स्पर्धेत टिकण्यासाठी, तयार होण्यासाठी व पुढे जाण्यासाठी नियमित अभ्यास आणि परीक्षांच्या माध्यमांतून नियमित प्रयत्न आवश्यक आहेत. एकच एक परीक्षा देऊन संधींची मर्यादा कमी करून घेण्याऐवजी व्यवहार्यपणे संधी घेता येईल अशा शक्य त्या सगळ्या परीक्षा देणे असा अप्रोच ठेवून तयारी आणि नियोजन करणे गरजेचे आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा ही २८ सप्टेंबर रोजी होत आहे. नव्या पॅटर्ननुसार राज्यसेवा मुख्य परीक्षा होणार असून त्याचे वेळापत्रक अजून आयोगाने दिलेले नाही. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या प्राधान्यक्रमात सध्या राज्यसेवा मुख्य परीक्षेची तयारी हाच विषय असेल. जाहिरातीमध्ये उल्लेखीत १२७ ही पदसंख्या ही फारशी प्रोत्साहनात्मक नाही. पण उपलब्ध पदसंख्येचा जास्त विचार न करता, अभ्यासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. जाहिरातीत उपलब्ध १२७ पदसंख्येबरोबरच ह्यपदसंख्येत व आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागाच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे,ह्ण असे नमूद आहे आणि ते प्रत्येक वर्षीच्या जाहिरातीत असतेच. पूर्व- मुख्य- मुलाखत ही साधारणपणे वर्षभर चालणारी परीक्षा प्रक्रिया संपता संपता पदसंख्येत वाढ होते, हा नेमाचा अनुभव आहे. तेव्हा पदसंख्या कमी किंवा जास्त याचा विचार न करता आपण स्पर्धेत किती समर्थपणे उतरू शकतो आणि स्पर्धा जिंकू शकतो हाच आपल्या चिंतेचा आणि प्रयत्नांचा भाग असला पाहिजे.

राज्य लोकसेवा आयोगाच्या जाहिरातीत पदसंखेचे प्रमाण गेल्या काही वर्षात कमी दिसत असले तरी २०११ नंतर आयोगाच्या परीक्षा प्रक्रिया पद्धतीत झालेला सकारात्मक आणि महत्त्वाचा बदल म्हणजे दर वर्षी नियमितपणे जाहिरात प्रसिद्ध होते व वेळापत्रकाप्रमाणे दरवर्षी परीक्षा होते.

पूर्वी राज्य लोकसेवा आयोगाची एक परीक्षा म्हणजे अभ्यासाची पंचवार्षिक योजना असे विनोदाने म्हटले जायचे. नियमित परीक्षांच्या आयोजनामुळे लाखो उमेदवारांना एक नवा विश्वास दिला आहे. सध्या आरक्षणाच्या मागण्यांबाबत सरकारचे धोरण निश्चित होईपर्यंत, त्याबाबत्चे न्यायालयांचे निर्णय येईपर्यंत आयोगाकडे भरतीची मागणी होणे मंदावले आहे. आणि आयोगाच्याही परीक्षा संथगतीने पुढे सरकत आहेत. पण परीक्षा नियमितपणे होणे हा उमेदवारांचे प्रयत्न-सातत्य राखण्यासाठीचा बूस्टर डोस असतो. आयोग आपले काम करत आहे; तेव्हा उमेदवारांनीसुद्धा तयारीमध्ये सातत्य ठेवले पाहिजे.

काही उमेदवारांनी राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या नव्या पॅटर्नमुळे सध्या तो पर्याय बाजूला ठेवून महाराष्ट्र गट ब आणि गट क सेवा परीक्षांच्या पूर्णवेळ तयारीचा मानस बोलून दाखविला. कमी पदसंख्या, पॅटर्नमधील बदल ही परीक्षा टाळण्याची किंवा नाकारण्याची कारणे होऊ शकत नाहीत. आपण पूर्णवेळ स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उमेदवार आहोत तर प्रत्येक परीक्षा ही संधी मानली पाहिजे.

राज्य सेवा मुख्य परीक्षेची वर्णनात्मक पद्धत सन २०२५ च्या मुख्य परीक्षेपर्यंत पुढे ढकलून आयोगाने तयारीकरिता उमेदवारांना पुरेसा अवधी दिलेला आहे. सन २०१३ पर्यंत वर्णनात्मक पद्धतीनुसारच या परीक्षा घेतल्या जात होत्या. मधल्या काही काळात वस्तुनिष्ठ/ बहुपर्यायी पद्धतीने मुख्य परीक्षा झाल्या असल्या तरी आयोगाचा सध्याचा पॅटर्न हा जास्त स्वागतार्ह आणि उमेदवारांना आपले सत्त्व आणि स्वत्व दाखवून देण्याची उत्तम संधी आहे. योग्य पद्धतीने तयारी केली तर या एकाच तयारीच्या आधारावर आता यूपीएससी परीक्षासुद्धा देता येणार आहे. आयोगाकडून हे आव्हान नाही तर संधीचे दरवाजे उघडण्यात आले आहेत असे समजून तयारी केली पाहिजे.

स्पर्धेत टिकण्यासाठी, चार्ज होण्यासाठी व पुढे जाण्यासाठी नियमित अभ्यास आणि परीक्षांच्या माध्यमांतून नियमित प्रयत्न आवश्यक आहेत. एकच एक परीक्षा देऊन संधींची मर्यादा कमी करून घेण्याऐवजी व्यवहार्यपणे संधी घेता येईल अशा शक्य त्या सगळ्या परीक्षा देणे असा अप्रोच ठेवून तयारी आणि नियोजन करणे गरजेचे आहे. अभ्यासाचे नियोजन करताना, इथून पुढे महिन्यांचे, आठवड्यांचे गणित न घालता, दिवसांचे व तासांचे गणित आखले पाहिजे. उपलब्ध वेळ, द्यायच्या परीक्षा, त्यांचे पॅटर्न, घटक विषयांपैकी सोपे अवघड किंवा कमी सोपे कमी अवघड वा जास्त सोपे जास्त अवघड विषय अशा सगळ्यांचा विचार करुन त्यानुरूप वेळेची विभागणी, आणि योग्य अभ्यास साहित्याची निवड या बाबींचा मेळ बसवावा लागेल.

मागील दोन-तीन वर्षांपासून अभ्यासात असलेल्या उमेदवारांना योग्य आणि उपयुक्त अभ्यास साहित्याची निवड करायला जास्त श्रम घ्यावे लागत नाहीत. त्यांना नेमक्या आणि उपयुक्त स्टडी मटेरिअलची चांगली समज असते. नवीन मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम हा केंद्रीय नागरी सेवा परीक्षेच्या मुख्य परीक्षेचाच अभ्यासक्रम आहे. तेव्हा नव्या उमेदवारांनी यूपीएससीची तयारी करणाऱ्या ‘सिनियर्स’ची मार्गदर्शनासाठी जरूर मदत घ्यावी. (पूर्वार्ध) steelframe.india@gmail.com