तुकाराम जाधव

संघ लोकसेवा आयोगाच्या सनदी सेवा परीक्षेचा आवाका मोठा असल्याने नियोजनपूर्वक अभ्यास अटळ ठरतो, यात शंका नाही. त्यातही पूर्व परीक्षेच्या पातळीवर तीव्र स्वरूपाची स्पर्धा असल्याने अभ्यास व वेळेचे नियोजन महत्त्वपूर्ण ठरते. हे नियोजन करताना सामान्य अध्ययन व नागरी सेवा कल चाचणी या दोन्ही पेपर्सच्या अभ्यासक्रमाचे सूक्ष्म अवलोकन, आयोगाच्या मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण, प्रत्येक विषयासाठी वाचावयाच्या संदर्भ साहित्याचे संकलन आणि स्वत:च्या क्षमता व दुर्बलतांचे योग्य ज्ञान हे घटक लक्षात घ्यावेत. म्हणजे पूर्वपरीक्षेची व्याप्ती समजून घेऊन त्यातील पेपर्स, विषय आणि विभाग यानुसार नियोजनाचा आराखडा तयार करावा. तसेच या टप्प्याच्या तयारीसाठी द्यावयाचा वेळही प्रस्तुत नियोजनासाठी अत्यावश्यक ठरतो, यात शंका नाही.

पूर्व परीक्षेसाठी नियोजन ठरवताना वेळ व अभ्यास या दोन्हींचा एकत्रित विचार करणे गरजेचे आहे. यातील वेळेचे नियोजन म्हणजे आपण पूर्व परीक्षेच्या तयारीसाठी किती काळ निर्धारित करणार इथपासून ते या निर्धारित वेळेचा (प्रत्येकाने ठरवलेला) विनियोग कसा करणार हे ठरवणे. उदाहरणार्थ, आता इथून पुढे साधारणत: तीन महिन्यांचा कालावधी उपलब्ध आहे हे लक्षात घेता या काळात आपण नेमके केव्हा आणि काय वाचणार याची प्राथमिक स्वरूपाची रूपरेखा तयार करावी आणि दर महिना, आठवडा आणि दिवसाचे नियोजन ठरवावे म्हणजे दैनंदिन ते एकंदर ३ महिन्यांचे नियोजन ठरवणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक दिवसाचे महत्त्व आणि त्या-त्या दिवशी काय वाचायचे आहे, याची स्पष्टता या बाबी ध्यानात येतील.

हेही वाचा >>> स्कॉलरशीप फेलोशिप : पत्रकारांसाठी फेलोशिप

दुसरी महत्त्वपूर्ण बाब म्हणजे उपलब्ध वेळ किमान ३ फेऱ्यांमध्ये विभागणे होय. मागील लेखात म्हटल्याप्रमाणे प्रत्येक अभ्यासघटकाची किमान ३ वाचने म्हणजे २ उजळण्या अत्यावश्यक ठरतात. त्यामुळे उपलब्ध ३ महिन्यांमध्ये ३ वाचनांचे (२ उजळण्या) नियोजन जरुरी ठरते. अर्थात हे करताना पहिल्या वाचनास जास्त वेळ, दुसऱ्या वाचनास कमी आणि तिसऱ्या वाचनास आणखी कमी वेळ लागणार हे लक्षात घेऊनच या वाचन फेऱ्या निर्धारित कराव्यात.

अर्थात वेळेच्या नियोजनासाठी पूर्व परीक्षेतील पेपर्स व यातील विषयांचे तपशील लक्षात घेऊन अभ्यासाची योजना आखावी लागते. सामान्य अध्ययनाचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याने आपल्या तयारीचा ८० टक्के वेळ व ऊर्जा या पेपरसाठीच राखीव ठेवावी लागणार. सर्वसाधारणपणे नागरी सेवा कल चाचणीसाठी दररोज किमान २ तासांचा सराव पुरेसा ठरू शकतो. तथापि, विद्यार्थ्यांनी आपापली पार्श्वभूमी लक्षात घेऊन यात सोईनुसार बदल करावेत.

दुसरे म्हणजे सामान्य अध्ययनातील प्रत्येक विषयासाठी किती वेळ द्यायचा हेही निश्चित करावे. याआधारे सर्व विषयांच्या अभ्यासासाठी एकूण किती वेळ लागेल हे लक्षात घेता येईल. त्यानंतरच्या दोन वाचन फेऱ्या पुन्हा प्रत्येक विषयाच्या निर्धारित वेळेआधारे ठरवता येतील. थोडक्यात, विषयानुसार एकूण वेळेचे वाटप तपशीलवारपणे ठरवावे लागेल.

