यावर्षी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी परीक्षेसाठी पूर्वपरीक्षा रविवार, २६ मे रोजी आहे. परीक्षेत यशस्वी होण्याच्या दृष्टीने ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची ठरते, कारण यात यशस्वी झाल्याखेरीज मुख्य परीक्षेला बसता येत नाही. जे विद्यार्थी वर्षभरापासून या परीक्षेची तयारी करीत आहेत, त्यांच्यासाठी हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा व निर्णायक असतो. यात अपयशी ठरल्यास पुन्हा वर्षभर पुढच्या परीक्षेची वाट पाहावी लागते. बऱ्याच वेळा काही विद्यार्थ्यांचा अभ्यास चांगला असतो, मात्र परीक्षेच्या शेवटच्या टप्प्यात त्यांना परीक्षेचे प्रचंड दडपण येते व परीक्षेच्या दिवशी हा ताण असह्य़ होऊन विद्यार्थी अपयशी ठरतात. हे टाळण्यासाठी पुढील गोष्टी लक्षात ठेवा-
बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांचा अभ्यास उत्तम झालेला असतो, मात्र जसजशी परीक्षा जवळ येते तसतसे आपल्याला काही आठवत नाही, अशी भावना त्यांच्या मनात बळावते. हे अनेक विद्यार्थ्यांच्या बाबतीत होते. लक्षात ठेवा, पूर्वपरीक्षा ही बहुपर्यायी वस्तुनिष्ठ या प्रकारची असते. उत्तरे तुमच्या समोरच असतात. त्यापकी फक्त योग्य उत्तराची निवड करायची असते, म्हणून परीक्षेत काही आठवणारच नाही, असे होत नाही. परीक्षेच्या शेवटच्या टप्प्यात किंबहुना परीक्षा देतानाही विद्यार्थ्यांनी सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे. ‘मी वर्षभर अभ्यास केला आहे. त्यामुळे मी यशस्वी होणारच,’ या भावनेतूनच आपण परीक्षेला सामोरे जाणे आवश्यक आहे. याचे कारण जरासाही नकारार्थी विचार विद्यार्थ्यांच्या मनात डोकावला तरी अंतिम क्षणी त्यांच्या योग्य क्षमतेचे सादरीकरण करण्यास ते अयशस्वी ठरू शकतात.
आता परीक्षेसाठी सहा दिवसच शिल्लक राहिले आहेत. या कालावधीत अभ्यासाचे कोणतेही नवीन पुस्तक अथवा मित्राने दिलेल्या नवीन नोट्स वाचू नका. तुम्ही जे वर्षभर वाचले असेल. ज्या नोट्स तयार केल्या असतील फक्त त्याचीच उजळणी करा, त्याचे थोडे चिंतन, मनन करा. या काळात जास्तीत जास्त बहुपर्यायी प्रश्न सोडविण्यावर भर द्या, म्हणजे परीक्षेबाबत तुमची भीती कमी होईल. परीक्षेच्या दृष्टीने हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे, म्हणून आरोग्याची काळजी घ्या. या कालावधीत पुरेशी झोप घ्या. आपल्या शरीराला सहा तास झोपेची आवश्यकता असते. परीक्षेच्या काळात आजारी पडल्यास वर्षभर तुम्ही केलेल्या मेहनतीवर पाणी फिरू शकते. म्हणून या काळात आरोग्याची काळजी घेणे तेवढेच आवश्यक आहे.
