आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड्समुळे गुणवान आणि महत्त्वाकांक्षी विद्यार्थ्यांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. गेल्या काही वर्षांत या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येवरून ते स्पष्ट होते. इतक्या वाढत्या संख्येने अर्ज दाखल होत असताना आपल्याकडे मात्र या परीक्षांकडे म्हणावे तितके लक्ष दिले जात नाही, असेही दिसून येते.
जागतिक पातळीवरील स्पर्धेचा भाग असलेली विज्ञान आणि गणितामधील ऑलिम्पियाड्स ही दरवर्षी वेगवेगळ्या शहरांत आयोजित केली जातात. १९८९ साली इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स ऑलिम्पियाडमध्ये भारत सहभागी झाला. पुढे असाच सहभाग पायाभूत विज्ञानासाठीच्या ‘नॅशनल ऑलिम्पियाड प्रोग्राम’मध्ये घेतला गेला. तेव्हापासूनच भारताने पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, खगोलशास्त्र आणि ज्युनियर सायन्स या विषयांवरील आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड्समध्ये सहभागी होण्याची सुरुवात केली.
ऑलिम्पियाड्सच्या पहिल्या पातळीचे आयोजन देशभरातील अनेक केंद्रांवर नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी आणि डिसेंबरच्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये केले जाते. पूर्वमहाविद्यालयीन पातळीवर देशात उपलब्ध असलेल्या या सर्वात आव्हानात्मक परीक्षा आहेत.
या परीक्षांचे स्वरूप आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड्सच्या उच्च शैक्षणिक पातळीवरील पातळीशी मिळतेजुळते असते. ऑलिम्पियाड म्हणजे प्रत्येक विषयासाठी पाच टप्प्यांच्या प्रक्रियेचे आयोजन असते. या परीक्षेचा पहिला टप्पा म्हणजे प्रादेशिक मॅथेमॅटिक्स ऑलिम्पियाड आणि पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, खगोलशास्त्र यासाठी वरिष्ठ पातळीवर आणि ज्युनियर सायन्ससाठी कनिष्ठ पातळीवरील राष्ट्रीय प्रमाण परीक्षा आहे. या टप्प्याचे आयोजन इंडियन असोसिएशन ऑफ फिजिक्स टीचर्स (आयएपीटी) द्वारा केले जाते. उर्वरित सर्व टप्प्यांचे आयोजन होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन (एचबीसीएसई) द्वारे केले जाते. प्रत्येक विषयात जवळपास ३०० विद्यार्थ्यांची निवड दुसऱ्या टप्प्याकरिता केली जाते. दुसरा टप्पा म्हणजे इंडियन नॅशनल ऑलिम्पियाड्स (आयएनओ) होय, जी प्रत्येक विषयाकरिता आयोजित केलेली लेखी परीक्षा असते जिचे आयोजन फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात केले जाते. लेखी परीक्षेनंतर प्रत्येक विषयात जवळपास ३० विद्यार्थ्यांची निवड तिसऱ्या टप्प्याकरिता होते, जो ओरिएंटेशन कम सिलेक्शन कँप (ओसीएससी) असतो. ओसीएससीनंतर ज्युनियर सायन्स वगळता पदार्थविज्ञानमधील पाच, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्रमधील प्रत्येकी चार आणि गणितामधील सहा विद्यार्थ्यांमधून १२ विद्यार्थी (सहा जणांच्या दोन टीम्स) प्री-डिपार्चर ट्रेिनग कॅम्प (पीडीटी) करिता निवडले जातात. हे विद्यार्थी अंतिम टप्प्यांत म्हणजे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड्समध्ये दाखल होतात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करतात.
या परीक्षांचे आयोजन करण्याचा मुख्य उद्देश गुणी विद्यार्थ्यांना हेरणे आणि त्यांना त्या विषयांत उच्च शिक्षण घेण्यासाठी आणि संशोधनात रस निर्माण करण्याकरिता प्रोत्साहित करणे, हा आहे. या परीक्षा विद्यार्थ्यांच्या मूलभूत विज्ञानाबद्दलचे ज्ञान, समस्येकडे बघण्याचा आणि तिचे निराकरण करण्याचा दृष्टिकोन, सारासार विचार, विचारांची सुस्पष्टता आणि उपकरणांचा वापर करण्याची पद्धत यांची परीक्षा घेतात.
