शिक्षकांसाठी असलेल्या ‘टीचिंग एक्सलन्स अॅण्ड अचिव्हमेन्ट प्रोग्राम’ (TEA) या अमेरिकन सरकारच्या फेलोशिपअंतर्गत गतवर्षी ३१ जानेवारी ते २५ मार्च या कालावधीत मला प्रत्यक्ष अमेरिकेत जायची संधी मिळाली. या प्रोग्रॅमचं यजमानपद अमेरिकेतील कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटी, जॉर्ज मेसन युनिव्हर्सिटी, मोन्ताना स्टेट युनिव्हर्सिटी आणि विन्थ्रॉप युनिव्हर्सिटीया नामांकित विद्यापीठांनी स्वीकारले होते. आम्हा सर्व शिक्षकांची चार गटांत विभागणी होऊन या चार विद्यापीठांत आम्हांला फेलोशिप प्रोग्रॅमसाठी पाठवले होते. मला कॅलिफोर्निया राज्यातल्या कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटी, चिको इथे जायची संधी मिळाली. या युनिव्हर्सिटीत आम्हाला अमेरिकेतील माध्यमिक शिक्षण, अध्यापन पध्दती, अध्यापनात तंत्रज्ञानाचा उपयोग, पाठ नियोजन, शिक्षकांच्या नेतृत्वक्षमतांत वाढ या विषयांवर प्रामुख्याने प्रशिक्षण मिळाले. प्रशिक्षणकाळात कॅलिफोर्नियातील चिको, सॅक्रमॅन्टो, हॅमिल्टन सिटी, सॅनफ्रान्सिस्को, ओरोविल इथल्या शाळांना भेटी देता आल्या. या भेटींत ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही प्रकारच्या शाळांचा समावेश होता. विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, व्यवस्थापन यांच्याबरोबर सुसंवाद करता आला. चिको या विद्यापीठ नगरीपासून १० मलांवर असलेल्या हॅमिल्टन हायस्कूलमध्ये दोन आठवडे इंटर्नशिप करण्याची संधी मला मिळाली. या फेलोशिपच्या निमित्ताने अमेरिकेतील माध्यमिक शिक्षण जवळून अभ्यासता आलं.
अमेरिकेत शिक्षणाचे विकेंद्रीकरण झाले आहे. त्यामुळे शिक्षणविषयक धोरण ठरवणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे या बाबत राज्य सरकारांना स्वायत्तता दिली आहे. मात्र, असे धोरण निश्चित करताना अमेरिकेच्या घटनेची पायमल्ली होणार नाही याची काळजी घेणे राज्य सरकारांना बंधनकारक आहे. शिक्षणविषयक सर्व कायदे मंजूर करण्याचा अधिकार अमेरिकन काँग्रेसला असून त्यांनी आतापर्यंत असे अनेक कायदे मंजूर केले आहेत. काँग्रेसने मंजूर केलेल्या सर्व शिक्षणविषयक कायद्यांची अंमलबजावणी करण्याचे काम अमेरिकेचे ‘स्टेट डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशन’ करते. अभ्यासक्रम ठरवण्याचे आणि तो तयार करण्याचे काम राज्य सरकारांच्या शिक्षण विभागाकडे असते. अभ्यासक्रमाची अमंलबजावणी, शिक्षक प्रशिक्षणाची जबाबदारी स्थानिक शाळा मंडळाकडे असते.
प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणासाठी उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या एकूण निधीपकी ९० टक्के निधी हा राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाकडून तर १० टक्के निधी फेडरल गव्हर्नमेंटकडून उपलब्ध करून दिला जातो. अमेरिकेत एकूण राष्ट्रीय उत्पन्नापकी आठ टक्के इतका खर्च शिक्षणावर केला जातो. देशात जवळपास ९९ टक्के लोक साक्षर आहेत. अमेरिकेत शालेय शिक्षण हे सर्वाना मोफत आणि सक्तीचे आहे.
