संशोधनाच्या पद्धती (रिसर्च मेथॉडॉलॉजी) हा विषय कुठल्याही व्यवसायाच्या उन्नतीसाठी अत्यावश्यक असतो. त्याविषयी..
कोणतीही व्यावसायिक संस्था चालवण्यासाठी व वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त असलेला विषय म्हणजे ‘संशोधनाच्या पद्धती’ (‘रिसर्च मेथड्स किंवा रिसर्च मेथॉडॉलॉजी). काही विद्यापीठांमधून याला बिझनेस रिसर्च मेथड्स असेही म्हटले जाते. तसेच हा विषय पहिल्या वर्षीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या सेमिस्टरमध्ये शिकवला जातो. या विषयाचा अभ्यास करताना काही वेळा विद्यार्थ्यांची भावना अशी असते की, या विषयाचा आम्हाला काय उपयोग? या विषयाकडे दुर्लक्ष होऊन फक्त परीक्षेत उत्तीर्ण होणे हेच उद्दिष्ट ठेवले जाते आणि त्यामुळे विषयाचा पाया कच्चा राहून पुढे करिअरमध्ये अडचणी येऊ शकतात. यामुळे असे लक्षात घ्यायला हवे की संशोधनाचा वापर हा प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे. व्यवस्थापनाच्या कोणत्याही विभागामधे, मग ते वित्तीय व्यवस्थापन (फायनान्शिअल मॅनेजमेंट) असो किंवा विपणन व्यवस्थापन (मार्केटिंग मॅनेजमेंट) असो अथवा इतर विभाग म्हणजे मनुष्यबळ विकास, उत्पादन व्यवस्थापन, संगणक विभाग इ. या प्रत्येक विभागामध्ये संशोधनाचे महत्त्व मोठय़ा प्रमाणावर आहे. व्यवस्थापनाला कोणताही निर्णय घ्यायचा असेल आणि जर तो संशोधनावर आधारित असेल तर तो चुकण्याची शक्यता कमी असते. मार्केटिंगमधे ग्राहकाचे मानसशास्त्र, जाहिरातींचा परिणाम अशा अनेक महत्त्वाच्या विषयांत संशोधनाचा उपयोग होतो. तसेच वित्तीय संदर्भात कंपन्यांची नफा मिळवण्याची क्षमता, उत्पादन, इतर खर्च कमी करण्याचे उपाय या आणि इतर अनेक महत्त्वाच्या विषयांवर संशोधन करून योग्य निर्णय घेता येतात. संशोधन हा व्यवस्थापनाचा एक अविभाज्य घटक आहे. त्या दृष्टीनेच या विषयाकडे पाहणे उचित ठरेल.
संशोधन कसे करावे हेही समजणे गरजेचे ठरते. कोणत्याही विषयामधे संशोधन करताना ते शास्त्रीय पद्धतीने केले तरच त्याचा उपयोग होतो. अन्यथा चुकीच्या पद्धतीवर आधारलेल्या संशोधनातून चुकीचे निष्कर्ष निघतात व त्याचा लाभ कोणालाच होत नाही. म्हणून संशोधन करण्याची पद्धत व प्रक्रिया नीट समजून घ्यायला हवी. संशोधनाची प्रक्रिया ही या विषयाचा गाभा आहे. सांख्यिकी संशोधन, गुणात्मक संशोधन, मूलभूत संशोधन तसेच संबंधित संशोधन आणि इतर प्रकार हे संशोधनाचे वेगवेगळे प्रकार आहेत.
संशोधनाच्या प्रक्रियेचा सुरवातीचा भाग म्हणजे ज्या प्रश्नावर संशोधन करायचे तो प्रश्नच मुळात समजायला हवा. उदा. एखाद्या संस्थेमध्ये कामगारांची उत्पादकता कमी होणे हा एक प्रश्न असेल किंवा एखाद्याला रिस्क  मॅनेजमेंट या विभागामध्ये एखादा प्रश्न दिसेल. म्हणजेच आपण कोणत्या प्रश्नावर संशोधन करणार आहोत याविषयी स्पष्ट कल्पना असणे गरजेचे आहे. एम.बी.ए.च्या अभ्यासक्रमामध्ये ज्या वेळी प्रकल्प अहवाल  तयार केला जातो, त्या वेळीसुद्धा आपण ज्या कंपनीमध्ये प्रकल्प करणार आहोत त्यामध्ये कोणता प्रश्न आहे हे समजायला हवे.