भारतातील सद्यस्थितीतील ऑलिम्पियाड योजनेंतर्गत दिली जाणारी बक्षिसे / उत्तेजनपर पुरस्कार हे विषयांनुरूप बदलतात. परंतु, किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना (केव्हीपीवाय) फेलोशिप ही सर्व विषयांकरिता समान आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड्समध्ये भारतीय संघाचा भाग असलेले सदस्य विद्यार्थी विज्ञानात आपली कारकीर्द पुढे ठेवताना या फेलोशिपकरिता आपोआपच पात्र ठरतात. भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर (बीएआरसी) ने पदार्थविज्ञान आणि रसायनशास्त्र या विषयांसाठी देऊ केलेले प्रोत्साहनपर पुरस्कार या विद्यार्थ्यांच्या कारकिर्दीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. विज्ञानात आपली पदवी आणि पदव्युत्तर कारकीर्द घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना पाच वष्रे आधीच बीएआरसी ट्रेिनग स्कूलमध्ये प्रवेश दिला जातो. याशिवाय, वेगवेगळ्या विषयांतील पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांना भारत आणि परदेशातील वैज्ञानिकांबरोबर निसर्ग शिबिरे आणि प्रकल्पांना भेट देण्याची संधी मिळते. परदेशी विद्यापीठांमध्ये प्रवेश घेताना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड्समधील चांगली कामगिरी प्रवेश अर्जाकरिता लाभदायक ठरू शकते. इतर देशांतील लोकांकडूनदेखील आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडला ओळख मिळाली आहे आणि तिचे कौतुक केले जाते आहे, याचे हे लक्षण आहे.
ऑलिम्पियाड्समध्ये सहभागी होण्यापासून विद्यार्थी दूर राहण्याचे एक सर्वसाधारण कारण म्हणजे इंजिनीअरिंग किंवा वैद्यकीय प्रवेश परीक्षेत चांगले गुण मिळवणे या आपल्या मुख्य उद्दिष्टांपासून लक्ष विचलित होण्याची भीती अनेक विद्यार्थी-पालकांना वाटत असते. ऑलिम्पियाड्समध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या, पण घरामध्ये प्रोत्साहनपर वातावरण नसणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता ही परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची होऊन बसते. अशा परिस्थितीत हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की, ऑलिम्पियाड्समध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांमुळे विद्यार्थ्यांना विश्लेषणात्मक विचार करायची सवय जडते. ही सवय आयआयटी-जेईई किंवा इतर स्पर्धात्मक परीक्षांसाठी उपयुक्त ठरते. ऑलिम्पियाड्सकरिता तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पर्यायी पद्धत शोधणे आणि त्या पद्धतींना सिद्धांतामध्ये बदलण्याचे महत्त्व उमजू लागते. याशिवाय, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास आणि त्यांना भविष्यात काय करायचे आहे याबद्दलची तर्कसंगत विचारसरणी विकसित करण्यास मदत होते.
अशा परीक्षांकरिता योग्य दिशेने आणि योग्य वातावरणात मिळालेले मार्गदर्शन महत्त्वाचे ठरते. ऑलिम्पियाड्सकरिता तयारी करणे हा एक आनंददायी अनुभव असतो आणि त्यामुळे तात्काळ दिसणारे
व दीर्घकालीन असे अनेक लाभ होत असतात. तुम्ही या स्पर्धेचा किती गंभीरपणे विचार करीत आहात हे आधी निश्चित करा आणि त्यानुसार या परीक्षेची तयारी करा.
– मनोज शर्मा
उपाध्यक्ष, कामकाज आणि व्यापार विकास
रेझोनन्स एन्डय़ुवेन्चर्स प्रा. लिमिटेड
संग्रहित लेख, दिनांक 4th Feb 2013 रोजी प्रकाशित
ऑलिम्पियाड स्पर्धेत मिळतो गुणवत्तेला वाव
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड्समुळे गुणवान आणि महत्त्वाकांक्षी विद्यार्थ्यांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. गेल्या काही वर्षांत या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येवरून ते स्पष्ट होते. इतक्या वाढत्या संख्येने अर्ज दाखल होत असताना आपल्याकडे मात्र या परीक्षांकडे म्हणावे तितके लक्ष दिले जात नाही, असेही दिसून येते.
First published on: 04-02-2013 at 12:01 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Queality should recognize in olympiad competition