प्रोस्थेटिक्स आणि ऑर्थोटिक्स क्षेत्रांतील कामाचे स्वरूप, प्रशिक्षण संस्था आणि करिअर संधींचा घेतलेला वेध
गेल्या काही दशकांत औषधविज्ञान आणि अभियांत्रिकी विज्ञान शाखांतील ज्ञानाच्या संयुक्त वापराने जन्मजात व्यंग असलेल्या, गंभीर अपघाताने अपंगत्व आलेल्या तसेच एखाद्या आजाराच्या दुष्परिणामाने व्यंगत्व आलेल्या रुग्णांसाठी कृत्रिम अवयवांचा प्रभावी वापर सहजशक्य झालेला दिसून येतो. आरोग्यसेवा क्षेत्रातील ही व्यवसाय शाखा ‘प्रोस्थेटिक्स आणि ऑर्थोटिक्स’ म्हणून ओळखली जाते.
मेंदूशी संबंधित आजारात किंवा पाठीच्या, मानेच्या, हाता-पायांच्या स्नायूंना झालेल्या दुखापतीमुळे रुग्ण व्यक्तीच्या हालचालीवर बंधने येतात. अशा वेळी त्यांना पूर्वीप्रमाणेच सर्वसामान्य जगणे जगता यावे यासाठी प्रोस्थेटिक्स आणि ऑर्थोटिक्स क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती कार्यरत असतात. प्रत्यक्ष आजारावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने मूळ उपचार प्रक्रियेला साहाय्यभूत ठरतील असे उपचार करणे या क्षेत्रातील व्यावसायिकांकडून अपेक्षित असते.
प्रोस्थेसिस म्हणजे कृत्रिम अवयव. मुख्यत्वे करून कृत्रिम हात, पाय किंवा हातापायांना जोडणारे भाग किंवा कृत्रिम पाऊल, तळवा, मनगट वगरे. या विषयांतील तज्ज्ञ व्यावसायिकांना प्रोस्थेटिस्ट असे म्हणतात. ‘ऑर्थोसिस’ म्हणजे हातापायाच्या अशक्त, अधू स्नायूंना शरीराबाहेरून पुरेसा बळकटपणा देऊन हालचालीत सुरळीतपणा आणण्यासाठी वापरली जाणारी विविध उपकरणे किंवा आयुधे. अशी उपकरणे विविध प्रकारची असू शकतात. उदा. ब्रेसेस, विशिष्ट प्रकारच्या आरामदायी चपला इत्यादी.
या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती प्रशिक्षित आणि कुशल असणे गरजेचे असते. आपल्या देशात या प्रकारचे शिक्षण देणाऱ्या संस्था कार्यरत आहेत. येथून प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्तींना अस्थितज्ज्ञांच्या (ऑर्थोपेडिक्स) समन्वयाने काम करावे लागते.
भारतातील प्रोस्थेटिक्स आणि ऑर्थोटिक्स या कार्यक्षेत्राची गुणवत्ता जागतिक दर्जानुसार वृद्धिंगत करण्याच्या हेतूने द इंडिअन असोसिएशन ऑफ प्रोस्थेटिस्ट अॅण्ड ऑर्थोटिक्स या संस्थेची १९८७ साली स्थापना झाली. रिहॅबिलिएशन कौन्सिल ऑफ इंडिया, इंटरनॅशनल सोसायटी ऑफ प्रोस्थेटिक्स अॅण्ड ऑर्थोटिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने या संस्थेचे काम चालते. गरजू रुग्णांना वेळीच योग्य सल्ला आणि मदत मिळण्यासाठी प्रयत्न करणे आणि चुकीच्या उपचारांपासून रुग्णाचा बचाव करणे हे संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
साध्याशा प्लास्टिक आणि कार्बन संयुगापासून बनलेल्या वस्तू अपंग व्यक्तीला  मोठा आधार देऊ शकतात. अपंग व्यक्तीचे कृत्रिम अवयव तसेच हातापायांचे स्नायू अशक्त असलेल्या व्यक्तींसाठी वापरात येणारे कृत्रिम अवयव हे  मापानुसारच असावे लागतात.  
करिअर संधी
ऑर्थोटिक्स आणि प्रोस्थेटिक्स क्षेत्रातील करिअर आव्हानात्मक म्हणायला हवे. या क्षेत्रात काम करताना, आजारी किंवा अपंग व्यक्तींमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या स्वत:त दडलेल्या सर्जनात्मक शक्तीची ओळख या व्यावसायिकांना होत असते. आपल्या कामामुळे, गरजू व्यक्तींचे आयुष्य सुरळीत होण्यास मदत होते, ही भावनाच किती आनंददायी असते!
