डॉ. श्रीराम गीत
मी दहावी चांगल्या मार्काने पास झाल्यावर बारावी सायन्स करून बीबीएला पुणे विद्यापीठात प्रवेश घेतला. त्यानंतर टीआयएसएसमध्ये ‘ह्यूमन रिसोर्स मध्ये मला पदव्युत्तर पदवी घ्यायची होती. म्हणून मी प्रवेश परीक्षेची तयारी करत होते. अचानक यंदाचे वर्षी त्यांनी ती घेणार नाही म्हणून जाहीर केले व कॅट या परीक्षेचा स्कोअर लक्षात घेऊन प्रवेश दिला जाईल असे सांगितले आहे. त्या परीक्षेचा अभ्यास खूपच कठीण व वेगळा आहे. तो लगेच होणे शक्य नाही. मग मी काय करावे? – नम्रता वाघमारे, पुणे
उत्तर अगदी साधे सरळ सोपे आहे. तुझ्या हाती पदवी आली आहे मिळेल त्या नोकरीला सुरुवात कर. पदव्युत्तर प्रवेश परीक्षेसाठीचा अभ्यास नोकरी सांभाळूनच करावा लागेल. त्यासाठी अखिल भारतीय स्तरावरच्या चार परीक्षा असतात. कॅट ही सगळय़ात प्रथम होणारी आणि कठीण, त्यानंतर झ्ॉट व मॅट होतात. सरते शेवटी अखिल भारतीय सेटमा व महाराष्ट्राची सीईटी असते. या सर्व परीक्षा पुढील वर्षी देऊन उत्तम संस्था मिळवण्याचा प्रयत्न करणे सहज तुझ्या हाती आहे. शक्यतो लगेच नोकरी शोधण्याच्या प्रयत्नाला सुरुवात कर. त्या अनुभवाचा तुला पदव्युत्तर पदवीनंतर कामामध्ये उपयोगच होणार आहे. अर्थातच पगाराकडे दुर्लक्ष करून हे काम स्वीकारावे लागेल.
माझा मुलगा पुढील वर्षी १०व्या इयत्तेत असेल त्याला इतिहास विषयात जास्त रस आहे आणि त्याला पुरातत्व शास्त्रज्ञ व्हायचं आहे; त्यासंबधाने पुढील शिक्षण पूर्ण (पदवी व पदव्युत्तर) करण्यासाठी व करिअर संबंधाने मार्गदर्शन करावे. – विनीत यादव, ठाणे</p>
कोणताही मुलगा एखादा शब्द पकडून काही म्हणतो म्हणजे त्याच्या मागे लगेच जावे असे नसते. एखादा आर्किऑलॉजिस्ट प्रथम तू स्वत: शोध. त्यांना भेट. त्यांची माहिती घे. ते काय शिकले, त्यांनी काय कष्ट केले त्याबद्दल माहिती घ्यायला तुझ्या हातात अजून तीन वर्षे आहेत हे समजून सांगण्याचे काम पालक म्हणून आपले आहे. केवळ ‘गुगलून’ माहिती शोधायची नसते हे पण जरूर सांगा. फारच क्वचित पालक हे सांगतात. मात्र, आपल्या माहिती करता म्हणून थोडक्यात सांगतो. हा रस्ता संशोधनाचा असून डॉक्टरेटपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर याचा अर्थ दहावी नंतर किमान १४ वर्षे शिकल्यानंतर करिअर सुरू होऊ शकते. इतिहास विषय आवडतो म्हणजे या दिशेला जावे असे नसते. मुलाला इतिहास वाचण्यासाठी भरपूर प्रोत्साहन द्या. त्या संदर्भातील अवांतर वाचनासाठीची पुस्तकेही वाचण्यासाठी प्रवृत्त करा. मुख्य म्हणजे सर्व विषयात इयत्ता दहावीला किमान प्रत्येकी ८५ गुण पाहिजेत हे सुद्धा त्याला समजावून सांगा. त्याने स्वत: या विषयाची समग्र माहिती नीट गोळा केली तर अकरावीनंतर तो या रस्त्याला कला शाखेतून जाऊ शकतो. इतिहास विषयातून बीएनंतर एम. ए.वा त्यानंतर पुरातत्त्वशास्त्र या विषयातील संशोधन करून डॉक्टरेट अशी सरळ वाटचाल राहील.
सर, माझ्या मुलाला १०वीला ८७ टक्के आणि १२ वी शास्त्राला ७५ टक्के मिळाले असून तो सध्या पुण्याच्या सिम्बायोसिसमधून बीएस्सी इन स्पोर्ट्स आणि हेल्थ सायन्समधे शिकत आहे. त्याला स्ट्रेन्थ व कंडिशनींगमध्ये मास्टर्स करायचे आहे. तर ते परदेशात जाऊन करावे की भारतातच? आणि या क्षेत्रात अजून काय संधी आहेत त्याबद्दल कृपया मार्गदर्शन करावे.- साधना मोहिते.
बीएस्सी झाल्यानंतर दोन वर्षांचा त्याने प्रत्यक्ष कामाचा अनुभव घ्यावा. त्याशिवाय निव्वळ मास्टर्स करण्यात फारसा अर्थ नाही. या प्रकारचे काम करत असताना संभाषण कौशल्य, चिकाटी व सातत्य यांची प्रचंड गरज असते. विविध खेळांच्या संदर्भात लागणारी कौशल्ये अभ्यासून त्यातील कोणत्या कौशल्या करता कोणते स्नायू लागतात. त्याची स्ट्रेंथ व कंडिशिनग कसे करायचे यासाठीही प्रत्यक्ष फिल्डवर अनुभव गरजेचा असतो. यातील विविध डिप्लोमा कोर्सेस परदेशात उपलब्ध आहेत. मात्र, त्या प्रत्येक अभ्यासक्रमाची काही वैशिष्टय़े वेगवेगळय़ा अंगाने जातात. फिजिओथेरपीच्या अंगाने जाणारे मास्टर्सचे अनेक कोर्सेस आहेत. स्पोर्ट्स मेडिसिन या अंगाने जाणारे सुद्धा अनेक कोर्सेस आहेत. मात्र, त्यासाठी आपल्या मुलाला प्रवेश मिळण्याची शक्यता मला दिसत नाही. सिम्बायोसिसमध्येच प्रथम मास्टर्स केले तर जास्त उपयुक्त ठरावे. परदेशी पदवी तिथेच स्थायिक व्हायला उपयुक्त होईल वा नाही हेही तपासणे गरजेचे आहे. त्यानंतर माहिती घेऊन मुलगा निर्णय घेऊ शकेल.