अमेरिकेत माध्यमिक स्तरावरचे शिक्षण देण्यासाठी पब्लिक स्कूल्स, खासगी शाळा, चार्टर स्कूल्स, होम स्कूलिंग, मॅग्नेट स्कूल्स या पाच प्रकारच्या शाळा आहेत.
पब्लिक स्कूल्स या जरी सरकारी असल्या तरी अशा शाळांत खासगी शाळांसारख्याच सर्व सोयी सुविधा असतात. या शाळांवर संघ शासन (फेडरल गव्हर्नमेंट), राज्य शासन आणि स्थानिक मंडळाचे नियंत्रण असते. संघ शासन, राज्य शासन आणि स्थानिक मालमत्ता करातून मिळणाऱ्या उत्पन्नातून या शाळांना आर्थिक सहाय्य केले जाते. शासनाने ठरवून दिलेल्या अभ्यासक्रम आराखडय़ाची अंमलबजावणी करणे या शाळांना बंधनकारक असते. या शाळांतून विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाते.
फेडरल गव्हर्नमेंट आणि राज्य शासनाच्या मदतीशिवाय खासगी शाळा चालतात. या शाळा आपला निधी स्वतंत्रपणे उभा करतात. या शाळांवर स्थानिक मंडळ देखरेख ठेवण्याचे काम करते. विद्यार्थ्यांना शिकवणी शुल्क भरावे लागते. खासगी शाळांपकी बहुतांश शाळा या चर्च अथवा धार्मिक संस्थाकडून चालवल्या जातात.
चार्टर स्कूल्स प्रकारच्या शाळांचे चालक आणि शासन यांच्यात चार्टर (करार) झालेला असतो. त्या करारानुसार या शाळांना काम करणे बंधनकारक असतं. सरकारी शाळांच्या तुलनेत या शाळांना अधिक स्वायत्तता असते. विद्यार्थ्यांच्या विशेष गरजांची पूर्तता करण्याच्या हेतूने अशा शाळांची स्थापना केली आहे. शाळेत प्रवेश देताना विद्यार्थी निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य या शाळांना असते. या शाळा स्वत:चा अभ्यासक्रम स्वत: ठरवतात. विद्यार्थ्यांसाठीची मार्गदर्शक तत्वे ठरवण्याचा पूर्ण अधिकार या शाळांना देण्यात आला आहे. या शाळांवर स्थानिक मंडळाचे नियंत्रण असते. या शाळांत विविध उपक्रम राबवले जात असल्याने अशा शाळांची ओळख उपक्रमशील शाळा अशी आहे.
संबंध अमेरिकेत होम स्कूलिंग या प्रकारच्या शाळाही मोठय़ा प्रमाणात आहेत. विशेष शिक्षक अथवा तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या मदतीने मुले घरच्या घरीच अशा शाळांचा अभ्यासक्रम पूर्ण करतात. परीक्षांच्या काळात विद्यार्थी शाळांत जातात. परीक्षेत उत्तीर्ण होऊन हे विद्यार्थी पुढच्या इयत्तेत दाखल होतात.
मॅग्नेट स्कूल्स या शाळांनी त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण अभ्यासक्रमामुळे आपले वेगळेपण सिध्द केले आहे. या शाळा सरकारी शाळा या प्रकारांत येतात. अतिशय प्रतिभावंत आणि हुशार मुलांसाठी या शाळांची स्थापना करण्यात आली आहे. विशेषत विज्ञान आणि परफॉर्मिंग आर्टस्मध्ये कल असलेल्या मुलांना या शाळांत प्रवेश मिळतो. अभ्यासक्रमाची पातळी उच्च आणि कठीण असते.