उपरोक्त व्यापक नियोजन आराखड्याच्या आधारे दररोजचे अभ्यास (विषय) व वेळेचे नियोजन हाती घ्यावे, ज्यात दरदिवशी कोणकोणते विषय व किती वेळासाठी अभ्यासायचे हे निश्चित करता येईल. प्रस्तुत दैनंदिन नियोजनात सामान्य अध्ययन, सीसॅट आणि चालू घडामोडी अशी वेळेची विभागणी करता येईल. यासंदर्भात भेडसावणारा एक प्रश्न म्हणजे ‘दररोज एकच विषय करायचा की अनेक विषय वाचायचे’ हा होय. याबाबतीत केवळ एकच विषय अथवा ३-४ विषय असे टोक टाळून किमान दोन विषय (सामान्य अध्ययन) निवडणे सोईचे ठरू शकते. म्हणजे सामान्य अध्ययनातील दोन विषय, सीसॅट आणि चालू घडामोडीसाठी वर्तमानपत्र अशा चार घटकांमध्ये दिवसाची विभागणी करता येईल. प्रत्येक विद्यार्थ्याची अभ्यासाची पद्धत एकसारखीच असेल असे नाही तर आपल्याला पार्श्वभूमीनुसार पूरक बदल समाविष्ट करून आपली अभ्यासपद्धती सुनिश्चित करावी.

हेही वाचा >>> नोकरीची संधी : इंडियन नेव्हीमधील भरती

पूर्व परीक्षेतील लेखमालेच्या पहिल्या लेखात म्हटल्याप्रमाणे अचूक व नेमक्या आकलनाची हमी कोणत्याही अभ्यास घटकाचे एकदाच वाचन करून देता येणार नाही, त्यासाठी अनेक उजळण्यांची गरज भासते. त्यामुळे अभ्यासाच्या नियोजनात उजळणीच्या घटकाचा स्वतंत्र व पुरेसा विचार केलेला असावा. त्यासाठी दररोज, आठवडा, महिना आणि एकूण उपलब्ध वेळ यांतील किती वेळ राखीव ठेवणार हे ठरवावे.

प्रत्येक विषयाची प्रभावी उजळणी करता यावी म्हणून त्यावरील संदर्भसाहित्यावर सूक्ष्म व बारकाईने प्रक्रिया करावी जेणेकरून विषयवार महत्त्वपूर्ण तपशीलाच्या परीक्षाभिमुख मायक्रो नोट्स काढता येतील.

नियोजनातील आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे नमुना प्रश्न व प्रश्नपत्रिकांच्या सरावासाठी ठरवायचा वेळ व पद्धती होय. निवडलेल्या विषयातील प्रकरणापासून ते संबंधित पेपरची समग्र चाचणी (सामान्य अध्ययन किंवा सीसॅट) अशा विविध प्रकारे प्रश्नांचा सराव करण्यासाठी आपल्या नियोजनात वेळ राखीव ठेवावा लागणार हे नक्की. अर्थात प्रश्न सोडवण्यासाठी लागणारा वेळच गृहित धरायचा असे नाही तर सोडवलेल्या प्रश्नाचे विश्लेषण व मूल्यमापन करण्यासाठी देखील वेळ राखीव ठेवावा लागेल. म्हणजे सोडवलेल्या प्रश्नातील किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आली, किती प्रश्नांची उत्तरे चुकीची ठरली? तसे का झाले? त्यामागील विचार व तर्क पद्धती कोणती होती? आणि आपल्याला कोणत्या सुधारणा कराव्या लागतील? अशा विविध पद्धतीने नमुना प्रश्नांच्या सरावाचे कठोर व पारदर्शी मूल्यमापन करावे लागेल. म्हणूनच त्यासाठी वेळ राखीव ठवणे अगत्याचे ठरते. अशारितीने, पूर्व परीक्षेच्या तयारी प्रक्रियेत आवश्यक परीक्षाभिमुखता, योग्य दिशा आणि प्रभावीपणा यांची हमी देण्यासाठी सखोल व सविस्तर नियोजनाची नितांत गरज भासते. परीक्षेतील विषय आणि उपलब्ध वेळ या दोहोंच्या आधारे अभ्यासाची योजना आखल्यास दैनंदिन ते एकूण उपलब्ध काळाचे सुस्पष्ट नियोजन ठरवता येईल. आपल्या प्रयत्नांचे सातत्यपूर्ण मूल्यांकन करून त्यात अपेक्षित सुधारणा करता येतील आणि अभ्यासातील अचूकता व नेमकेपणाचे ध्येय साध्य करता येईल.