एकदा प्रश्न समजला की संशोधनाचे उद्दिष्ट किंवा उद्दिष्टे  निश्चित करणे सोपे जाते. अर्थात यामधला महत्त्वाचा भाग असा की उद्दिष्टे निश्चित करण्यापूर्वी आपण संशोधन करणार असलेल्या प्रश्नावर याआधी कुणी संशोधन केले आहे का, याचा आढावा घेणे गरजेचे आहे. यालाच ‘रिव्ह्य़ू ऑफ लिटरेचर’ असे म्हणतात. अगोदरच्या संशोधनाचा आढावा घेण्यामागे असा उद्देश आहे की, यामुळे आधीच्या संशोधनाची माहिती मिळते व कोणत्या बाबींवर संशोधन झालेले नाही, हेही समजते. यामुळे आपल्या संशोधनाची उद्दिष्टे काय असावीत हे निश्चित करता येते. यामुळे संबंधित विषयावर प्रकाशित झालेले शोधनिबंध, इतर लेख, पीएच.डी.चे प्रबंध इ. अनेक मार्गाचा वापर करून आधीच्या संशोधनाचा आढावा घेता येतो आणि संशोधन न झालेल्या विभागावर लक्ष केंद्रित करून संशोधनाची उद्दिष्टे ठरवता येतात.
संशोधनाची उद्दिष्टे ठरवणे हा संपूर्ण संशोधन प्रक्रियेतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. आपण काय करणार आहोत, हे स्पष्टपणे समजायला हवे. यामुळे संशोधनाला दिशा मिळते. उद्दिष्टे ही स्पष्ट शब्दांमध्ये असायला हवीत आणि उद्दिष्टांची लांबलचक यादी न बनवता, मोजकीच उद्दिष्टे ठेवायला हवीत. उद्दिष्टे निश्चित करताना, ती आपण गाठू शकू किंवा नाही याचाही विचार करायला हवा. संशोधनाच्या शेवटी उद्दिष्टे व निष्कर्ष याचा संबंध स्पष्ट करता यायला हवा. यामुळेच उद्दिष्टे निश्चित करणे महत्त्वाचे ठरते.
अनेक संशोधन प्रकल्पांमध्ये उद्दिष्टांवर आधारित गृहीतके ठरवली जातात. यामागचा मुख्य उद्देश म्हणजे संशोधनाला सुरुवात कशी करावी, यासंबंधीचे मार्गदर्शन मिळते. संशोधनाला सुरुवात करताना काही गोष्टी गृहीत धरल्या जातात आणि त्याप्रमाणे गृहीत वाक्य (स्टेटमेंट ऑफ हायपोथिसिस) तयार केले जाते. उदा. आर्थिक साक्षरतेमुळे आर्थिक समावेशकता (फायनान्शिअल इन्क्लुजन) वाढते, हे एक गृहीतक आहे. संशोधन करून हे गृहीत वाक्य हे सिद्ध होत आहे की नाही, हे पाहता येते. यासाठी आवश्यक ती माहिती गोळा केली जाते. कारण संशोधनामध्ये एखादी गोष्ट प्रत्यक्ष सिद्ध करणे म्हणजेच पुरावा गोळा करून सिद्ध करणे हे जरुरीचे आहे. यासाठी संशंोधन करताना माहिती गोळा केली पाहिजे. (कलेक्शन ऑफ इन्फ र्मेशन) माहिती कोणाकडून गोळा करायची व कोणती माहिती गोळा करायची तसेच माहिती गोळा करण्यासाठी कोणत्या मार्गाचा वापर करायचा या तीनही प्रश्नांना उत्तरे द्यावी लागतात.