जर परीक्षा केंद्र आपल्या शहरात नसेल (मुंबई, नागपूर, औरंगाबाद), तर शक्यतो एक दिवस आधीच परीक्षा केंद्रावर जाऊन आपला क्रमांक कोणत्या ठिकाणी आला आहे, याची खात्री करून घ्यावी, नाही तर परीक्षेच्या दिवशीच धावपळ होऊ शकते. शक्यतो परीक्षेच्या आदल्या दिवशी काही वाचू नये. काही विद्यार्थी परीक्षेच्या आदल्या रात्री रात्रभर जागरण करतात व संपूर्ण अभ्यासाला उजळणी देण्याचा प्रयत्न करतात. जो अभ्यासक्रम वर्षभर पूर्ण झालेला नसतो, तो रात्रीत कसा पूर्ण होईल हेच न उलगडलेले कोडे आहे. कदाचित जुन्या अभ्यासक्रमात जेव्हा पूर्वपरीक्षेला एक वैकल्पिक विषय घ्यावा लागत असे, तेव्हा वैकल्पिक विषयाची उजळणी देण्यासाठी काही विद्यार्थी रात्रभर जागरण करून दुसऱ्या दिवशी पेपर देत असत. तेव्हा कदाचित या पद्धतीचा काही विद्यार्थ्यांना लाभ झालाही असेल, मात्र गेल्या दोन वर्षांपासून जो अभ्यासक्रम बदलला, त्यात वैकल्पिक विषयाऐवजी २०० मार्क्सचा सी सॅट-२ पेपर आल्याने अशा परिस्थितीत परीक्षेच्या आदल्या रात्री जागरण करणे चुकीचे ठरते. कारण सी सॅट-१ पेपरचा आवाका इतका मोठा आहे की, त्याची उजळणी एका रात्रीत होणे शक्य नाही. तसेच सी सॅट-२ साठी तुम्ही जेवढे शांत व प्रसन्न असाल तेवढय़ा सहजतेने हा पेपर तुम्ही सोडवू शकता.
परीक्षेच्या दिवशी शक्यतो तासभर आधीच परीक्षा केंद्रावर पोहोचण्याचा प्रयत्न करावा. परीक्षा केंद्रावर जाऊन थोडा वेळ शांत मनाने बसावे. त्या दरम्यान नोट्स किंवा एखादे पुस्तक वाचल्याने काहीच फायदा होत नाही.
परीक्षा हॉलमध्ये काही नेण्यास परवानगी नसते, म्हणून आपला मोबाइल शक्यतो घरी ठेवून यावा, नाही तर परीक्षक आपणास मोबाइल पुढे ठेवण्यास सांगतो. मग आपले लक्ष मोबाइलची सुरक्षितता व प्रश्नपत्रिका यामध्ये विभागले जाते. म्हणून मोबाइल परीक्षा केंद्रावर आणूच नये. हॉलमध्ये शिरल्यानंतर शांतपणे आपल्या जागेवर बसावे. पेपर हातात मिळाल्यानंतर उत्तर पत्रिकेवर आपला रोल नंबर व्यवस्थित लिहावा. हा क्रमांक लिहिताना काळजी घ्यावी, कारण जर क्रमांक लिहिताना चूक झाली तर ती सुधारता येत नाही. व्हाइटनर लावून क्रमांक पुन्हा लिहू नये, कारण व्हाइटनरवर आपला नंबर लिहिला असेल तर काम्प्युटर सिस्टीम ते स्वीकारत नाही. शक्यतो नंबर लिहिताना चूक होऊ देऊ नये. जर झालीच तर परीक्षकांना ती दाखवून त्यासंदर्भात त्यांची मदत घ्यावी.
सी-सॅट पेपर १ सोडविताना :
पेपर सोडवताना पहिला अर्धा तास अत्यंत महत्त्वाचा असतो. वाटल्यास त्यास ‘सोनेरी कालावधी’ म्हणू शकतात. या काळात शांत मनाने जास्तीत जास्त अचूक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा. बऱ्याच वेळा प्रश्नपत्रिकेच्या संचाची अशी रचना केलेली असते की, सुरुवातीला अवघड प्रश्न असतात व नंतर तुलनेने सोपे प्रश्न असतात. म्हणून सुरुवातीचे प्रश्न अवघड वाटल्यास त्यावर विचार करण्यात जास्त वेळ न घालवता पुढच्या प्रश्नावर जावे. काही विद्यार्थी प्रश्नपत्रिकेवरच प्रथम मार्किंग करून ठेवतात व नंतर शेवटच्या १० मिनिटांत उत्तरपत्रिकेवर ती उत्तरे नमूद करतात. ही पद्धत अत्यंत चुकीची आहे, कारण शेवटच्या १० मिनिटांत तुम्ही उत्तरपत्रिकेत उत्तर लिहिताना किंवा योग्य पर्यायावर काळ्या बॉलपेनने काळे करण्यात चूक झाली किंवा क्रम चुकला तर तुमची सर्व उत्तरे चुकू शकतात. परीक्षेच्या शेवटच्या १० मिनिटांत विद्यार्थी प्रचंड तणावाखाली असतात. म्हणून शक्यतो प्रश्न सोडवल्यानंतर लगेच उत्तरपत्रिकेवर त्याच क्रमांकाच्या प्रश्नावर जाऊन योग्य पर्याय नमूद करणे संयुक्तिक ठरते. यामुळे शेवटच्या क्षणी होणाऱ्या अक्षम्य चुका टाळता येतील. यू.पी.एस.सी. परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग १/३ आहे. म्हणजे तीन प्रश्नांची चुकीची उत्तरे लिहिल्यास एका प्रश्नाचे गुण कमी होतात. जर आपण एखाद्या प्रश्नाचे उत्तर लिहिले नसेल, त्यास मात्र निगेटिव्ह मार्किंग लागू पडत नाही. निगेटिव्ह मार्किंगमध्ये ज्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला नक्की माहीत असतील, त्याच प्रश्नांची उत्तरे द्यावीत.
