बदलांचे व्यवस्थापन

आयुष्यात बदल हा अपरिहार्य असतो. दररोज काही ना काही बदलतच असते.

आयुष्यात बदल हा अपरिहार्य असतो. दररोज काही ना काही बदलतच असते. काही वेळा ते आपल्या लक्षात येते तर काही वेळा नाही. पण बदलाबद्दल एक अनामिक भीती वाटून अस्वस्थ वाटते हे मात्र खरे. काही बदल वैयक्तिक असतात- जसे नवीन संसार, नवीन जागा, नवीन कौटुंबिक जबाबदाऱ्या. पण आज आपण बोलणार आहोत, व्यावसायिक बदलांविषयी.. म्हणजे नवीन ठिकाणी बदली, नवीन साहेब किंवा सहकारी, कामाचे बदललेले स्वरूप किंवा बढतीसुद्धा. विविध कारणांमुळे बदलांची भीती वाटते. कधी अयशस्वी होऊ  ही भीती, तर काही वेळा कुणीतरी झिडकारण्याची भीती, तर काहींना आपण टीकेचा विषय होण्याची भीती, तर काही वेळा चक्क यशस्वी होण्याची भीती! अगदी काहीच नाहीतर एक अज्ञात भीती.

या सगळ्याचे मुख्य कारण म्हणजे, माणसाला स्थैर्य नेहमी सुखदायक वाटते. शाश्वत वातावरणात भविष्याचा अंदाज बांधता येतो. अस्थिर वातावरण असेल तर मनात तणाव निर्माण होतो, बदललेल्या नवीन वातावरणात आपलं कसं निभावणार हा विचार मनात घर करून राहतो. स्मरणशक्ती, कार्यक्षमता व एकंदरीतच सहकाऱ्यांबरोबरचे संबंध यांचेवर परिणाम होऊ शकतो.

पण कुठल्याही कार्यालयीन बदलांमुळे अनियंत्रित भविष्याची अनामिक भीती वाटणे अगदी स्वाभाविक आहे. फक्त प्रत्येक व्यक्ती स्वत:च्या सापेक्ष चष्म्यातून या बदलांकडे पाहात असल्याने त्या बदलांची तीव्रता प्रत्येकाला वेगळी जाणवते. तसेच वाटणाऱ्या भीतीचे प्रमाणसुद्धा कमी जास्त असू शकते.

अर्थात वरिष्ठांनासुद्धा बदलांमुळे कार्यक्षमतेवर होणाऱ्या परिणामांची जाणीव असतेच. त्यासाठी बदल जाहीर करण्यापूर्वीच त्यावरचे उपाय पण तयार ठेवले जातात. कारकीर्दीच्या या पहिल्याच वर्षांत तुम्हाला असे कुठलेही बदल अनुभवायला लागले तर तुम्ही तुमच्या अनुभवी सहकाऱ्यांपेक्षा जास्त अस्वस्थ व्हाल हे नक्की. अशा वेळी पुढे दिलेल्या पायऱ्यांप्रमाणे वागलात तर नक्की तरून जाल.

 • सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे कार्यालयीन बदल होत आहेत ते मनमोकळेपणाने स्वीकारा. ते न स्वीकारण्याने होणारे बदल थांबणार नाहीत.
 • भीतीची कारणे शोधा. बदलांमुळे वाटणाऱ्या भीतींची लिखित यादी करा व प्रत्येक भीती यदाकदाचित खरी ठरली तर तुमच्यावर काय परिणाम होईल त्याचा अंदाज घ्या. तुमच्या लक्षात येईल की नुसती यादी केल्याने तुमची अस्वस्थता बरीच कमी होते आहे.
 • संवादाने नेहमीच ताण कमी होतो म्हणून वयाने मोठय़ा असलेल्या एखाद्या जवळच्या सहकाऱ्याचा सल्ला व मदत घ्या.
 • भीतीदायक विचार मनातून हद्दपार करा व फक्त सकारात्मक विचार करा.
 • विचारांत लवचीकता ठेवून नवीन बदल आत्मसात करावयाचा प्रयत्न करा.
 • बदल ही एक स्वत:ला सिद्ध करावयाची एक नवीन संधी असते. तेव्हा बदललेल्या वातावरणात सक्रिय सहभाग घ्या.
 • बदललेल्या परिस्थितीत सर्व जणच थोडेफार गोंधळलेले असतात. तुम्ही पुढाकार घ्या व सर्व कनिष्ठ व वरिष्ठ सहकाऱ्यांशी सातत्याने संवाद साधून तुम्ही कसे नवीन वातावरणाशी जुळवून घेता येईल ते पाहा.
 • बदलांच्या खवळलेल्या समुद्रात तणावमुक्त, कणखर, सक्षम व संवेदनशील कर्मचारीच फक्त तरून जाऊ शकतात. तेव्हा या वातावरणात टिकण्यासाठी शारीरिक व मानसिकरीत्या तंदुरुस्त राहा.
 • तुम्ही तुमच्या संस्थेसाठी किती महत्त्वाचे आहात हे सर्वाना कळू द्या. अशावेळी संस्थेला महत्त्वाचे व उपयोगी वाटणारे कर्मचारीच बदलांच्या झंझावातात टिकू शकतात हे ध्यानात ठेवा.
 • बदलांनंतर तुमची नवीन जबाबदारी अधिकृतपणे कळेपर्यंत सध्याचे काम त्याच तडफेने व प्रामाणिकपणे करत राहा, चित्त विचलित होऊ देऊ नका.
 • बदलांनंतर कामाची काही नवीन कौशल्ये लागणार असल्यास ती शिकून घ्या.
 • कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवण्यापूर्वी प्रत्येक बातमीची शहानिशा करा.

प्रत्येक क्षेत्रातील आजच्या अस्थिर व स्पर्धात्मक वातावरणात बदल हा अनिवार्य आहे. प्रत्येक क्षेत्राच्या गुणधर्माप्रमाणे हा बदल जलद किंवा धिम्या पद्धतीने होत राहील. त्यामुळे कुठल्याही क्षेत्रात तुम्ही काम करत असा, न घाबरता अशा बदलांना सकारात्मक वृत्ती, दृष्टिकोन व कृतीने सामोरे जाण्याची कला आत्मसात करणे आवश्यक आहे व त्यातच आपल्याला आपली प्रगती साधायची आहे.

डॉ. जयंत पानसे

dr.jayant.panse@gmail.com

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: What is management

ताज्या बातम्या