डॉ.भूषण केळकर, डॉ.मधुरा केळकर

अभिनंदन मित्र-मैत्रिणींनो, आत्तापर्यंत तुम्ही रेझ्यूमे बनवला, इंटरव्ह्यूची तयारी केली, कंपनी निवडली, आता पुढच्या टप्प्यामध्ये तुम्हाला तुमचं ‘प्रेझेंटेशन’ कौशल्य (सादरीकरण) दाखवण्याची गरज पडणार आहे. त्यासाठी या वेळी बघू की प्रेझेंटेशन कसं बनवायचं आणि कसं करायचं.

प्रेझेंटेशनचा विषय कधी आपल्याला दिलेला असतो तर कधी आपण स्वत: निवडलेला असतो. प्रेझेंटेशन स्वत: बनवताना आधी पायाभूत तयारी करावी लागेल. त्यासाठी योग्य स्राोत वापरून माहिती गोळा करणं हे पहिलं काम. त्या विषयाबद्दलच्या वेबसाइट्स, गूगल, विकिपीडिया इत्यादी वापरणं, पुस्तक, जर्नल, पीरियॉडिकल्स, वर्तमानपत्र या सर्व स्रोतांमधून आपल्याला माहिती मिळवावी लागेल. अर्थात आता हे सर्व चॅट जीपीटीवरूनही करता येतं. आणखीही अनेक एआय टूल्स आता उपलब्ध आहेत. एआय टूल किंवा चॅट जीपीटीवरून आलेल्या माहितीला खातरजमा करून घेणं आवश्यक आहे. बऱ्याचदा त्यामध्ये चुका किंवा खोटा मजकूर असण्याची शक्यता असते. त्यामुळे प्राथमिक माहिती मिळवण्यासाठी वेगवेगळ्या तज्ज्ञ लोकांशी बोलणं, लायब्ररीमध्ये जाऊन, स्वत: पुस्तक, प्रबंध शोधून वाचणं किंवा इंटरनेटवरून विश्वासार्ह साइट्सवरून नोट्स काढणं, यावर आम्ही जास्त विश्वास ठेवतो!

हे झाल्यानंतर मिळालेल्या माहितीचा माइंड मॅप बनवल्यास पुढच्या स्लाइड तयार करायला अतिशय सोपं जातं. माइंड मॅप याबद्दल खूप माहिती तुम्हाला इंटरनेटवर मिळेलच, पण मुख्य म्हणजे माइंड मॅप हे म्हणजे लेखी मजकुराची चित्ररूपाने मांडलेली माहिती.

यामध्ये मध्यवर्ती कल्पना केंद्रात असते आणि त्याला चित्ररूपाने अनेक शाखा काढलेल्या असतात. त्या शाखा म्हणजे त्या केंद्रीभूत संकल्पनेशी संलग्न उपकल्पनांचं चित्रण. या प्रकारच्या पद्धतीमुळे एखादा विषय नीट मांडणं सोपं होतं आणि तो समजावून सांगणंही, की ज्याचा आपण प्रेझेंटेशनसाठी उत्तम उपयोग करू शकतो.

दुसरी पायरी आहे- प्रेझेंटेशन तयार करणं. यासाठीही अनेक एआय टूल्स उपलब्ध आहेत. त्यातून वेगवेगळ्या नावीन्यपूर्ण, विषयाशी सुसंगत, सुंदर थीम्स घेता येऊ शकतात. आधी बनवलेला माइंड मॅप वापरून स्लाइडचा अनुक्रम तयार करता येईल. किती स्लाइड्स बनवायच्या हे ठरवावं लागेल, ते कोणता विषय आहे त्यावर, किती वेळ आहे त्यावर आणि कोणासाठी प्रेझेंटेशन करायचं आहे त्यावर अवलंबून राहील. याशिवाय बॅकअप स्लाइड्स तयार ठेवणं केव्हाही चांगलं.

तिसरी पायरी आहे- प्रेझेंटेशनचं सादरीकरण. एकूण वेळ किती आहे आणि प्रत्येक स्लाइडसाठीचा वेळ किती आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे. प्रेझेंटेशनची सुरुवात परिणामकारक असावी. अलीकडच्या काळात श्रोत्यांचं लक्ष टिकून राहण्याचा अवधी हा खूपच कमी झाला आहे. तो आता साधारण आठ ते १० मिनिटं एवढा आहे. म्हणजे दर दहा मिनिटांनी तुम्ही असं काही तरी करायला हवं की ज्यामुळे श्रोते सतत सावधान राहतील. प्रेक्षकांचं लक्ष विचलित न होण्यासाठी अधूनमधून प्रश्न विचारणं, क्विझ विचारणं, मधूनच एखादा विनोद निर्माण करणं किंवा एखादी बसल्या जागी करण्याची छोटी कृती घेणं, हे आवश्यक असते. अशा प्रकारे एंगेजमेंट प्लॅन आधीच तयार करावा. शेवटही समर्पक असायला हवा. शेवटी प्रश्न-उत्तरंही ठेवता येतील.

प्रेझेंटेशन करताना देहबोली कशी असावी, तर यासाठी खालील काही मुद्दे-

बोलताना प्रेक्षकांकडे पाठ करू नये. स्लाइड वाचून न दाखवता, स्वत: लक्षात ठेवून त्याबद्दल बोलता यायला हवं. स्वत:ची देहबोली अतिशय सहज असावी. हाताच्या हालचालींचा सुयोग्य वापर करता यायला हवा. सर्व श्रोत्यांकडे बघून बोलणं खूप महत्त्वाचं आहे. शक्य असल्यास स्टेजवर पोडियमच्या मागे उभे राहून न बोलता, वायरलेस माइक घेऊन सर्वांच्या समोर, पण प्रोजेक्टर स्क्रीनला आपण अडथळा ठरणार नाही, अशा ठिकाणी उभे राहून प्रेझेंटेशन केल्यास अधिक चांगलं.

कंपनीमध्ये गेल्यानंतर अनेक वेगवेगळ्या श्रोतृवृंदासमोर आपल्याला प्रेझेंटेशन करण्याचं संवादकौशल्य अक्षय्य लागणारच आहे हाच आजच्या या अक्षय्यतृतीयेचा बावनकशी आणि २४ कॅरट सोनेरी संदेश!!

bhooshankelkar@hotmail.com

mkelkar_2008@yahoo.com