पेपर १ मध्ये किती प्रश्न सोडवावेत?
हा प्रश्न नेहमीच विद्यार्थ्यांना पडलेला असतो. पेपर १ किंवा पेपर २ मधील किती प्रश्न सोडवावेत, याबाबत काही निश्चित नियम नाही. मात्र स्वत:च्या अनुभवावरून व यशस्वी विद्यार्थ्यांच्या अनुभवावरून साधारणत: पेपर १ मध्ये किमान ५५ ते ६० प्रश्न अचूक सोडवल्यास तुम्हांला मुख्य परीक्षेत संधी मिळू शकते. शक्यतो सर्व प्रश्न सोडविण्याचा अट्टहास करू नये. प्रश्नांची अचूक उत्तरे माहीत असतील तितकेच प्रश्न सोडवावेत. प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची साधारणत: विभागणी आपण तीन प्रकारे करू शकतो- १. ज्यांची उत्तरे आपल्याला निश्चित माहीत आहेत. असे प्रश्न व्यवस्थित वाचून उत्तरपत्रिकेवर काळ्या बॉलपेनने नि:शंकपणे काळे करावे. २. ज्यांच्या दोन पर्यायांबाबत तुमची नक्की खात्री आहे की, या प्रश्नाचे उत्तर चार पर्यायांपकी या दोन पर्यायातूनच आहे, उरलेल्या दोन पर्यायातून उत्तर नक्कीच नाही, अशा प्रश्नांच्याबाबत थोडासा धोका तुम्ही पत्करू शकता. ३. ज्यांच्या पर्यायांपकी एकही पर्याय तुम्हांला ओळखीचा वाटत नाही किंवा एखादा पर्याय तुम्हांला ओळखीचा वाटतो. अशा प्रश्नांबाबत अजिबात धोका पत्करू नये. अशा प्रश्नांची उत्तरे देऊ नयेत, असे प्रश्न अनुत्तरितच ठेवावेत.
ज्या प्रश्नांची उत्तरे नक्की माहीत नाही, अशा प्रश्नांसमोर प्रश्नपत्रिकेवर फुली मारून ठेवावी. ते प्रश्न पुन्हा परत येऊन वाचण्याचा प्रयत्न करू नये, कारण एकदा न आलेले उत्तर पुढच्यावेळी आठवण्याची शक्यता कमी असते व प्रश्न वाचण्यात वेळ जाण्याची शक्यता जास्त असते. ज्या प्रश्नांच्या दोन पर्यायांबाबत थोडी साशंकता असते, त्या प्रश्नांभोवती गोल करून, प्रश्नपत्रिकेवरच तुमच्या अंदाजे उत्तरावर मार्क करून ठेवावा, म्हणजे शेवटी वेळ जर अगदीच कमी असेल तर प्रश्नपत्रिकेवर मार्क केलेल्या उत्तरावरून अंतिम उत्तर लिहिण्यासाठी तुमचा वेळ जाणार नाही.
