नव्या पॅटर्नमुळे करिअरच्या वाढलेल्या संधी साधायच्या तर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची एकत्रितपणे आणि गांभीर्याने तयारी करायला हवी. यूपीएससी/एमपीएससीच्या परीक्षांची तयारी करताना सामान्य अध्ययनाचा बेसिक अभ्यास चांगला झाल्यामुळे इतर परीक्षांना सामोरे जाण्यात विशेष अडचण येत नाही आणि नव्याने अभ्यासही करावा लागत नाही.

वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांच्या प्रश्न पद्धतीचे आपापले पॅटर्न ठरलेले असतात. काठीण्य पातळी ठरलेली असते. अशा परीक्षा देत राहिल्याने यशाची शक्यता तर वाढतेच पण वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न सोडवण्याचा सरावही होतो. राज्य लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेची प्रश्नपद्धती पारंपरिक वर्णनात्मक वरून वस्तुनिष्ठ बहुपर्यायी करण्यात आली, त्यानंतर उमेदवारांना प्रश्नांचे स्वरूप व काठीण्य पातळी ही यूपीएससीच्या प्रकारची जाणवली. यानंतर गट ब आणि क या परीक्षांबबतही असेच काहीसे जाणवले.

यूपीएससी देणाऱ्या उमेदवारांना त्यामुळे एमपीएससीची परीक्षा फारशी अवघड गेली नाही. आणि राज्य सेवेची तयारी करणाऱ्या बऱ्याच उमेदवारांनी यूपीएससीचा विचार करायला सुरुवात केली. तोपर्यंत एकमेकांशी फटकून राहणाऱ्या या गट तटांचे बुरूज ढासळून एकत्रित तयारीचे नवे युग सुरू झाले. नव्या पॅटर्नमुळे करिअरच्या वाढलेल्या संधी साधायच्या तर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची एकत्रितपणे आणि गांभीर्याने तयारी करायला हवी.

ध्येय यूपीएससी असेल किंवा एमपीएससी, इतर विविध स्पर्धा परीक्षांची माहिती घेऊन अभ्यासाची योजना आखली पाहिजे. यूपीएससी/ एमपीएससीच्या परीक्षांची तयारी करताना सामान्य अध्ययनाचा बेसिक अभ्यास चांगला झाल्यामुळे इतर परीक्षांना सामोरे जाण्यात विशेष अडचण येत नाही आणि नव्याने अभ्यासही करावा लागत नाही. इतर परीक्षांचा अभ्यासक्रम परीक्षा पध्दती, पॅटर्न यामध्ये काही अंशी फरक असतो पण त्यासाठी तुम्हाला फार वेगळे आणि मोठे श्रम घ्यावे लागत नाहीत.

एका परीक्षेच्या अभ्यासामुळे एमपीएससी, स्टाफ सिलेक्शन, बँकिंग, रेल्वे, पोस्ट, संरक्षण दल, एलआयसी अशा विविध परीक्षांना बसणे सोपे जाते. एकदा घेतलेल्या परिश्रमाचा सर्वत्र फायदा होतना दिसेल. एक आणि एकाच परीक्षेत अडकून पडल्यास उमेदवारांचे नुकसान होण्याची शक्यता असते. दोन/तीन प्रयत्न संपले तरी तीन चार वर्षांचा अवधी हातातून निसटलेला असतो. अशा वेळी येणारे वैफल्य व बिथरलेली तरुणाई हा एका वेगळ्या लेखाचा विषय होईल. बरेच उमेदवार केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेसोबतच एमपीएससी परीक्षांची तयारी करतात.

काहीजण यापैकी एकाच परीक्षेवर फोकस ठेवण्याचा प्रयत्न करतात. तरी काही उमेदवार एखारी छोटी-मोठी पोस्ट मिळू दे मग यूपीएससी किंवा राज्यसेवा परीक्षेच्या तयारीबाबत विचार करू असाही प्लॅन अंमलात आणतात. काहींचे स्वप्न मोठे, पण त्यासाठीचे प्रयत्न मात्र अत्यंत छोटे असतात. अभ्यासाच्या खोलीत आय.ए.एस./आय.पी.एस च्या पाटया किंवा चिठ्ठया आणि वेळ मिळाल्यावर बँकींग/रेल्वेच्या परीक्षांची तयारी, जनरल नॉलेजच्या पुस्तकांचा अभ्यास अशी दिशाहीन पायपीट करणारेही अनेक उमेदवार असतात. आपले वय, परीक्षांचे प्रयत्न, कौटुंबिक पार्श्वभूमी, आपले ध्येय आणि त्यासाठीचे प्रयत्न याचा कसलाही मेळ करीअर नियोजनात नसतो. परीणामी प्रयत्नांचा शेवट मनासारखा नसतो.

यासाठी केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षांची नीट माहिती घेऊन उमेदवारांनी आपली योजना आखली पाहिजे. सर्वप्रथम, तयारी सुरु करताना नागरी सेवा परीक्षा, आयएएसचे ध्येय ठेवून अभ्यास सुरु केला पाहिजे. नागरी सेवा परीक्षेचा अभ्यास विस्तृत व व्यापक आहे. नागरी सेवा परीक्षा ही इतर सर्व परीक्षांची Mother Exam मानली जाते. इतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम यूपीएससीच्या जवळपास जाणारा असतो. हा अभ्यास चांगला झाला की इतर परीक्षांना तुम्ही सहज सामोरे जाऊ शकता.

दरवर्षी परीक्षेस बसणाऱ्या उमेदवारांत, जुन्या म्हणजेच रिपीटर्स उमेदवारांची संख्या जास्त असते. तुलनेत पहिलाच प्रयत्न असणाऱ्या नव्या उमेदवारांची संख्या त्या मानाने कमी असते. एक-दोन-तीन किंवा त्यापेक्षा कमी-जास्त प्रयत्नांचा अनुभव असणाऱ्या अशा उमेदवारांचे अभ्यासाच्या रणनीतीबद्दल स्वत:चे कांही आडाखे असतात.

कोणत्या घटक विषयाला जास्त महत्त्व द्यावे, कोणत्या संदर्भ पुस्तकांना हाताळावे, कोणत्या पुस्तकातून कोणता भाग अभ्यासावा, या विषयी नेमके धोरण असते. एक-दोन परीक्षांतील यश किंवा अपयशाच्या अनुभवातून प्राप्त झालेले हे ज्ञान फार मोलाचे असते, आणि ते उपयुक्तही ठरते. नव्याने तयारी सुरू करणाऱ्या उमेदवारांनी तयारीची दिशा ठरवताना अशा सिनियर्सची जरुर मदत घ्यावी.

कोणतेही यश पोकळ अवकाशात बहरत नाही. समोरच्या वास्तवाच्या चौकटीतच तिचा विचार करावा लागतो. स्पर्धा परीक्षात झालेले व भविष्यात होत राहणारे बदल, बदलते प्राधान्यक्रम यांच्याशी जुळते घेण्याचा व्यावसायिक दृष्टीकोन उमेदवारांनी अंगीकारणे स्पर्धेत टिकण्यासाठी आवश्यक आहे.

(उत्तरार्ध)

steelframe.india@gmail.com