रोहिणी शहा

राज्यसेवा मुख्य परीक्षा डिसेंबरमध्ये प्रस्तावित आहे. सन २०२५ पासून राज्यसेवा मुख्य परीक्षा ही नवीन अभ्यासक्रम आणि पारंपरिक स्वरूपाची असणार आहे. त्यामुळे वस्तुनिष्ठ पद्धतीची ही शेवटची मुख्य परीक्षा असणार आहे. या लेखापासून या पेपर्सची अभ्यास पद्धती कशी असावी याबबत चर्चा करू?.

एकूण ८०० गुणांसाठी सहा पेपर मुख्य परीक्षेमध्ये विहीत करण्यात आले आहेत. यातील भाषा घटकाच्या पेपर्सबाबत आधी पाहू. सन २०१६पासून मुख्य परीक्षेमध्ये मराठी व इंग्रजी (एकत्रित) पारंपरिक आणि मराठी व इंग्रजी (एकत्रित) वस्तुनिष्ठ असे दोन पेपर असे भाषा घटकाचे स्वरूप ठरविण्यात आले आहे. पारंपरिक पेपर १०० गुणांसाठी तीन तासांत तर वस्तुनिष्ठ पेपर १०० गुणांसाठी एका तासात सोडवायचा आहे.

हा पेपर १०० गुणांसाठी आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (१२ वीच्या) समकक्ष असेल असे आयोगाने अभ्यासक्रमात नमूद केले आहे. या पेपरच्या मराठी व इंग्रजी भागासाठी वेगवेगळ्या उत्तरपत्रिकांमध्ये उत्तरे लिहायची आहेत. निबंध २५-२५ गुण, भाषांतर १५-१५ गुण व सारांश लेखन १०-१० गुण अशी प्रत्येक भाषेसाठीची गुण विभागणी आहे.

तयारी सुरू करण्यापूर्वी भाषा विषयांचा अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्याचे प्रयोजन समजून घ्यायला हवे. प्रशासकीय व्यवस्थेचा भाग म्हणून अंतर्गत व्यवहार आणि नागरिकांशी व्यवहार अशा दोन पातळ्यांवर महाराष्ट्रामध्ये मराठी आणि इंग्रजी या भाषा वापरल्या जातात. त्यांचे आकलन आणि अभिव्यक्तीसाठी त्यांचा वापर करण्याची क्षमता या पेपर्सच्या माध्यमातून तपासली जाते. उमेदवाराची विचार-प्रक्रिया, अभिव्यक्ती, लेखनाचे कौशल्य इ. गोष्टी पारखण्यासाठी पारंपरिक भाषा पेपरमध्ये निबंधाचा घटक योजण्यात आला आहे. तर उमेदवाराची आकलन क्षमता, अभिवृत्ती, भाषिक कौशल्ये तपासण्यासाठी सारांश लेखन आणि भाषांतर या घटकांचा समावेश करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> नोकरीची संधी : सर्वोच्च न्यायालयातील संधी

निबंधलेखन :

निबंध हा सर्वात जास्त गुण असलेला प्रश्न आहे. दोन पैकी एका विषयावर निबंध लिहायचा असल्याचे अभ्यासक्रमामध्ये नमूद करण्यात आले आहे. निबंध लेखनास direct सुरुवात करू नये. कच्च्या पानावर आधी सुचतील ते मुद्दे मांडावेत. त्यानंतर त्यांचा क्रम ठरवून मग प्रत्यक्ष लेखन करावे. वैचारिक, समस्याधारित निबंधात विषयाचे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक व इतर काही संबंधित पैलू विचारात घ्यावेत. साधारणपणे १० ते १२ मुद्दे निवडून त्यांचा क्रम ठरवून घ्यावा. परिणामकारक सुरुवात करण्यासाठी सुविचार, कविता इ.चा वापर करता येईल. सुरुवातीनंतर ठरलेल्या क्रमाने थोडक्यात मुद्दे मांडावेत व एका Conclusion ने शेवट करावा. विषयाच्या दोन्ही बाजू मांडता आल्या तर उत्तम मात्र तुमचे मत म्हणून जेंव्हा एखादा निष्कर्ष किंवा तात्पर्य मांडायचे असेल तेंव्हा ते एकांगी किंवा हट्टाग्रही असू नये. कल्पनात्मक निबंधामध्ये कल्पनेच्या अतिशयोक्त भराऱ्या असू नयेत. ‘कल्पना’ सुद्धा तर्कशुद्ध असायला हव्यात. असे निबंध शालेय पद्धतीने मांडले जाण्याचा धोका असतो. त्यामुळे विचारांचे गांभीर्य टिकविणे खूप आवश्यक आहे.

भाषांतर :

इंग्रजीतून मराठी भाषांतर करताना वाक्यरचना एकदम कृत्रिम होण्याची शक्यता असते. तेव्हा आधी वाक्य व्यवस्थित वाचून त्याचा भावार्थ समजून घ्यावा आणि मग त्याचे मराठी वाक्य लिहावे. आधी मनातल्या मनातच वाक्याचा भावार्थ ज्या भाषेत उत्तर लिहायचे आहे त्या भाषेत उच्चारला की हे सोपे होऊन जाते. इंग्रजी व मराठी भाषेच्या वाक्यरचनेमध्ये मूलभूत फरक आहे. हे व्यवस्थित समजून घ्यायला हवे. काही वेळेला एखाद्या शब्दाला प्रतिशब्द आठवला नाही तर अशा वेळी त्या प्रतिशब्दासाठी अडून बसण्यापेक्षा वाक्याचा भावार्थ नीट मांडला जाईल, अशी वाक्यरचना करावी. मात्र प्रत्येक वेळी असा पाल्हाळीक अनुवाद करण्याचे टाळावे.

सारांश लेखन:

दिलेल्या उताऱ्यातील एकूण शब्दसंख्या उजव्या कोपऱ्यात दिलेली असते आणि सारांश उताऱ्याच्या १/३ इतक्या शब्दमर्यादेत व स्वत:च्या शब्दात लिहिणे अपेक्षित असते. उत्तरपत्रिकेत या प्रश्नासाठी टेबलच्या स्वरुपात वेगळे पान दिलेले असते आणि प्रत्येक चौकोनात एकच शब्द लिहायचा असतो. त्यामुळे टेबलच्या किती ओळींमध्ये तुमचा सारांश पूर्ण होईल, हे लक्षात येते. संपूर्ण उतारा वाचत बसण्यापेक्षा सरळ पहिला पॅराग्राफ वाचून त्याचा सारांश लिहावा. मग पुढच्या पॅराग्राफचा सारांश असे करत गेल्यास वेळेची बचत होते. सारांश लिहिताना उताऱ्यातील quotations, उदाहरणे इ. आधी वगळून टाकावी फक्त त्यांचा अर्थ लक्षात घ्यावा. त्यावरू न योग्य व कमीत कमी शब्दयोजना करत सारांश लिहावा पण स्वत:चे मतप्रदर्शन टाळावे. अतिरिक्त स्पष्टीकरण देत बसू नये. विचारले असेल तर छोटेसे समर्पक शीर्षक द्यावे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आपल्या प्रतिक्रियांसाठी आमचा ई-पत्ता : careerloksatta@gmail. com