वेळ संपण्याच्याआधी १० मिनिटे एक वॉर्निग बेल होते, त्यावेळी बरेच विद्यार्थी जर जास्त प्रश्न राहिले असतील तर अंदाजे उत्तरपत्रिकेवर काळे करत सुटतात आणि हा प्रकार तोपर्यंत सुरू राहतो, जोपर्यंत परीक्षक आपल्या हातून पेपर घेत नाही. या प्रकारामुळे अनेक विद्यार्थी आतापर्यंत नापास झाले आहेत. त्यामुळे वॉर्निग बेल झाल्यानंतर जेवढे अचूक सोडवले असतील तेवढय़ावर थांबून ज्या प्रश्नांना तुम्ही प्रश्नपत्रिकेत गोल केला आहे (म्हणजे ज्यांच्या उत्तराबाबत तुमच्या मनात ५० – ५० टक्के शंका आहे.), अशा १० ते १२ प्रश्नांबाबत तुम्हांला धोका पत्करता येईल. अन्यथा उत्तीर्ण होता होता तुम्ही अयशस्वी ठराल. माझ्या पाहण्यात असे अनेक विद्यार्थी आहेत की, ज्यांनी केवळ ७० ते ७५ प्रश्न सोडवले, मात्र ते यशस्वी ठरले. म्हणून अचूक प्रश्न सोडवण्यावर भर द्यावा.
सी-सॅट पेपर २ सोडविताना :
पेपर पहिला संपल्यानंतर मध्ये दोन तासांचा वेळ असतो. या काळात थोडेसे जेवण घ्यावे, शक्यतो हलकेफुलके. मसालेदार, तेलकट खाण्याने सुस्ती येण्याची शक्यता असते. या काळात कोणतेही पुस्तक वाचू नये किंवा मागच्या पेपरबद्दल फारशी चर्चा करू नये, कारण आता कितीही चर्चा केली तरी ती निष्फळ असते. कारण आपण पेपर देऊन आलेलो असतो, झालेल्या चुकांबाबत आता आपण काहीच बदलू शकत नाही. मात्र मागच्या पेपरची जास्त चर्चा केल्यास त्याचा वाईट परिणाम पुढच्या प्रश्नपत्रिकेवर होऊ शकतो. बऱ्याच वेळा परीक्षा केंद्रावर निरनिराळ्या ठिकाणाहून आलेले विद्यार्थी असतात. त्यांच्याकडे वेगवेगळी पुस्तके, नोट्स असतात. ते पाहून आपल्यावर मानसिक दडपण येऊ शकते. पण हे नक्कीच लक्षात ठेवा की, अंतिम क्षणी अभ्यास करून कोणीच विद्यार्थी उत्तीर्ण होत नाही व पेपर २ साठी तर या पद्धतीच्या अभ्यासाचा शून्य टक्केही फायदा नाही.
सी सॅट पेपर २ सोडविताना सुरुवातीला कॉम्प्रिहेन्शनवरील प्रश्न सोडवावेत की, बेसिक न्युमरसीवरील प्रश्न सोडवावेत, हा प्रश्न नेहमीच विद्यार्थ्यांना पडतो. पेपर हातात आल्यानंतर परीक्षेचे नाव, नंतर नमूद केल्यानंतर ज्या प्रश्नांसाठी निगेटिव्ह माìकग नाही असे निर्णयक्षमतेचे प्रश्न सर्वप्रथम सोडवावेत व त्यानंतर इतर प्रश्न सोडवावेत. पेपर २ मध्ये एक गंमत आहे, ती म्हणजे या पेपरमधील सर्वच उपघटकांवर सर्वाचीच हुकूमत असेल, असे नाही. त्यामुळे एखाद्या उपघटकावर आपल्याला प्रश्न सोडविण्यास अडचण येत असेल तर त्याची चिंता न करता, जो उपघटक आपल्याला चांगला येत असेल त्यावरील जास्तीत जास्त अचूक प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करावा.