या क्षेत्रात आपल्याकडे नोकरीच्या अनेक संधी उपस्थित आहेत तसेच या क्षेत्रातील व्यावसायिकांनाही देशात भरपूर मागणी आहे. ऑर्थोटिक्स आणि प्रोस्थेटिस्टससंबंधित प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्ती स्वतंत्र व्यवसाय करू शकतात; सरकारी, खासगी रुग्णालयांत नोकरी संपादन करू शकतात. रुग्ण पुनर्वसन केंद्रांत, शुश्रूषागृहे, स्पेशालिटी रुग्णालये यात अशा प्रशिक्षित व्यक्तींसाठी रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध असतात. सद्य आकडेवारीनुसार, ऑर्थोटिक्स आणि प्रोस्थेटिक्स शिक्षणक्रम पूर्ण केलेल्या पदवीधारकांना १०० टक्के नोकरीची हमी असते. यातील बहुतेक उमेदवार याच क्षेत्रात कायमस्वरूपी व्यावसायिक होण्याचा मार्ग निवडतात.
तंत्रज्ञानाचा सहभाग
या क्षेत्रात प्रगत तंत्रज्ञान आणि विज्ञान यामुळे सातत्याने नावीन्यपूर्ण बदल होत आहेत. गरजू किंवा अपंग व्यक्तीला कमी श्रमात आणि लवकरात लवकर पूर्ववत जीवन जगता यावे यासाठी नित्यनवीन सुधारित उत्पादनांची निर्मिती होत असते. त्याबद्दल या क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींना संपूर्ण माहिती असणे आणि त्यांनी या माहितीचा उपयोग करणे अपेक्षित असते.
कृत्रिम अवयवांच्या निर्मितीप्रक्रियेत एरोस्पेस अॅप्लिकेशनसारख्या आधुनिक व प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. इलेक्ट्रॉनिक नी (इलेक्ट्रॉनिक गुडघे), कॉम्प्युटर इमेजिंग यांसारख्या अतिप्रगत तंत्रज्ञानाच्या वापराने या क्षेत्राच्या उपयोजन कक्षा खूपच रुंदावल्या आहेत. अलीकडे या क्षेत्रात कॉम्प्युटर एडेड डिझाइन आणि मॅन्युफॅक्चिरग तंत्रज्ञांनाचा मोठय़ा प्रमाणावर वापर होत आहे. यामुळे अचूक आरेखन किंवा साचांची नेमकी निर्मिती शक्य होते. शरीराच्या ज्या भागासाठी कृत्रिम अवयव बनवायचा आहे, त्याचे मोजमाप लेझर स्कॅिनगसारख्या तंत्राने करता येते. कॉम्प्युटरच्या साहाय्याने अधू भागाची मापे घेणे, कृत्रिम भागाचे आरेखन करणे आणि अॅटोमेटेड कार्वरच्या मदतीने कृत्रिम भागांची सुबक निर्मिती शक्य होते.
आजारी, अपंग व्यक्तीच्या शारीरिक गरजा ओळखून, त्याच्या दैनंदिन हालचाली सुरळीत व्हाव्यात या दृष्टीने कृत्रिम अवयव किंवा साहाय्यभूत उपकरणाची निर्मिती करू शकणारे आणि त्यांच्या सुयोग्य आणि परिणामकारक वापराचे प्रशिक्षण देऊ शकणारे प्रशिक्षित आणि अनुभवी प्रोस्थेटिस्ट आणि ऑर्थोटिक्स यांना वाढती मागणी आहे, हे युवावर्गाने लक्षात घ्यायला हवे.
प्रशिक्षणाचे स्वरूप
प्रोस्थेटिक्स विषयातील शिक्षणक्रमातून कृत्रिम हातापायाच्या रचना तयार करणे, दुखावलेल्या, अशक्त स्नायूंना बळकटी देणारी उपकरणे (ब्रेसेस) बनवणे, अशा प्रकारच्या गोष्टी शिकवल्या जातात. या प्रशिक्षित विद्यार्थ्यांना टेक्निशिअन, फिटर, पेडोर्थिस्ट अशा रोजगार संधी मिळू शकतात. बायोइंजिनीअिरग, बायोलॉजी या विषयांचे पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थी या शिक्षणक्रमांना प्रवेश घेऊ शकतात.
या क्षेत्रात प्रगती साधायची असेल, तर प्रशिक्षण काळापासूनच मेहनत, सराव गरजेचा ठरतो. कृत्रिम अवयव, त्यांचे प्रत्यक्ष जोडकाम या गोष्टी शिकण्यासाठी तासन्तास देण्याची तयारी असावी लागते. अशा प्रशिक्षित आणि निपुण उमेदवारांना या वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या आस्थापनांतून किंवा अपंग पुनर्वसन केंद्रांतून नोकरीच्या संधी उपलब्ध होतात.
प्रमुख शिक्षणसंस्था
या विषयातील शिक्षणक्रम राबविणाऱ्या भारतातील काही प्रमुख शिक्षणसंस्था खालीलप्रमाणे आहेत-
६ नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर ऑर्थोपेडिकली हँडिकॅप, कोलकाता. संकेतस्थळ http://www.nioh.in
६ इन्स्टिटय़ूट ऑफ फिजिकली हँडिकॅप, दिल्ली.
६ ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ फिजिकल मेडिसिन अँड रिहॅबिलिएशन, मुंबई
गीता कॅस्टेलिनो
geetacastelino@yahoo.co.in
अनुवाद –  गीता सोनी