अमेरिकन शिक्षणपध्दतीचे महत्वाचे वैशिष्टय़ म्हणजे इथे सैद्धान्तिक शिक्षणापेक्षा प्रयोगांवर जास्त भर दिला जातो. अध्ययन आणि अध्यापन प्रक्रिया प्रभावी होण्यासाठी अमेरिकन शिक्षक आपल्या अध्यापनात तंत्रज्ञानाचा मोठय़ा प्रमाणावर उपयोग करतात. अमेरिकन शिक्षक हे टेक्नोसॅव्ही असल्याने अध्यापनात स्मार्ट बोर्ड, व्हाईट बोर्ड, कॉम्प्युटर, ओव्हर हेड प्रोजेक्टर, डॉक्युमेंट कॅमेरा अशा साधनांचा वापर करतात. या बरोबरच वादविवाद, गट चर्चा, प्रश्न मंजूषा, नाटय़करण, खेळ, क्षेत्रभेट, प्रकल्प, गटकार्य, वैयक्तिक आणि गटाचं सादरीकरण इत्यादी तंत्रांचा वापर करतात.
या शाळांतील प्रत्येक वर्गात दूरध्वनी सेवा आहे. त्यामुळे विद्यार्थी अथवा शिक्षकांबरोबर थेट संपर्क साधला जातो. कोणाला कार्यालय अथवा मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये बोलवायचे झाल्यास या सेवेचा उपयोग केला जातो.
विद्यार्थी आणि शिक्षकांना काही सूचना अथवा माहिती सांगायची झाल्यास साऊंड सिस्टिमचा उपायोग केला जातो. शाळांचे कामकाज सुरू झाल्याबरोबर शाळेचे मुख्याध्यापक सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतात. त्यानंतर दिवसभरात होणाऱ्या काही महत्वाच्या घडामोडींची माहिती स्वत: मुख्याध्यापक माईकवरून मुलांना सांगतात.
मुलं वर्गात जेव्हा गणिते सोडवणे, निबंध लिहिणे यांसारख्या काही कृती करत असतात, त्यावेळी वर्गात मंद आवाजात संगीत सुरू असते. त्यामुळे तासिका मोठी असली तरी मुले कंटाळत नाहीत.
विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी शाळांमध्ये ‘स्पेशल एज्युकेशन प्रोग्रॅम’ राबवला जातो. या मुलांना जीवनकौशल्यांचे शिक्षण दिले जाते. कुकींग, फोटोग्राफी, इत्यादी विषयांचे शिक्षण मुलांना इथे मिळते. याबरोबरच विदयार्थ्यांचे संवादकौशल्य सुधारण्यासाठी व्यक्तिमत्व विकासाशी संबंधित बाबींवर भर दिला जातो.
अमेरिकेतील शिक्षक वर्षभरातील जवळपास ६० टक्के काम गटकार्याच्या स्वरूपात करतात. विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करताना लेखी आणि तोंडी परीक्षेबरोबरच विविध उपक्रमांतला विद्यार्थी सहभाग, प्रकल्प, वैयक्तिक सादरीकरण, विद्यार्थ्यांच्या वर्गमित्रांनी त्याचे केलेले मूल्यमापन या गोष्टीनांही महत्व दिले जाते. शैक्षणिक वर्षांच्या सुरूवातीलाच मुले वर्गात आल्यानंतर त्याची गणित आणि भाषा विषयाची पूर्वचाचणी घेतली जाते. त्यातून मुलाची प्रगती समजायला मदत होते. निकाल अपेक्षेप्रमाणे लागला नाही तर अशा विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन केले जाते.
(क्रमश:)
संग्रहित लेख, दिनांक 20th May 2013 रोजी प्रकाशित
अमेरिकेतील शालेय शिक्षण
शिक्षकांसाठी असलेल्या ‘टीचिंग एक्सलन्स अॅण्ड अचिव्हमेन्ट प्रोग्राम’ (TEA) या अमेरिकन सरकारच्या फेलोशिपअंतर्गत गतवर्षी ३१ जानेवारी ते २५ मार्च या कालावधीत मला प्रत्यक्ष अमेरिकेत जायची संधी मिळाली. या प्रोग्रॅमचं यजमानपद अमेरिकेतील कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटी, जॉर्ज मेसन युनिव्हर्सिटी, मोन्ताना स्टेट युनिव्हर्सिटी आणि विन्थ्रॉप युनिव्हर्सिटीया नामांकित विद्यापीठांनी स्वीकारले होते.
First published on: 20-05-2013 at 12:54 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: School education in america