उताऱ्यावरील प्रश्न सोडवताना सर्वप्रथम प्रश्न वाचून उतारा वाचल्यास आपल्याला कमी वेळात प्रश्न सोडवणे शक्य होते. एकदा उतारा वाचायला सुरुवात केल्यानंतर तो अर्धवट सोडून दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊ नये, कारण असे केल्यास हा उतारा वाचण्यासाठी दिलेला वेळ वाया जातो. उतारा हा एकतर िहदीत किंवा इंग्रजीत असतो, म्हणून एकतर उतारा िहदी वाचावा किंवा इंग्रजीत वाचावा. दोन्ही भाषेत उतारा वाचल्यास जास्त वेळ जातो. बेसिक न्युमरसीवर काही प्रश्न असतील व आकडेमोड करण्यास जास्त वेळ जाणार असेल, तर असे प्रश्न शक्यतो सुरुवातीला सोडवू नयेत किंवा शेवटी सोडवावेत.
सी सॅटच्या पेपर २ मध्ये ८० प्रश्न असतात व ते ८० पकी ८० प्रश्न दोन तासात सोडवणे अगदीच अशक्य असते, म्हणून शक्यतो वेळखाऊ प्रश्न शेवटी ठेवावेत किंवा त्यासाठी प्रयत्न करू नये. जर प्रश्नपत्रिकेत जास्त उतारे असतील तर शक्यतो लहान व समजण्यास सोप्या उताऱ्यांची निवड करून त्यांवरील प्रश्न अचूक सोडविण्यास सुरुवात करावी. एखादा प्रश्न येत नसेल तर त्यासाठी जास्त वेळ न घालता पुढच्या प्रश्नावर जावे. इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन स्किल्ससाठी जे उतारे दिले असतील म्हणजे ज्या उताऱ्यांचे िहदी भाषांतर केलेले नसेल, असे उतारे नक्की सोडवावेत, कारण हे उतारे अत्यंत सोपे असतात.
जो प्रश्न तुम्ही वाचला आहे, तो प्रश्न जर सोडवता येत असेल तर तो सोडवल्यानंतरच पुढच्या प्रश्नाकडे जा. सी सॅटचा पेपर २ शांत डोक्याने सोडवा. काही प्रश्न सोडवता येत नसतील तर त्याचे दडपण न घेता वेळेचा अंदाज घेत पुढच्या प्रश्नाकडे जाणे आवश्यक असते. हा पेपर सोडवताना सर्वात मोठी अडचण म्हणजे हा पेपर वेळेत पूर्ण होत नाही. अनेकदा अर्धा वेळ उलटून गेल्यानंतर लक्षात येते की, आपला बराच पेपर सोडवणे बाकी आहे. अशा वेळी दडपणाखाली न येता उरलेले प्रश्न अचूक मात्र वेगाने सोडवण्याचा प्रयत्न करावा.
डॉ. मार्टनि ल्युथर किंग (ज्युनि.) एकदा आपल्या भाषणात म्हणाले होते की, कुठल्याही माणसाचे अंतिम मोजमाप हे तो सुखसमाधानात जगताना होऊ शकत नाही, तर संघर्षांत, प्रतिकूल परिस्थितीत तो कसा वागतो, यावर त्याचे मोठेपण अवलंबून असते. मित्रांनो, हा नियम या परीक्षेसाठीही लागू आहे. तुम्ही वर्षभर किती अभ्यास केला, यापेक्षा परीक्षेच्या त्या दोन तासांना तुम्ही कसे सामोरे गेलात, यावर तुमचे यशापयश अवलंबून असते.
या परीक्षेसाठी शेवटच्या टप्प्यात तुम्ही केलेली अभ्यासाची तयारी आणि परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जात अचूकपणे सोडवलेली प्रश्नपत्रिका, यावरच तुमचे यश अवलंबून आहे.
संग्रहित लेख, दिनांक 20th May 2013 रोजी प्रकाशित
स्पर्धापरीक्षेच्या रिंगणात : यू.पी.एस.सी. : परीक्षेला जाताना..
यावर्षी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी परीक्षेसाठी पूर्वपरीक्षा रविवार, २६ मे रोजी आहे. परीक्षेत यशस्वी होण्याच्या दृष्टीने ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची ठरते, कारण यात यशस्वी झाल्याखेरीज मुख्य परीक्षेला बसता येत नाही. जे विद्यार्थी वर्षभरापासून या परीक्षेची तयारी करीत आहेत, त्यांच्यासाठी हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा व निर्णायक असतो.
First published on: 20-05-2013 at 12:58 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc while going to examinations