱ्हास यांचा अभ्यास कारणे, स्वरूप, परिणाम, समस्या आणि संभाव्य उपाय अशा मुद्दय़ाच्या आधारे करावा.
जागतिक तापमान वाढ, हरितगृह परिणाम या संकल्पना व्यवस्थित समजून घ्याव्यात. त्यांचा अभ्यास पुढील मुद्यांच्या आधारे करावा – कारणे- विशेषत: CO, CO2, CH4, CFCs, NO यांची वातावरणातील पातळी, स्वरूप, परिणाम, समस्या, संभाव्य उपाययोजना.
जैवविविधतेचा ऱ्हास व जागतिक तापमानवाढ यांच्यामुळे उद्भवलेल्या समस्यांचा अभ्यास कारणे, स्वरूप, आवश्यक उपाययोजना या मुद्दय़ाच्या आधारे करावा. यामध्ये पर्यावरणीय आघाताचे मूल्यमापन
(EIA) व कार्बन क्रेडिटस या संकल्पना व्यवस्थित समजून घ्याव्यात व त्यांचा वापर आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर कशा प्रकारे होतो हे समजून घ्यावे.
नैसर्गिक आपत्ती व त्यांचे उपप्रकार, त्यांची कारणे, तीव्रता मोजण्याची एकके, परिणाम, पूर्वसूचनेसाठीच्या प्रणाली इ. मुद्दे समजून घ्यावेत.
पर्यावरण संरक्षणाबाबत कायद्यांचा आढावा आघ्यायला हवा. यामध्ये महत्वाच्या व्याख्या, तांत्रिक मुद्दे, ठळक तरतुदी, शिक्षेच्या तरतुदी, अपवाद असे मुद्दे लक्षात घ्यावेत.
पर्यावरण संवर्धनात कार्यरत असलेल्या राज्य / राष्ट्र/ जागतिक पातळीवरील संस्था/ संघटना यांचा अभ्यास कार्यक्षेत्र, स्थापनेचे वर्ष, उद्देश, मुख्यालय, ब्रीदवाक्य, ठळक कार्ये, मिळालेले पुरस्कार, संघटनेकडून देण्यात येणारे पुरस्कार, सध्याचे अध्यक्ष, भारत सदस्य आहे किंवा कसे, असल्यास भारताची भूमिका या मुद्यांच्या आधारे करावा.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त ( Career-vrutantta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pre examination environmental factor ssub component environment detailed course issue wise preparation mpsc amy

ताज्या बातम्या