माहिती गोळा करताना सर्वप्रथम कोणाकडून माहिती गोळा करायची हे आधी निश्चित करायला हवे. जर आवश्यक असेल तर नमुना सर्वेक्षण हा प्रकार वापरला पाहिजे. उदा. जर संशोधन करताना, ज्यांच्याकडून माहिती गोळा करायची त्यांची संख्या मोठी असेल तर त्यांच्यापैकी निवडक अशा नमुन्याची पाहणी करून निष्कर्ष काढता येतात. अर्थात असे ‘सॅम्पल’ निश्चित करण्याच्या शास्त्रीय पद्धती आहेत. या शास्त्रीय पद्धतींचा वापर करून, नमुना निवडण्यातील चुका कमी करता येतात. यानंतर माहिती मिळवण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाचा वापर करावा लागतो. यामध्ये मुख्यत: जी माहिती अगोदरच प्रसिद्ध झाली आहे, अशा पद्धती (सेकंडरी सोर्सेस) व स्वत: गोळा केलेली माहिती (प्रायमरी सोर्सेस) असे दोन भाग पडतात. माहिती स्वत: गोळा करताना प्रश्नावली (क्वेश्चनायर) तयार करणे जरुरीचे आहे. प्रश्नावली तयार करताना प्रश्नांची संख्या ही मोजकीच असावी म्हणजे उत्तरे देणाऱ्याला सोपे जाईल. प्रश्नावलीमध्ये कोणते प्रश्न असावेत, हे संशोधनाच्या उद्दिष्टांवरून ठरवले पाहिजे.
माहिती जमा झाल्यानंतर तिचे पृथ:करण (अ‍ॅनलिसिस) करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात. उदा. टेबल्स तयार करणे, सरासरी काढणे, इतर संख्याशास्त्रीय पद्धतीचा वापर करणे इ. यानंतर आपण धरलेली गृहीतके ही स्वीकारता येतात किंवा नाही. (अ‍ॅक्सेप्टन्स ऑफ हायपोथिसिस) हे ठरवण्यासाठी अनेक संख्याशास्त्रीय चाचण्या उपलब्ध आहेत. आपल्या संशोधनासाठी नेमकी कोणती चाचणी वापरावी हे माहिती करून घेऊन त्याप्रमाणे गृहीतके तपासता येतात.
यानंतर संशोधनाची निष्कर्षे मांडता येतात. आपण संशोधन करून नक्की काय शोधून काढले व त्याचा उपयोग काय होईल हे मांडले पाहिजे. यामध्ये महत्त्वाचा भाग म्हणजे आपली उद्दिष्टे, गृहीतके व निष्कर्ष यामधे संबंध दाखवता यायला हवा. संशोधनामध्ये वेगवेगळ्या टप्प्यांवर सांख्यिकी पद्धतीचा वापर करावा लागतो यासाठी या पद्धतींची व तज्ज्ञांची माहिती करून घ्यावी.
एम.बी.ए.चा अभ्यासक्रम करताना, प्रोजेक्ट रिपोर्टव्यतिरिक्त एखादा छोटा संशोधन प्रकल्प पूर्ण करता आला तर संशोधन प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव येऊन विषय समजण्यास सोपा जाईल.
nmvechalekar@yahoo.co.in

priya bapat reacts on not having baby
लग्नाला १३ वर्षे होऊनही बाळ नाही, प्रिया बापट म्हणाली, “ज्यांना मुलं नकोयत…”
vasai liquor party on boat marathi news, roro boat liquor party marathi news
वसई-भाईंदर रोरो सेवेच्या बोटीत मद्य पार्टी, समाजमाध्यमांवर चित्रफित प्रसारित
Silent Features of indian constitution In Marathi
UPSC-MPSC : भारतीय राज्यघटनेची ‘ही’ ठळक वैशिष्ट्ये माहिती आहेत का? वाचा…
कामगार चळवळ- काय केले पाहिजे?